Hot Posts

6/recent/ticker-posts

पावसाळ्यात पाच लाख वृक्ष लागवड होणार

 पावसाळ्यात पाच लाख वृक्ष लागवड होणार


सोलापूर (कटूसत्य वृत्त) राज्यात वन आच्छादनाचे प्रमाण वाढवण्यासाठी मृद व जलसंधारण विभागाच्या माध्यमातून 'हरित महाराष्ट्र समृद्ध महाराष्ट्र' या अभियानांतर्गत यंदा पावसाळ्यामध्ये पाच लाख वृक्ष लागवडीचे नियोजन करण्यात आले आहे. ही वृक्ष लागवड जुलै आणि ऑगस्ट महिन्यामध्ये पूर्ण करण्याचे आदेश मृद व जलसंधारण विभागाने दिले आहेत.


वृक्ष लागवडीसाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्याला उद्दिष्ट ठरवून देण्यात आले आहे. पुणे जिल्ह्यासाठी २५ हजार ५००, सोलापूर जिल्ह्यासाठी २४ हजार ३००, कोल्हापूर जिल्ह्यासाठी १२५०० वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. त्यासाठी अशासकीय संस्थेच्या माध्यमातून रोपे उपलब्ध करून घेऊन वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. अहिल्यानगर २७८००, अकोला ८८५०, अमरावती १९९५०, छत्रपती संभाजीनगर १६५००, बीड १७४५०, भंडारा ६ हजार १००, बुलढाणा १५८००, चंद्रपूर १८६००, धुळे ११७५० असे एकूण ३४ जिल्ह्यासाठी ५ लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले.


राज्यात वृक्षाच्छादन वाढविण्यासाठी हरित महाराष्ट्र, समृध्द महाराष्ट्र या अभियानांतर्गत वर्ष २०२५ करीता १० कोटी वृक्ष लागवड मोहीम लोक चळवळ म्हणून राबविण्याबाबत मुख्यमंत्री यांनी दि. ४ जून २०२५ रोजी बैठक घेतली. यावेळी राज्यात वृक्षाच्छादन वाढविण्यासाठी हरित महाराष्ट्र, समृध्द महाराष्ट्र या अभियानांतर्गत वर्ष २०२५ करीता  १० कोटी वृक्ष लागवडीच्या अनुषंगाने १० टक्के अधिक वृक्ष लागवडीचे नियोजन विचारात घेऊन मृद व जलसंधारण विभागासाठी एकूण ५ लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट महसूल व वन विभागाने निश्चित केले आहे. त्यानुषंगाने मृद व जलसंधारण विभागांतर्गत हरित महाराष्ट्र, समृध्द महाराष्ट्र या अभियानांतर्गत वर्ष २०२५ करीता ५ लाख वृक्ष लागवड मोहीम राबविण्यात येणार आहे.


राष्ट्रीय वन नीतीप्रमाणे एकूण भौगोलिक क्षेत्राच्या ३३ टक्के क्षेत्रावर वन आणि वृक्षाच्छादन असणे आवश्यक आहे. सद्यस्थितीत राज्यात वन आणि वृक्षाच्छादनाचे प्रमाण २१.२५ टक्के आहे. जागतिक तापमानातील वाढ, हवामान आणि ऋतूबदल याची दाहकता आणि तीव्रता कमी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात राज्यासह जिल्ह्यातही वृक्ष लागवड हाती घेण्यात येणार आहे.


सहा महिन्यांनी होणार वृक्ष लागवडीचे छायाचित्रण

वृक्ष लागवडीसाठी त्या भागातील स्थानिक भौगोलिक परिस्थिती विचारात घेऊन त्या भागात वाढ होऊ शकणाऱ्या स्थानिक प्रजातींची प्राधान्य लागवड करावी, अशाही सूचना दिल्या आहेत. या योजनेच्या माध्यमातून नाला खोलीकरण, रुंदीकरण झालेल्या ठिकाणी वृक्ष लागवड केली जाणार आहे. वृक्षारोपण झाल्यानंतर वृक्षारोपण स्थळांची जिओ टॅगिंगसह माहिती, वृक्षांचे जिवंत राहण्याचे प्रमाण किमान दर सहा

महिन्यांनी छायाचित्रांसह वनविभागाच्या प्लॅटफॉर्मवर अपलोड करावे, अशा सूचना दिल्या आहेत.

• वृक्षाच्छादन वाढविण्याचे राज्य सरकारचे उद्देश

• जुलै आणि ऑगस्ट महिन्यात वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट

Reactions

Post a Comment

0 Comments