मनोरमा बँक आर्थिकदृष्ट्या समृद्ध व सक्षम : गांगल
सलग सात वर्षे मनोरमा बँकेचा एनपीए शून्य टक्के
मनोरमा बँकेच्या नवव्या निंबर्गी शाखेचे ऑनलाईन उद्घाटन
सोलापूर(कटूसत्य वृत्त):-बँकिंग क्षेत्रात काम करत असताना टॅलेंट आणि टेक्नॉलॉजी उत्तम असायला हवी. तरच सहकाराचा पाया मजबूत होतो. आज आर्थिक विषमता दूर करण्याचे काम सहकाराने केले. सहकारी बँक चालवताना नैतिकता महत्त्वाची आहे. तरच शाश्वतपणा आपल्याला टिकवता येतो. मनोरमा बँक आजही आर्थिकदृष्ट्या समृद्ध व सक्षम आहे. सलग सातव्या वर्षीही ‘मनोरमा’ने शून्य टक्के एनपीए राखले आहे, असे गौरवोद्गार ठाणे जनता सह. बँकेचे चेअरमन शरद गांगल यांनी काढले.
मनोरमा को ऑप. बँकेची नववी शाखा निंबर्गी (ता. दक्षिण सोलापूर) येथे नुकतीच कार्यान्वित करण्यात आली. त्याचा ऑनलाईन उद्घाटन सोहळा रविवारी (ता. 23) सायंकाळी बालाजी सरोवर येथे मान्यवरांच्या हस्ते पार पडला. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार सुभाष देशमुख होते. व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून कॉसमॉस को ऑप. बँकेचे चेअरमन अॅड. प्रल्हाद कोकरे, माजी सह. आयुक्त, निवडणूक प्राधिकरण सह. संस्था पुणेचे संजय खडके, माजी कामगार सह. आयुक्त संभाजी काकडे, मनोरमा बँकेचे चेअरमन श्रीकांत मोरे, मल्टिस्टेटच्या चेअरमन सौ. शोभा मोरे, व्हा. चेअरमन संतोष सुरवसे, डॉ. सुमित मोरे, कार्याध्यक्षा सौ. अस्मिता गायकवाड सीईओ सौ. शिल्पा कुलकर्णी आदी उपस्थित होते. यावेळी चेअरमन श्रीकांत मोरे यांच्या हस्ते प्रमुख पाहुण्यांचा स्मृतिचिन्ह, शाल देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी संजय खडके, अॅड. प्रल्हाद कोकरे, आमदार सुभाष देशमुख यांचेही भाषण झाले. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते मनोरमा बँक निंबर्गी शाखा व मल्टिस्टेट शाखेचे ऑनलाईन उद्घाटन करण्यात आले.
चेअरमन श्रीकांत मोरे म्हणाले, अर्थकारण प्रवाही असले पाहिजे. ग्रोथ ही वाढलीच पाहिजे. यशस्वी व्हायचे असेल तर थांबा नाही. सहकार चळवळ वाढली पाहिजे. मनोरमा परिवार 25 हजार सभासदांचा आहे. यशस्वी उद्योजक, यशस्वी शेतकरी, आदर्श शिक्षकांचा सन्मान परिवाराने केला आहे. 500 कोटी रुपयांपेक्षा जास्त उलाढाल असलेल्या गटात अव्वल स्थान मिळाल्यामुळेच बँकेस आदर्श बँकेचा प्रथम पुरस्कार मिळाला आहे. यावेळी शिक्षिका सुवर्णा बोरगावकर, जिल्हा सरकारी वकील अॅड. प्रदीपसिंग रजपूत, आदर्श शेतकरी गंगाधर बिराजदार, सीताराम महाराज साखर कारखान्याच्या मुख्य कार्यकारी अधिकारी राजलक्ष्मी गायकवाड, सौ. व श्री. काळुंगे यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
कार्याध्यक्षा सौ. अस्मिता गायकवाड यांनी प्रास्ताविक केले. सौ. शोभा मोरे यांनीही विचार व्यक्त केले. प्राजक्ता गव्हाणे यांनी प्रास्ताविक केले. व्हा. चेअरमन संतोष सुरवसे यांनी आभार मानले. यावेळी मान्यवरांसह बँकेचे संचालक, कर्मचारी, अधिकारी उपस्थित होते.


0 Comments