सकाळच्या सत्रातील शाळा साडे बारा पर्यंत; सोलापूर जिल्हा थंड हवेचे ठिकाण आहे का? युवासेनेचा संतप्त सवाल
करमाळा (कटूसत्य वृत्त):-
राज्यभरात सकाळच्या सत्रातील शाळा ११.३० पर्यंतच सुरू राहणार आहेत मात्र सोलापूर जिल्ह्यात ११.३० ऐवजी दुपारी १२.३० पर्यंत या शाळा सुरू ठेवण्याचा निर्णय शिक्षण विभागाकडून घेण्यात आल्याने "सोलापूर जिल्हा थंड हवेचे ठिकाण आहे का?" असा संतप्त सवाल करत युवासेनेचे तालुकाप्रमुख शंभूराजे फरतडे (ठाकरे गट) यांनी शिक्षण विभागावर टिकेची झोड उठवली आहे. शिक्षण विभागाकडून निर्णय न बदल्यास तिव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा देखील फरतडे यांनी दिला आहे.
फेब्रुवारी महिन्यातच उन्हाच्या तिव्र झळा बसू लागल्या आहेत. अनेक ठिकाणी पाणी टंचाई भासू लागली आहे. त्यातच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शाळेत येण्यासाठी एक ते दिड किलोमीटर वाडी-वस्तीवरून पायपीठ करावी लागते. या पार्श्वभूमीवर जिल्हापरिषदेच्या सर्व शाळा सकाळच्या सत्रात ७.३० ते ११.३० या वेळेत भरावाव्यात यासाठी शाळा व्यवस्थापन समीतीने ठराव दिले होते. युवासेनेकडुन देखील या मागणीस प्रसिद्धी पत्रक काढून पाठिंबा देण्यात आला होता मात्र जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांकडून सकाळी ७.३० ते दु १२.३० पर्यंत शाळा भरवण्याचे आदेश आल्याने पालक वर्गांच्या चिंतेत भर पडली आहे. उन्हाची तीव्रता लक्षात घेता शिक्षण विभागाकडून या निर्णयाचा फेर विचार व्हावा अशी मागणी पालकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
(चौकट १)
शाळेपासून आमचे घर एक किलोमीटर अंतरावर आहे शाळेत जाण्यासाठी मुलांना पायी जावे लागत आहे दुपारी १२.३० वाजता शाळा सुटली तर मुलांना भर उन्हात पायपीठ करावी लागणार आहे, ११. ३० ला शाळा सुटली तर बारा पर्यंत मुलं घरी येवू शकतात.
-किरण मगर (हिवरे येथील पालक )
(चौकट 2)
उन्हामुळे सकाळच्या सत्रात शाळा भरवा अशी मागणी होती, मात्र ११.३० ला सोडा ही प्रमुख मागणी आहे मात्र दुपारी १२. ३० ला शाळा सोडणे म्हणजे वाडी-वस्तीवरून येणाऱ्या विद्यार्थ्यांना जोखमेचे आहे. या निर्णयामुळे उन्हापासून सरंक्षण होणे तर लांबच पण उन्हाचा फटका बसल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्यास धोकादायक आहे, त्यामुळेच शिक्षण विभागाचा निर्णय म्हणजे रोगा पेक्षा इलाज भयंकर अशातला प्रकार
-संजय कोठावळे
(अध्यक्ष,शाळा व्यवस्थापन समीती, उमरड)
0 Comments