निवृत्त सभासद हे फक्त संघटना सदस्य राहिले नाही तर ते संघटना जगले- कॉ.देविदास तुळजापूरकर
लातूर (कटूसत्य वृत्त):- "तुम्ही निवृत्त सभासद केवळ संघटनेचे सभासद होता,असे नाही तर तुम्ही संघटनेचे विचार व संघटना अक्षरशः जगलात. ज्यामुळे आम्ही सुद्धा घडू शकलो. आपण संघटने वरती विश्वास दाखवून नेहमी संघटनेच्या वेगवेगळ्या उपक्रमांमधून क्रियाशील राहिलात म्हणूनच आज ए. आय. बी. ई. ए. ही आपली लाडकी संघटना आठ दशकांचा प्रवास गौरवाने पूर्ण करते आहे,"असे गौरवोद्गार ए. आय. बी.इ.ए.या बँक कर्मचारी संघटनेचे जॉइंट सेक्रेटरी कॉ. देविदास तुळजापूरकर यांनी व्यक्त केले.
लातूर येथे संघटनेच्या 80 व्या वर्धापन दिनानिमित्त लातूर येथे आज बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉईज युनियन, औरंगाबाद च्या वतीने आज सेवानिवृत्त सभासदांच्या कृतज्ञता सोहळ्यात बोलताना ते पुढे म्हणाले की,"दि. 20 एप्रिल 1946 साली स्थापन झालेल्या देशातील बँक कर्मचाऱ्यांची सर्वात मोठी संघटना या तुमच्या दृढसंकल्प निष्ठा आणि त्याग यामुळेच आज ही गौरवशाली वाटचाल सुरू आहे."
संपूर्ण देशभरामध्ये विविध उपक्रमांनी संघटनेचा 80 वा वर्धापन दिन साजरा केला गेला. लातूरमध्ये सुद्धा या निमित्त 'रक्तदान शिबिर 'व 'सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा कृतज्ञता सोहळा' आयोजित करून वर्धापन दिन साजरा केला गेला. यावेळी बोलताना कॉ. तुळजापूरकर पुढे म्हणाले की," ए.आय.बी.इ.ए.या पाच जादुई अक्षरामुळे आज अनेकांच्या आयुष्यात क्रांती आलेली आहे. त्यांना सन्मानाने व स्वाभिमानाने जीवन जगण्याची संधी या संघटनेने दिली. अनेकांच्या आयुष्यात आर्थिक स्थैर्य निर्माण केले. या संघटनेने बारा द्विपक्ष करार मिळवून दिले तसेच सन्मानजनक सेवाशर्तीही मिळवून दिलेल्या आहेत. ए.आय. बी.इ.ए.हा एक विचार आहे ,जो केवळ कर्मचाऱ्यांच्या हितासाठीच नव्हे तर या देशातील कष्टकऱ्यांच्या, शेतकऱ्यांच्या, सर्वसामान्यांच्या हितासाठी, ग्राहकांच्या ठेवींचे व हक्कांचे संरक्षण करण्यासाठी सुद्धा नेहमी अग्रेसर राहिलेला आहे, आणि यासाठीच्या कृतिशील लढ्यातील तुमचे योगदान विसरणे शक्य नाही."
संघटनेचे जनरल सेक्रेटरी कॉ. धनंजय कुलकर्णी यांनीही उपस्थित सदस्या सोबतच्या संघटनेतील काम करतानाच्या अनेक आपल्या अध्यक्षीय भाषणात उजाळा दिला. ते म्हणाले की,"90 च्या दशकामध्ये सभासदांच्या संघटनेमध्ये असणाऱ्या क्रियाशील सहभागामुळे त्यांच्यामध्ये जैव संबंध तयार झाले ज्याचा प्रत्यक्ष परिणाम संघटनेच्या सक्षमीकरणांमध्ये झाला व याच सक्षम संघटित ताकतीच्या जोरावर मुजोर व्यवस्थापनाला वठणीवर आणण्याचे काम संघटनेने वेळोवेळी केले आहे. म्हणूनच सेवानिवृत्त झालेली ही पिढीने स्वाभिमानाने नोकरी कशी करायची याचा वस्तू पाठ या सर्व तरुणांसमोर घालून दिलेला आहे. सरकार खाजगीकरणाबाबत मोठ्या आवाजात बोलत असताना पुन्हा एकदा या सेवानिवृत्त कर्मचाऱ्याप्रमाणे आपला सहभाग संघटनेमध्ये वाढविणे व सक्षम संघटित ताकद उभी करणे ही काळाची गरज असून त्याशिवाय खाजगीकरणाचे भूत आपण परतवून लावू शकणार नाही.आज नोकरभरती जवळपास बंद आहे, ज्याचा विपरीत परिणाम ग्राहकसेवा आणि आपल्या ग्राहकांच्या संबंधात अंतर पडत आहे. ते संबंध पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी नोकर भरतीचे आंदोलन संघटना करीत आहेच, त्यात या ज्येष्ठांनी सहभाग नोंदवून आपल्या बँकेच्या प्रतिमेस पुन्हा उंचीवर न्यावे."
आपल्या प्रास्ताविकात या कार्यक्रमाचे प्रयोजन स्पष्ट करताना संघटनेचे तरुण नेते आणि सचिव कॉ. दीपक माने म्हणाले की, "एखाद्या कामगार संघटनेस आठ दशकांचा इतिहास असावा, ही खूप मोठी ऐतिहासिक गोष्ट आहे. या आठ दशकामध्ये संघटनेत फूट पाडण्याचे सरकार व व्यवस्थापनाकडून वेळोवेळी प्रयत्न झाले .परंतु सभासदांचा संघटने वरती व संघटनेच्या नेतृत्वावरती असलेल्या विश्वासामुळेच व त्यांच्या सक्रियतेमुळेच ही संघटना आपला आठ दशकांचा अभिमानास्पद प्रवास पूर्ण करू शकली. 1946 मध्ये लावलेल्या या रोपट्याचे आज महावृक्षामध्ये जे रूपांतर झाले आहे ,त्यामध्ये अनेकांचे कष्ट व त्याग समाविष्ट आहेत. सेवानिवृत्त झालेल्या तुम्हा सर्वांनी सलग 40 वर्ष या संघटनेचा झेंडा प्रखर संघर्षातून एका उंची वरती नेऊन ठेवला आहे व तोच वारसा आता आम्हालाही येथून पुढे घेऊन जावयाचा आहे. त्यासाठी आपले मार्गदर्शन वेळोवेळी आम्हाला मिळणारच आहे परंतु आजपर्यंत तुम्हा सर्वांचा हा प्रवास आम्हासाठी प्रेरणादायी असणार आहे, म्हणूनच तुमच्या या कार्यप्रति कृतज्ञता म्हणून आज ज्या लोकांनी वयाची पंच्याहत्तरी ओलांडलेली आहे त्या सर्वांना संघटना या ठिकाणी सन्मानित करीत आहे."
सेवानिवृत्त कर्मचारी कॉ. शरद बोर्डे , कॉ.सुभाष आराध्य यांनी संघटनेबद्दलच्या अनेक आठवणींना यावेळी उजाळा दिला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कॉ. उत्तम होळीकर यांनी केले तर आभार जॉइंट सेक्रेटरी कॉ. सुधीर मोरे यांनी केले. या कार्यक्रमास कॉ.विलास भुमकर, कॉ.अनंत अघोर, कॉ. धानेश्वर कातळे, कॉ.सुधाकर मांडे, कॉ.मल्लिकार्जुन माळी, सेवानिवृत्त संघटनेचे अध्यक्ष कॉ.लक्ष्मीकांत मांडवेकर यासह अनेक सेवानिवृत्त कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते. त्या सर्वांचा सत्कार यावेळी कॉ.तुळजापूरकर आणि कॉ. कुलकर्णी यांचे हस्ते करण्यात आला.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी कॉ.उदय मोरे, कॉ.प्रकाश जोशी, कॉ. श्रीकृष्ण मांडे यांनी प्रयत्न केले.
0 Comments