Hot Posts

6/recent/ticker-posts

बसवेश्वर महाराजांनी बाराव्या शतकात अनुभव मंटप नावाची संसद स्थापन केली- सृष्टी लिगाडे

  बसवेश्वर महाराजांनी बाराव्या शतकात अनुभव मंटप नावाची संसद स्थापन केली- सृष्टी लिगाडे




          सांगोला (कटूसत्य वृत्त):- महात्मा बसवेश्वर महाराजांनी समाजात समता नांदावी, जातिभेद दूर व्हावे, अंधश्रद्धा, कर्मकांड, अस्पृश्यता या सर्व गोष्टी नष्ट करण्यासाठी सर्व शिवशरणार्थी एकत्र करून अनुभव मंटप नावाने एक संसद स्थापन केली. मंगळवार दिनांक २९ एप्रिल रोजी बसवेश्वर जयंती उत्सव मंडळ सांगोला यांचे वतीने 'बसवेश्वर महाराजांचे जीवनकार्य' या विषयावर कु. सृष्टी सुनील लिगाडे हिने बसवेश्वर महाराजांचे जीवनातील अनेक पैलू आपल्या व्याख्यानातून व्यक्त केले. 
          पुढे बोलताना कु. सृष्टी लिगाडे हिने सांगितले की, महात्म्यांना जन्मापासूनच साध्याचा ध्यास असतो. एक क्षणही ते आपल्या ध्येयापासून परावृत्त होत नाहीत. कथनी- करणी मध्ये अजिबात अंतर नसणारं, असाधारण पारदर्शक व्यक्तिमत्व म्हणजे जगत् ज्योती महात्मा बसवेश्वर महाराज. महात्मा बसवेश्वरांच्या जीवन चरित्राचा अभ्यास करताना एक विलक्षण गोष्ट प्रत्ययाला येते ती म्हणजे त्यांची लोककल्याणाची विलक्षण ओढ. जनसामान्यांबद्दलचा बसवेश्वर महाराजांचा उमाळा अतिशय उत्कट व आर्द्र होता. जाती-पाती, पंथ, स्त्री-पुरुष उच्चनीच या सर्व भेदांना संपवून माणसांचा 'वीरशैव' व्हावा म्हणून बसवेश्वर महाराजांनी १२व्या शतकाच्या मध्यकाळात कार्य केले त्याला तोड नाही. त्यांच्या याच कार्यकर्तृत्वामुळे त्यांचा भव्य पुतळा आज लंडनमध्ये उभारला जातोय आणि मला वाटतं आपल्या सर्वांसाठी ही गोष्ट अतिशय अभिमानाची आहे असे प्रतिपादन केले. बसवेश्वर महाराजांनी अनुभव मंटपाच्या माध्यमातून अनेक मोलाच्या शिकवणी दिल्या. त्यामध्ये प्राणीमात्रावर दया करा, प्राणिमात्राची हत्या करू नका, जिवंत नागाला मारून चित्रातल्या नागदेवतेची पूजा करू नका, मांसाहार करू नका, वर्णभेद, जातिभेद करू नका, स्त्रियांवर व दलितांवर अन्याय करू नका, सर्वांना समान वागणूक द्या, मूर्ती पूजेपेक्षा माणुसकीला अधिक महत्त्व द्या, पैशाने श्रीमंत होण्यापेक्षा विचारांनी श्रीमंत व्हा. 
          याचवेळी सौ. हर्षदा गुळमिरे यांनी बसवेश्वर महाराजांच्या जीवन चरित्रावर स्वरचित अशी कविता सादर केली. तसेच लिंगायत समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक सिद्धेश्वर झाडबुके गुरुजी यांनीही बसवेश्वर महाराजांविषयी आपले विचार व्यक्त केले.
            या सर्व कार्यक्रमासाठी बसवेश्वर जयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष संदेश पलसे, उपाध्यक्ष नितीन बुंजकर, सचिव प्रतिक कळसे, खजिनदार संतोष गुळमिरे, मनोज उकळे, आनंद घोंगडे, संतोष महिमकर, काशिनाथ ढोले, सुनील डिगोळे गुरुजी, सुनील लिगाडे व लिंगायत समाजातील ज्येष्ठ बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सौ. अनुपमा गुळमिरे मॅडम यांनी मानले.
Reactions

Post a Comment

0 Comments