तीन जागांसाठी भाजपमध्ये फूट पाडून कल्याणशेट्टींनी काय मिळवलं
तांदूळवाडीच्या बैठकीत सुभाष देशमुखांचा सवाल
सोलापूर (कटूसत्य वृत्त):-सोलापूर बाजार समितीच्या निवडणुकीत पॅनलचे नेतृत्व करणाऱ्या सचिन कल्याणशेट्टींना केवळ तीन जागा मिळाल्या, पक्षात फूट पाडून त्यांनी काय मिळवलं? असा सवाल भाजप आमदार सुभाष बापू देशमुख यांनी तांदूळवाडी येथील कार्यकर्त्यांच्या बैठकीत उपस्थित केला.
बाजार समितीच्या निवडणूक प्रचारासाठी तांदूळवाडी येथील बैठकीत मतदारांशी संवाद साधताना आ. देशमुख यांनी आ. सचिन कल्याणशेट्टी यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. कार्यकर्त्याच्या जिवावर आम्ही आणि आमचा पक्ष मोठा झाला. आता येणाऱ्या निवडणुका कार्यकर्त्यांच्या आहेत असे पक्ष नेतृत्व सांगते, मग त्यांना निवडणुकीत संधी देण्यापेक्षा काँग्रेस नेत्यांच्या पॅनलचे नेतत्व केल्याने त्यांचा
कोणता फायदा होणार होता? अशी विचारणा आ. देशमुख यांनी केली. बाळासाहेब शेळके यांनी निवडणुकीपूर्वीच्या घडामोडींची माहिती दिली. सर्वांना सोबत घेतले असते तर कदाचित ही निवडणूक बिनविरोध होऊ शकली असती. मात्र आ. कल्याणशेट्टी यांनी तसे न करता आम्हाला त्यांच्या पक्षातील दोन्ही आमदारांना आणि मतदारांनाही अंधारात ठेवले. केवळ काँग्रेसच्या दोन नेत्यांशी चर्चा करून त्यांनी पॅनलचा निर्णय घेतला.
काका साठेसारख्या ज्येष्ठांना त्यांनी वाऱ्यावर सोडले. सतत फसवणूक करणाऱ्या मंडळींशी त्यांनी हातमिळवणी केली. त्यामुळे भाजपमध्येच त्यांच्याविषयी असंतोष पसरला असल्याची टीका त्यांनी केली. या बैठकीला हणमंत कुलकर्णी, माजी सभापती भीमाशंकर जमादार, उमेदवार धनेश आचलारे, सिद्धाराम हेले, सागर सोलापुरे, सोसायटी चेअरमन पंडित पाटील यांच्यासह सोसायटी आणि ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.
0 Comments