Hot Posts

6/recent/ticker-posts

झेडपी शाळांवर डिसेंबरअखेर कंत्राटी शिक्षक भरती!

 झेडपी शाळांवर डिसेंबरअखेर कंत्राटी शिक्षक भरती!



सोलापूर (कटूसत्य वृत्त):- शालेय शिक्षण विभागाच्या निर्णयानुसार १० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये आता डीएड किंवा बीएड पूर्ण केलेल्या तरुण-तरुणींना कंत्राटी शिक्षक म्हणून नेमले जाणार आहे. सोलापूर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने नियुक्तीच्या मान्यतेसाठी सामान्य प्रशासन विभागाकडे फाइल पाठविली आहे. जिल्हा परिषदेच्या ५३ शाळांमध्ये कंत्राटी शिक्षक नेमले जाणार असून त्यासाठी प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांकडेच उमेदवाराला अर्ज करावा लागणार आहे.


दहापेक्षा कमी पटाच्या शाळांमधील कार्यरत शिक्षकांची नेमणूक आता जिल्हा परिषदेच्या दुसऱ्या शाळांमध्ये (ज्या शाळांमध्ये पटसंख्या अधिक आहे, पण शिक्षक कमी असलेल्या ठिकाणी) केली जाणार आहे. समग्र शिक्षा अभियानातून या कंत्राटी शिक्षकांचे मानधन दिले जाणार आहे. कंत्राटी शिक्षक नेमण्याचा अधिकार प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांना असून ते जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षकांना नेमणुका देतील. एका गावातून एकापेक्षा अधिक अर्ज प्राप्त झाल्यास ज्या उमेदवाराचे शिक्षण जास्त आहे, त्यांना गुणवत्तेनुसार संधी दिली जाणार आहे.

नवीन शिक्षक भरतीची प्रक्रिया सुरु झाल्यानंतर ८० टक्क्यांच्या नियमानुसार सोलापूर जिल्हा परिषदेला आणखी १०० नवे शिक्षक मिळणार आहेत. पण, २३ सप्टेंबरच्या शासन निर्णयानुसार जिल्हा परिषदेच्या कमी पटाच्या (१० पेक्षा कमी) शाळांवर यापुढे कंत्राटी शिक्षकच कार्यरत असतील हे निश्चित.

डिसेंबरअखेर कंत्राटी शिक्षकांची नियुक्ती

२३ सप्टेंबरच्या शासन निर्णयानुसार १० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये प्रत्येकी एक कंत्राटी शिक्षक नेमला जाणार आहे. सोलापूर जिल्हा परिषदेच्या कमी पटाच्या ५३ शाळांमध्ये शासन निर्णयानुसार कंत्राटी शिक्षक भरले जातील. सामान्य प्रशासन विभागाकडून मान्यता मिळाल्यानंतर डिसेंबरअखेर कंत्राटी शिक्षक नियुक्तीची प्रक्रिया पूर्ण करण्याचे नियोजन आहे.

- कादर शेख, प्राथमिक शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद, सोलापूर
सोलापूर झेडपी शाळांची सद्य:स्थिती
एकूण शाळा २,७६६
२०पेक्षा कमी पटाच्या शाळा २४९
१०पेक्षा कमी पटाच्या शाळा ५३
शिक्षकांची एकूण रिक्तपदे ४३०

दरमहा १५ हजार रुपयांचे मिळणार मानधन दहापेक्षा कमी पटसंख्या असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये आता डीएड-बीएड शिक्षण झालेल्या तरुण-तरुणींना नियुक्ती दिली जाणार आहे. त्यांना नियुक्तीवेळी हमीपत्र द्यावे लागणार असून नियुक्तीनंतर पुन्हा त्या जागेवर कायम करण्याची मागणी ते करू शकणार नाहीत. सुरवातीला त्यांची नियुक्ती एका वर्षासाठी असणार आहे. ज्यांचे काम समाधानकारक वाटेल, त्यांना पुढे त्याठिकाणी मुदतवाढ दिली जाणार आहे. राज्यभरात डिसेंबरनंतर कंत्राटी शिक्षकांची भरती प्रक्रिया सुरु होणार आहे.
Reactions

Post a Comment

0 Comments