शिवतेजसिंह मोहिते पाटील यांच्या सूचनेनंतर मुरूम अंथरण्याचे काम सुरू
अकलूज (कटूसत्य वृत्त):- गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे अकलूज माळेवाडी परिसरात नागरिकांना चिखल व वाहतुकीच्या अडचणींना सामोरे जावे लागत होते. पाईपलाईन व अंडरग्राउंड गटारीच्या कामासाठी रस्ते खोदण्यात आले होते. मात्र, त्याच काळात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी चिखल साचून रस्ते खडबडीत झाले होते. परिणामी शाळकरी मुलांपासून ते वृद्ध नागरिकांपर्यंत सर्वांनाच या मार्गावरून प्रवास करताना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते.
ही परिस्थिती लक्षात घेतल्यानंतर शिवतेजसिंह मोहिते पाटील यांनी स्वतः पुढाकार घेत अकलूज नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांना तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. त्यांच्या सूचनेनुसार नगरपरिषद प्रशासनाने अकलूज माळेवाडी परिसरातील चिखलमय रस्त्यांवर तात्पुरत्या स्वरूपात मुरूम टाकण्याचे काम हाती घेतले आहे. या कामाला प्रत्यक्षात सुरुवात झाल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून परिसरात वाहतूक पूर्ववत सुरू झाली आहे.
“सध्या पावसामुळे निर्माण झालेली ही तात्पुरती अडचण आहे. पाइपलाईन व अंडरग्राउंड गटारीचे काम पूर्ण झाल्यानंतर संबंधित रस्त्यांची पुनर्बांधणी करून नागरिकांना कायमस्वरूपी दर्जेदार रस्ते उपलब्ध करून दिले जातील.” अशी माहिती यावेळी अकलूज नगरपरिषदेच्या वतीने देण्यात आली.
या उपक्रमामुळे नागरिकांकडून समाधान व्यक्त होत असून, वेळेवर दिलेल्या सूचनेमुळे समस्या तात्पुरत्या स्वरूपात कमी झाल्याचे सर्वत्र मान्य केले जात आहे.
0 Comments