संतोष देशमुख प्रकरणातील आरोपींच्या अटकेसाठी, बीडमध्ये निघणार मूकमोर्चा
वाहतुकीमध्ये मोठे बदल; पर्यायी मार्ग कोणते?
बीड (कटूसत्य वृत्त):- बीडच्या मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरून नागरिक आक्रमक झाले आहेत. या हत्या प्रकरणानंतर संतप्त झालेल्या नागरिकांनी शनिवारी महामूक मोर्चाचे आयोजन केले आहे.
आज बीडमध्ये निघणाऱ्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मोठी वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बीडमधील वाहतूक मार्गात अनेक बदल करण्यात आले आहेत. सकाळी आठ ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत वाहतूक मार्गात हे बदल राहणार आहेत. त्यामुळे नागरिकानी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आवाहन केले जात आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणी विविध मागण्यांसाठी शनिवारी महामूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक कोंडी होऊन नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी बीड शहरामध्ये येणाऱ्या वाहतूक मार्गात बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे ही वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्याचे आदेश पोलिस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी काढले आहेत.
विविध पक्षांच्या नेत्यांच्या बैठका, संघटनांच्या आवाहनामुळे मोर्चा मोठा निघेल, असा अंदाज असून त्यादृष्टीने आता पोलिसांकडूनही बंदोबस्ताची तयारी केली जात आहे. ता. नऊ डिसेंबरला संतोष देशमुख यांचे अपहरण करुन निर्घृण खुन करण्यात आला.
याप्रकरणात सात जणांवर गुन्हा नोंद असून अद्याप तीन प्रमुख आरोपी फरार आहेत. तर, मारहाण व खंडणीतील देखील दोन आरोपी फरार आहेत. ज्या पवनचक्कीवर खंडणी मागीतल्याची घटना घडली त्याचाच या खुनाच्या घटनेचा संदर्भ असल्याने या घटनेच्या सुत्रधारावरही गुन्हा नोंद करावा, सर्व आरोपींना अटक करावी, जिल्ह्यातील दहशत कमी करावी, आदी विविध मागण्यांसाठी सर्वपक्षीय मोर्चाचे नियोजन करण्यात आले आहे.
मोर्चाच्या तयारीसाठी जिल्हाभरात बैठकाही घेतल्या जात आहेत. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करुन शनिवारी सकाळी ११ वाजता मोर्चाची सुरुवात होईल.दरम्यान, खुनाच्या घटनेला १६ दिवस उलटले आहेत.
या घटनेतील मुख्य आरोपी अद्याप अटक नाही. तसेच, या घटनेमागील सुत्रधार शोधावा, घटनेवेळी आरोपींनी कोणाला व्हिडीओ कॉल केले, व्हिडीओ पाठविले याचा शोध घ्यावा, तसेच विविध चार घटनांच्या अनुषंगाने संबंधीतांचे कॉल डिटेल्स शोधण्याच्या मागणीमधील जोर आणि या घटनेबाबतचा जिल्ह्यात संताप कायमच आहे.
बीडमध्ये संदीप क्षीरसागर, मराठा सेवक, मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयकांनी नियोजन बैठकीनंतर आता सर्कलनिहाय बैठका घेतल्या जात आहेत. भाजपचे आमदार सुरेश धस यांनीही मोर्चात सहभागाचे आवाहन करत आपणही सहभागी होणार असल्याचे सांगीतले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश सोळंके यांनीही मोर्चात सहभागाचे आवाहन केले आहे. विविध संघटनांसह मुस्लिम संघटनांनीही मोर्चाला पाठींबा देत सहभागाचे आवाहन केले आहे. त्यामुळे वरचेवर मोर्चाला व्यापक रुप येत आहे.
0 Comments