पद्धत, वेळ आणि लक्ष्य ठरवण्याचं पूर्ण स्वातंत्र्य'
पंतप्रधान मोदींनी लष्कराला दिले निर्देश?
नवी दिल्ली (वृत्त सेवा):- जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये २२ एप्रिल रोजी दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात तब्बल २६ पर्यटकांचा मृत्यू झाला तर अनेकजण गंभीर जखमी झाले.
या दहशतवादी हल्यानंतर संपूर्ण देशभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. यानंतर भारताने २३ एप्रिल रोजी काही मोठे निर्णय घेत पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याचे आदेश दिले होते. तसेच सिंधू पाणी करारही स्थगित केला केला.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढला असल्याचं पाहायला मिळत आहे. यातच आज (२९ एप्रिल) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली दिल्लीत उच्चस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर देण्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय सैन्याला पूर्ण स्वातंत्र्य दिलं असल्याची माहिती सांगितली जात आहे. या संदर्भातील वृत्त सूत्रांच्या हवाल्याने एएनआयने (ट्विटर) एक्सवर दिलं आहे.
दरम्यान, पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर चर्चा करण्यासाठी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि तिन्ही सैन्य दलाचे प्रमुख उपस्थित होते, अशी माहिती सांगितली जात आहे. जवळपास ही बैठक एक तासांपेक्षा अधिक वेळ सुरु होती.
उच्चस्तरीय बैठकीत मोदींनी लष्कराला काय निर्देश दिले?
दरम्यान, पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी भारतीय सशस्त्र दलांना पूर्ण ऑपरेशनल स्वातंत्र्य दिलं आहे. तसेच दहशतवादाच्या विरोधात सडेतोड उत्तर देण्याचा आपला राष्ट्रीय संकल्प असल्याचंही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यावेळी म्हटलं आहे. तसेच भारतीय सशस्त्र दलांच्या क्षमतेवर पंतप्रधानांनी पूर्ण विश्वास व्यक्त केला आहे. तसेच आपल्या प्रत्युत्तराची पद्धत, लक्ष्य आणि वेळ ठरवण्याचं पूर्ण स्वातंत्र्य लष्कराला असल्याचं पंतप्रधान मोदींनी सांगितलं असल्याचं एएनआयने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे.
वरिष्ठ पातळीवर हालचालींना वेग
पहलगाम हल्ल्यानंतर केंद्र सरकारमध्ये वरिष्ठ पातळीवर सध्याच्या घडीला प्रचंड मोठ्या हालचाली सुरु आहेत. वरिष्ठ पातळीवर भेटीगाठीचं सत्र सुरुच आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तीनही दलांच्या प्रमुखांची बैठक घेतली. या बैठकीत काय चर्चा झाली याची माहिती देखील समोर येत आहे. त्यामुळे केंद्र सरकारकडून उघडपणे मोठी कारवाई करण्यात येते की काय? अशी चर्चा आता सुरु आहे. पहलागमच्या हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट पसरली आहे. त्यामुळे केंद्र सरकारमधील हालचाली या देशातील नागरिकांना महत्त्वाचा संदेश देणाऱ्या आहेत. केंद्र सरकार दहशतवाद्यांच्या विरोधात मोठी कारवाई करण्याच्या तयारीत आहे, असा संदेश यातून दिला जातोय. यानंतर आता नेमकी काय कारवाई केली जाते? याबाबत सस्पेन्स वाढला आहे.
0 Comments