एनटीपीसी सोलापूरः शाश्वत ऊर्जा उपायांद्वारे परिसरातील गावांचे सशक्तीकरण

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- कार्यकारी संचालक सोलापूर तपन कुमार बंदद्योपाध्याय यांनी 25 मार्च 2025 रोजी एनटीपीसी सोलापूर येथे आयोजित पत्रकारांशी संवाद कार्यक्रमात 2024-25 या वर्षातील सोलापूर वीज केंद्राच्या यशाबद्दल माहिती दिली.
सोलापूर सुपर थर्मल पॉवर स्टेशन संपूर्ण भारतातील सात राज्यांच्या वीज गरजा पूर्ण करत असून, महाराष्ट्र राज्याला सर्वाधिक वीज पुरवठा केला जातो. हे केंद्र 2x660 मेगावॅट (1320 मेगावॅट) क्षमतेसह कार्यरत आहे. उष्णताजन्य वीजनिर्मितीबरोबरच, एनटीपीसी सोलापूर आपल्या अक्षय ऊर्जा उत्पादनात वाढ करत असून, 23 मेगावॅट क्षमतेच्या ग्राउंड माउंटेड सौर प्रकल्पाची उभारणी करीत आहे.
बंदद्योपाध्याय यांनी सांगितले की, 2024-25 या आर्थिक वर्षात (फेब्रुवारी अखेरपर्यंत) सोलापूर वीज केंद्राने 6209 मिलियन युनिट्स (MU) वीजनिर्मिती केली असून, आर्थिक वर्षाच्या शेवटी 6800 MU उत्पादन अपेक्षित आहे. 2023-24 मध्ये 7100 MU वीजनिर्मिती झाली होती, जी आतापर्यंतची सर्वाधिक होती.
पर्यावरणीय जबाबदारीच्या दिशेने पाऊल टाकत, एनटीपीसी सोलापूर फ्ल्यू गॅस डीसल्फरायझेशन (FGD) तंत्रज्ञानाचा अवलंब करून वायू प्रदूषण कमी करण्यावर भर देत आहे. तसेच, राख पुनर्वापर आणि पर्यावरण संवर्धनात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. जैव इंधनाचा उपयोग करून वीजनिर्मिती करण्याच्या प्रकल्पालाही प्रोत्साहन दिले जात आहे.
एनटीपीसी सोलापूर सामाजिक विकास, शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रातही सक्रिय असून, स्थानिक समुदायांसाठी विविध उपक्रम राबवत आहे. रोजगाराभिमुख प्रशिक्षण, महिलांसाठी कौशल्यविकास कार्यक्रम, तसेच स्वयंसहाय्यता गटांसाठी वस्त्रनिर्मिती केंद्र स्थापन करण्यात आले आहेत.
'गर्ल एम्पॉवरमेंट मिशन (GEM)' कार्यक्रमांतर्गत दरवर्षी 40 मुलींना शिक्षण, स्वसंरक्षण आणि सांस्कृतिक प्रशिक्षण दिले जाते. तसेच, गुणवंत विद्यार्थ्याना केएलई शाळांमध्ये मोफत शिक्षण दिले जाते. हा उपक्रम 2019 पासून सतत राबवला जात असून, भविष्यातही सुरू राहणार आहे.
सोलापूर महानगरपालिकेसोबत भागीदारी करून, उज्जनी धरणातून सोलापूर शहरासाठी पाणीपुरवठा योजनेसाठी एनटीपीसी सोलापूरने 240 कोटी रुपयांचे योगदान दिले आहे. एनटीपीसी सोलापूरने शून्य द्रव उत्सर्जन प्रणाली आणि पावसाचे पाणी संकलन प्रणाली राबवून पर्यावरणावर होणारा प्रभाव कमी करण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.
कार्यक्रमाच्या शेवटी, तपन कुमार बंदद्योपाध्याय यांनी लोकप्रतिनिधी, केंद्र व राज्य सरकारचे अधिकारी, जिल्हा प्रशासन, रेल्वे व कोळसा कंपन्यांचे अधिकारी, पत्रकार आणि स्थानिक नागरिकांचे आभार मानले.
या कार्यक्रमाला बिपुल कुमार मुखोपाध्याय (महाव्यवस्थापक, ओ अँड एम), नवीन कुमार अरोरा (महाव्यवस्थापक, देखभाल), मनोरंजन सारंगी (एच ओ एचआर) आणि इतर विभागप्रमुख उपस्थित होते.
0 Comments