बांगलादेश येथील हिंदूना संरक्षण देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हस्तक्षेप करावे - कॉ. नरसय्या आडम
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- बांगलादेशात शेख हसीना यांची सत्ता उलथवून लावल्यानंतर झालेल्या सत्तांतरातील नेते अतिउजव्या बाजूने झुकल्याचे दिसून येत असून एकूणच अमेरिकेसारख्या साम्राज्यवादी व भांडवली बलाढ्य राष्ट्राची नवीन स्थापन झालेल्या सरकारला समर्थन असल्याचे बोलले जात आहे. याचा परिणाम म्हणून तेथील कांही असंतुष्ट वर्गाने दंगली व हल्ले करण्याचा कट चालविला असून यात अल्पसंख्यांक मुख्यतः हिंदूंवर हल्ले चालू आहेत. त्यामुळे तेथील अल्पसंख्यांक मदतीची हाक देत आहेत.
अशा परिस्थितीत तेथील हिंदूना व त्यांच्या मंदिरांना संरक्षण मिळणे आवश्यक असून तसे होताना दिसून येत नाही. या प्रकरणी सर्वच स्तरावरून मुगगिळून गप्प बसण्याची प्रवृत्ती दिसून येत आहे. एकाद्या देशामध्ये बहुसंख्यांकडून अल्पसंख्यांकाची, वंचित व उपेक्षितांची गळचेपी करण्याच्या दृष्टीने त्यांच्यावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराविरुद्ध जागतिक पातळीवर दखल घेण्याची गरज आहे. बांगलादेशातील हिंदू अल्पसंख्यांकांना व त्यांच्या मंदिरांना संरक्षण मिळण्याच्या दृष्टीने जागतिक व्यासपीठावर प्रश्न मांडण्याची आवश्यकता आहे आणि त्यासाठी मोदी सरकारने योग्य ते प्रयत्न केले पाहिजेत. अशी मागणी माकपाचे ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार कॉ. नरसय्या आडम (मास्तर) यांनी जिल्हाधिकारी कार्यालय येथे झालेल्या निदर्शनात केली.
शनिवार दि. १४ डिसेंबर २०२४ रोजी भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी) जिल्हा समितीच्या वतीने बांगलादेश येथील अमानवी घटना आणि महाराष्ट्रातील संविधान प्रती नुकसानीच्या निषेधार्थ तीव्र निदर्शन पार पडले.
यावेळी सर्व कार्यकर्ते काळेवस्त्र परिधान करून काळ्याफिती लावून, काळे झेंडे घेऊन निषेधाचे फलक दाखवून गगनभेदी आवाजात घोषणा दिले व घटनेचा निषेध व्यक्त केले. तद्नंतर कॉ. युसुफ शेख (मेजर) यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाद्वारे जिल्हाधिकारी कार्यालय गृहशाखा तहसीलदार बालाजी बनसोडे यांना निवेदन देण्यात आले. या शिष्टमंडळात कॉ. व्यंकटेश कोंगारी, ॲड.अनिल वासम शंकर म्हेत्रे, रंगप्पा मरेड्डी, सुनंदा बल्ला, दत्ता चव्हाण, मारेप्पा फंदीलोलू आदींचा समावेश होता.
यावेळी माकपाचे जिल्हा सचिव कॉ. एम.एच.शेख यांनी प्रास्ताविकात म्हणाले कि, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे परभणी शहरातील स्मारकाजवळील संविधानाच्या प्रतिमेची समाजकंटकांकडून दि.१० डिसेंबर २०२४ रोजी तोडफोड करण्याचा प्रयत्न करण्यात आला. सदरच्या घटनेतील आरोपीतांनी सामाजिक सांप्रदायिक सद्भावनेला हरताळ फासला आहे. म्हणूनच संबंधितावर गुन्हा दाखल करण्यात यावा व सदरच्या घटनेतील आरोपीच्या मागे कोणता कुटील डाव आहे का? याचा शोध घेण्यात यावा. सदर घटनेची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे.
परभणी येथील आंबेडकरी चळवळीतील सामाजिक कार्यकर्त्यांवर जे काही खोटे गुन्हे दाखल करण्यात आले व येत आहेत, ते त्वरित थांबविण्यात यावे. तसेच सदरच्या घटनेतील मुख्य सूत्रधारास मनोरुग्ण ठरवण्याचा प्रयत्न करून सदरच्या निंदनीय घटनेवर पांघरून घालण्याचा प्रयत्न होत असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. म्हणूनच सदरच्या घटनेची उच्च स्तरावर चौकशी झाली पाहिजे. व दोषींवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी. सध्या पोलीस प्रशासनाकडून निरपराधांवर जो अन्याय सुरू आहे, तो तत्काळ थांबवण्यात यावा. तर परभणी येथे घडलेल्या निंदनीय घटनेतील मुख्य सूत्रधाराचा शोध घेऊन त्यास कठोरात कठोर शिक्षा देण्यात यावी. भारतीय राज्यघटनेच्या संविधानाचे संरक्षण आणि त्याचा सन्मान जपण्यात यावे.
या प्रसंगी युसुफ शेख (मेजर), कॉ. व्यंकटेश कोंगारी, शंकर म्हेत्रे, रंगप्पा मरेड्डी, म.हनीफ सातखेड, सुनंदा बल्ला, ॲड.अनिल वासम आदींची उपस्थिती होती.
यावेळी सलीम मुल्ला, विल्यम ससाणे, विक्रम कलबुर्गी,मुरलीधर सुंचु, दीपक निकंबे, दाउद शेख,अकील शेख,प्रशांत म्याकल, अशोक बल्ला,शकुंतला पानिभते, लिंगव्वा सोलापूरे, इलियास सिद्दीकी,सनी शेट्टी, बाळकृष्ण मल्याळ,विजय हरसूरे, मल्लेशाम कारमपुरी, वसीम मुल्ला,वीरेंद्र पद्मा,रफिक काझी, शाम आडम, आदीसह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन ॲड अनिल वासम यांनी केले.
0 Comments