खापरवाडा येथील तरुणांनी पावसाळ्यात उभारली तात्पुरती स्मशानभूमी
मूर्तिजापूर (कटूसत्य वृत्त):- गेल्या दोन दिवसांपासून मूर्तिजापूर तालुक्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे सामान्य नागरिकांना अनेक समस्येला तोंड द्यावे लागत असल्याचे दुर्दैवी चित्र आज दिसून आले आहे. मूर्तिजापूर तालुक्यातील खापरवाडा येथील स्मशानभूमी गावापासून सुमारे २.५ किमी लांब तसेच स्मशानभूमी पर्यंतचा पोहचरस्ता अत्यंत खराब असल्यामुळे तिथे मृतदेह घेऊन जाणे अशक्य आहे. 7 जुलै रोजी गावात एका भगिनीचा मृत्यू झाला परंतु सोमवारपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे अंतिम संस्कार कुठे करावे हा यक्ष प्रश्न खापरवाडा गावकऱ्यांना पडला होता. अशातच गावातील काही तरुणांनी शक्कल लढवत गावापासून काही अंतरावर असलेल्या रस्त्यावरच तात्पुरती स्मशानभूमी उभारून तिथेच अंतिम संस्कार करण्यात आल्याचे भीषण चित्र आज बघायला मिळाले.
पाच ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था तसेच स्वतःला महासत्ता म्हणून घेणाऱ्या या देशात सामान्य जनतेला मेल्यानंतरही भयंकर वेदना सहन कराव्या लागतात ही अत्यंत लाजिरवाणी आणि निषेधार्य बाब आहे. माणूस मेल्यानंतरही त्याला सन्मानाची वागणूक या देशात मिळत नसेल तर सामान्य नागरिकाला मातृभूमी आहे का नाही हा गंभीर प्रश्न आहे...?? अंदाजे सहा वर्षाआधी खापरवाडा येथे गावापासून सुमारे २.५ किमी अंतरावर एका स्मशानभूमीचे बांधकाम करण्यात आले. सहा वर्ष उलटून गेले पण अजूनही प्रशासनाने त्या स्मशानभूमीला पोहचरस्ता बनवून दिलेला नाही. सामान्य माणसाला या देशात मृत्यूपश्चात सुद्धा अपमानजनक वागणूक दिली जाते हे जिवंत उदाहरण आज समस्त गावकऱ्यांनी अनुभवले आहे.
सध्या महाराष्ट्रात विकसित महाराष्ट्र २०४७ चे सर्वेक्षण मोठ्या जोरात सुरू आहे. सगळीकडे त्याचा मोठा गाजावाजा सुरू आहे. त्या निमित्ताने मी हात जोडून विनंती करतो की, अकोला जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांनी एकदा वेळ काढून जिल्ह्यातील ग्रामीण भागाचा दौरा करावा आणि ग्रामीण भागातील नागरिकांच्या समस्या जाणून घ्याव्यात तेंव्हाच तुम्हाला विकसित महाराष्ट्र घडवता येईल अन्यथा मोठमोठ्या जाहिराती व भाषण देऊन हा महाराष्ट्र नक्कीच भकास होईल यात तिळमात्र शंका नाही.
------------------------------ ----------
( चौखट )
जिल्हाधिकाऱ्यांना माझी नम्र विनंती आहे की, त्यांनी एकदातरी माझ्या खापरवाडा गावात येऊन सामान्य जनतेशी संवाद करावा आणि त्यांच्या समस्या समजून घ्याव्यात. शेवटी या देशाचा मालक हा सामान्य नागरिक आहे. देशातील 3% श्रीमंतांसाठी पायघड्या घालणाऱ्या या सरकारने सामान्य नागरिकांची अशी अवहेलना करू नये, शासनाने आमची समस्या लवकरात लवकर दूर करावी आणि आम्हाला दिलासा द्यावा.
- सतिश विनायक गवई
खापरवाडा
0 Comments