श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने
शुक्रवारपासून विविध कार्यक्रम
सोलापुरात मंगळवारी श्री शिवजन्मोत्सवाचा पाळणा सोहळा
कुस्तीसह विविध स्पर्धांचे केले आयोजन
सोलापूर(कटूसत्य वृत्त):-श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 395 व्या जयंतीनमित्त दिनांक 14 ते 19 फेब्रुवारी 2025 दरम्यान विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे मंगळवार दि. 18 फेब्रुवारी रोजी रात्री 11 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे श्री जन्मोत्सव पाळणा सोहळा होणार असल्याची माहिती ट्रस्टी अध्यक्ष पद्माकर काळे आणि उत्सव अध्यक्ष सुशील बंदपट्टे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
शुक्रवार दि. 14 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 10 वाजता सोलापुरातील शिंदे चौक येथील डाळिंबी आड मैदान येथे श्रींची प्रतिष्ठापना मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहे. याच दिवशी येथे आरोग्य शिबिर होणार आहे. शनिवार दि. 15 फेब्रुवारी 2025 रोजी महिला बांधकाम कामगारांसाठी नोंदणी नूतनीकरण शिबिर आयोजित केले आहे.
दरम्यान, रिल्स व छायाचित्र स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. दि. 10 ते 19 फेब्रुवारी 2025 या कालावधीत हे रील्स आणि छायाचित्र काढलेले असावेत. या स्पर्धेत नाव नोंदणी दि. 12 ते 17 फेब्रुवारी 2025 दरम्यान राहुल मुद्दे 72 61 92 82 81 आणि सिद्धाराम भैरोपाटील 95 79 017517 या क्रमांकावर करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. सोमवार दि. 17 फेब्रुवारी रोजी दुपारी 2 ते रात्री 10 वाजेपर्यंत कुस्ती स्पर्धा होणार आहे.
या पत्रकार परिषदेस पुरुषोत्तम बरडे , राजन जाधव, श्रीकांत डांगे, अरुण रोडगे, पंकज काटकर, बसवराज कोळी आदींसह पदाधिकारी उपस्थित होते. असा होणार श्री शिवजन्मोत्सवाचा पाळणा सोहळा सालाबाद प्रमाणे मंगळवार दि. 18 फेब्रुवारी 2025 रोजी रात्री 11 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने श्री शिवजन्मोत्सव पाळणा कार्यक्रम होणार आहे. सोलापूर शहर व जिल्ह्यातील शहीद माता, शहीद पत्नी, शहिदांच्या कन्या यांना खास आमंत्रित करण्यात आले आहे. त्यांच्या हस्ते हा पाळणा सोहळा होणार आहे. यावेळी हजारो महिला सामूहिकरीत्या पाळणा गायन करणार आहेत. वाहनांसाठी विविध ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. या सोहळ्याचे नेटके नियोजन करण्यात येत असल्याचे उत्सव अध्यक्ष सुशील बंदपट्टे यांनी सांगितले. बुधवारी डाळिंबी आड येथून मिरवणुकीस होणार प्रारंभ छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त बुधवार दि. 19 फेब्रुवारी 2025 रोजी दुपारी 4 वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सिंहासनाधिष्ठीत मूर्तीची पूजा करून डाळिंबी आड मैदान येथून मिरवणुकीस प्रारंभ होणार आहे. पारंपारिक मार्गाने म्हणजेच सरस्वती बुक डेपो, नवी पेठ, मेकॅनिक चौक, भागवत थिएटर, छत्रपती शिवाजी महाराज चौक, महात्मा गांधी रोड, बाळीवेस, मधला मारुती, माणिक चौक, दत्त चौक, राजवाडे चौक, चौपाड विठ्ठल मंदिर मार्गे निघून डाळिंबी आड मैदान येथे ही मिरवणूक विसर्जित होणार आहे. मध्यवर्ती महामंडळाची शिवमुर्ती मेकॅनिक चौकात येऊन थांबल्यानंतर विविध सार्वजनिक मंडळे या मिरवणुकीत सहभागी होतील. या मिरवणुकीमध्ये शहरातील वारकरी संघटनेचे भजनी मंडळ, लेझीम झांज ,ढोल पथक, छत्रपतींच्या जीवनावरील देखावे , लेझर शो सादर करण्यात येणार आहेत, असेही यावेळी ट्रस्टी अध्यक्ष पद्माकर(नाना) काळे यांनी सांगितले.
0 Comments