Hot Posts

6/recent/ticker-posts

154 शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईचा प्रश्न लागला मार्गी

 154 शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईचा प्रश्न लागला मार्गी

आ. राजू खरे यांच्या पाठपुराव्याला यश



मोहोळ (कटूसत्य वृत्त):- जानेवारी 2023 मध्ये उजनीचा डावा कालवा फुटून परिसरातील शेतकऱ्यांचे झालेल्या नुकसानीचे पैसे त्वरित त्यांना द्यावेत अशी मागणी मोहोळचे आमदार राजू खरे यांनी जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीत केल्याने, येत्या आठ दिवसात नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना पैसे मिळतील अशी ग्वाही जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.
त्यामुळे आमदार राजू खरे यांच्या या मागणी मुळे आज तरी 154 शेतकऱ्यांचा नुकसान भरपाई चा प्रश्न मार्गी लागला आहे. 
तारीख 29 जानेवारी 2023 रोजी पहाटे सहा वाजता पाटकुल ता मोहोळ हद्दीत साखळी क्रमांक 112/ 650 या ठिकाणी उजनीचा डावा कालवा अचानक फुटला. कालवा फुटल्याने शेतकऱ्यांचे कोट्यावधीचे नुकसान झाले. अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी वाहून गेल्या. अनेकांच्या विहिरी, बोअर गाळाने भरली, ठिबक सिंचन इलेक्ट्रिक मोटारी वाहून गेल्या, तर एका शेतकऱ्याचे घर पडले. एका अर्ध्या तासाच्या कालावधीत होत्याचे नव्हते झाले.
कॅनॉल फुटल्याने द्राक्ष, डाळिंब आदीसह अन्य फळबागा व पिकेही वाहून गेल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थीक नुकसान झाले. दरम्यान महसूल प्रशासनाने तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांनी तातडीने पंचनामे करून तहसीलदार यांना अहवाल सादर केला. तहसीलदारानी तो अहवाल जलसंपदा विभागाकडे पाठविला.
घटना घडल्या नंतर अनेक आमदार, खासदार, विविध वरिष्ठ शासकीय अधिकारी, कारखान्यांचे अध्यक्ष यांनी भेटी देऊन तोंड भरून लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळवून देऊ म्हणून आश्वासने दिली, फोटोसेशन झाले. मात्र पुन्हा ना फिरकले ना पाठपुरावा त्यामुळे दोन वर्ष हा प्रश्न शेतकऱ्यांचा रखडला होता.
दरम्यान आमदार राजू खरे यांनी शुक्रवारी झालेल्या जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीत या शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाई बाबत आवाज उठविला, त्यामुळे जलसंपदा मंत्री विखे पाटील यांनी येत्या आठ दिवसात पैसे देण्याची व्यवस्था करण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे शेतकऱ्यांचे आता आठ दिवसांकडे डोळे लागले आहेत.


Reactions

Post a Comment

0 Comments