शालेय विद्यार्थ्यांसाठी एसटीच्या फेऱ्या रद्द करू नयेत
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- दररोज लाखो विद्यार्थी बसने शाळा, महाविद्यालयात ये-जा करतात. त्यांच्यासाठी हजारो फेऱ्या सुरू आहेत. परंतु, विविध कारणांनी काही फेऱ्या अचानक रद्द केल्या जातात, अशा तक्रारी विद्यार्थी व पालकांकडून येत आहेत. विशेषतः आदिवासी पाडे आणि दुर्गम भागात विद्यार्थ्यांना एकच बसफेरी उपलब्ध असल्याने त्यांची प्रचंड गैरसोय होते. त्यामुळे यापुढे प्रत्येक आगारप्रमुखांनी आपल्या कार्यक्षेत्रातील शालेय फेरी कोणत्याही परिस्थितीत रद्द होणार नाही, याची दक्षता घ्यावी असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत.
१६ जूनपासून शाळा- महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या लाखो विद्यार्थी- विद्यार्थिनींना एसटीचे पास थेट त्यांच्याच शाळेत देण्यात आले आहेत. १६ जून ते ३० जूनपर्यंत तब्बल पाच लाख २१ हजार ३५४ विद्यार्थ्यांनी योजनेतून मोफत पास घेतले आहेत. यापूर्वी विद्यार्थ्यांना एसटीच्या पास केंद्रावरील रांगांमध्ये उभारून किंवा गटागटाने आगारात जाऊन आगार व्यवस्थापनाकडून पास घ्यावे लागत होते.
आता विद्यार्थ्यांना पास घेण्यासाठी रांगेत ताटकळत उभे राहावे लागत नाही. त्यांच्या शाळा- महाविद्यालयांनी पुरवलेल्या यादीनुसार एसटीच्या कर्मचाऱ्यांकडून त्या विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळांमध्ये जाऊन पास दिले जात आहे.
या संदर्भात १६ जूनपासून एसटी प्रशासनातर्फे 'एसटी पास थेट तुमच्या शाळेत' ही विशेष मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. तत्पूर्वी, सर्व शाळा- महाविद्यालयांच्या मुख्याध्यापक किंवा प्राचार्यांना एसटीच्या आगार व्यवस्थापकांनी पत्र देऊन आपल्या शाळेत नवीन वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थी विद्यार्थ्यांची यादी तयार ठेवण्यास सांगितले होते.
0 Comments