सोलापूरकरांची निराशा! निवडणुकीपूर्वीची घोषणा हवेत, विमानसेवेचा २३ डिसेंबरचा मुहूर्त रद्द - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, December 18, 2024

सोलापूरकरांची निराशा! निवडणुकीपूर्वीची घोषणा हवेत, विमानसेवेचा २३ डिसेंबरचा मुहूर्त रद्द

 सोलापूरकरांची निराशा! निवडणुकीपूर्वीची घोषणा हवेत, विमानसेवेचा २३ डिसेंबरचा मुहूर्त रद्द




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- मोठा गाजावाजा करत २३ डिसेंबरपासून सोलापूरमधून विमानसेवा सुरू होण्याची घोषणा ऐन निवडणुकीच्या तोंडावर करण्यात आली होती. मात्र विमानतळ प्राधिकरण आणि विमान कंपनी यांच्यातील रखडलेल्या कायदेशीर प्रक्रियेमुळे २३ रोजी होणारे पहिले उड्डाण रद्द करण्यात आले आहे.
फ्लाय ९१ या कंपनीकडून यासाठी धुक्यासह इंधन भरण्यासाठीच्या सुविधेचे कारण दिले आहे. 
विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू होण्यापूर्वी २६ सप्टेंबर रोजी होटगी रोड येथील विमानतळाच्या नूतनीकरणाच्या कामाचे उद्‌घाटन करण्यात आले होते. त्यानंतर काही दिवसांतच नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी सोलापूर दौऱ्यावर असताना २३ डिसेंबरपासून गोवा येथील फ्लाय ९१ कंपनीची विमानसेवा गोवा व मुंबई मार्गावर सुरू होणार असल्याची घोषणा केली होती.
मात्र, मागील अनेक दिवसांपासून विमान कंपनी आणि विमानतळ प्राधिकरण यांच्यातील विविध करार अजून बाकी असल्याचे सांगितले जाते. विमानासाठी लागणारे इंधन भरण्याची सुविधा सोलापूर विमानतळावर असावी, अशी विमान कंपनीची मागणी आहे.
त्याबरोबरच जर टॅंकरद्वारे पाकणी येथून इंधनपुरवठा करण्याची सोय करण्यात आली तर त्या इंधनासाठी सवलतीचे दर मिळावेत, यावरून विमानतळ प्राधिकरण आणि विमान कंपनी यांच्यात वाटाघाटी सुरू असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येते. डिसेंबर महिन्यामुळे इतर मार्गावरील विमानसेवांचा वाढता व्याप पाहता नवीन मार्गावर धुक्याच्या वातावरणात विमानसेवा सुरू करणे कठीण असल्याचे फ्लाय ९१ या कंपनीकडून सांगण्यात आले आहे.
संकेतस्थळ अद्ययावत होण्याची गरज
विमान प्राधिकरणच्या संकेतस्थळावर सोलापूर संदर्भात अत्यंत तोकडी माहिती आहे. विमानसेवा सुरू होण्याचा मुहूर्त जवळ आला तरही सोलापूर विमानतळाची माहिती देणारे संकेतस्थळ अद्ययावत करण्यात आलेले नाही. काही महिन्यापूर्वी बदली होऊन गेलेले विमानतळ व्यवस्थापन बनोत चांपला यांचेच नाव मागील दोन दिवसांपर्यंत या संकेतस्थळावर झळकत होते. 
या संकेतस्थळावर सोलापूर जिल्ह्यातील पर्यटनस्थळे, हॉटेल्स, टॅक्सी सेवा याबाबत कोणतीही माहिती संकेतस्थळावर प्रसिद्ध होताना दिसत नाही. यासाठी तयार करण्यात आलेले कॉलम रिकामेच आहेत. सोलापूर परिसरातील देवस्थाने व पर्यटनस्थळे याबद्दलची माहिती या संकेतस्थळावर असणे आवश्यक आहे.


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages