साेलापूर जिल्ह्यातील सरपंच पदांसाठी नव्याने काढणार आरक्षण
राज्य सरकारचे जिल्हाधिकारी कार्यालयाला आदेश
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- जिल्ह्यातील १ हजार २५ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदासाठी २२ एप्रिल २०२५ रोजी काढलेली आरक्षण सोडत रद्द करून नव्याने आरक्षण सोडत काढावी, असे आदेश राज्य सरकारने जिल्हाधिकारी कार्यालयाला दिले आहेत.त्यानुसार सोलापूर जिल्ह्यातील सरपंचांसाठी नव्याने आरक्षण सोडत काढली जाणार आहे. ही सोडत १५ जुलैपर्यंत होण्याची शक्यता आहे.
सर्वोच्च न्यायालयाने ६ मे रोजी आदेश देत, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पूर्वीप्रमाणे चार महिन्यात घ्या असे सांगितले. ओबीसींच्या २७ टक्के आरक्षणाची अंमलबजावणी करण्यासाठी आरक्षण सोडत प्रक्रिया पुन्हा राबविण्याचे आदेश ग्रामविकासचे अवर सचिव बा. म. आसोले यांनी दिले होते. राज्यातील काही जिल्ह्यांनी २७ टक्के आरक्षणाची अंमलबजावणी केली आहे तर काही जिल्ह्यांनी ५२ टक्के आरक्षणाची मर्यादा पाळत ओबीसी आरक्षण २७ टक्क्यांच्या कमी दिल्याची शक्यता होती. त्या पार्श्वभूमीवर नव्याने आरक्षण सोडत काढण्याचे आदेश ग्रामविकास विभागाने दिले होते. सोलापूर जिल्ह्यात २७ टक्क्यांची मर्यादा पाळली आहे. तरीही आम्ही काय करावे ? असे मार्गदर्शन जिल्हाधिकारी कार्यालयाने मागविले होते.
जिल्ह्यातील १ हजार २५ ग्रामपंचायतींसाठी २२ एप्रिल २०२५ रोजी ओबीसींना २७ टक्के आरक्षण देत सोडत काढण्यात आली होती. त्या नंतर ६ मे रोजी सर्वोच्च न्यायलयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी २७ टक्के आरक्षण मान्य केले आहे. त्यामुळे ज्या जिल्ह्यांनी ओबीसींना २७ टक्क्यांपेक्षा कमी आरक्षण दिले आहे, त्या जिल्ह्यांना नव्याने आरक्षण सोडत राबवावी लागणार आहे. ज्या जिल्ह्यांनी ओबीसींच्या २७ टक्के आरक्षणाची मर्यादा पाळली. त्यांनाही आता नव्याने आरक्षण सोडत राबवावी लागणार आहे.
नवी सोडत, नवे राजकारण जिल्ह्यातील जवळपास ६०० ग्रामपंचायतींची निवडणूक नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये होण्याची शक्यता आहे. यापूर्वी एप्रिलमध्ये झालेल्या आरक्षण सोडतीनंतर अनेकांनी गावात भावी सरपंच म्हणून मिरवायला सुरुवात केली होती. आता जिल्ह्यातील सरपंचासाठी नव्याने आरक्षण होणार असल्याने गावगाड्याचे राजकीय आणि आर्थिक गणित बदलून जाणार आहे. नव्या आरक्षण सोडतीनंतर जिल्ह्यातील निम्म्याहून अधिक गावात नव्या राजकारणाला सुरुवात होणार आहे. गावचा कारभारी कोण, हे ठरविण्याआधी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका होणार आहेत. ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती या निवडणुकांमध्ये साटेलोटे करण्याची सुरुवात नव्या सरपंच आरक्षण सोडतीनंतर होऊ शकते.
जिल्ह्यातील एकूण ग्रामपंचायती :१ हजार २५,अनुसुचित जातीसाठी सरपंचाच्या राखीव जागा : १५५ (महिलांसाठी ७८),अनुसुचित जमातीसाठी सरपंचाच्या राखीव जागा : १८ (महिलांसाठी ९),ओबीसीसाठी सरपंचाच्या राखीव जागा : २७७ (महिलांसाठी १३९),सर्वसाधारण सरपंचासाठी राखीव जागा : ५७५ (महिलांसाठी २८८)
0 Comments