राज्यातील कारखान्यांचा साखर उतारा चिंताजनक; ऊस मिळवण्यासाठी साखर कारखान्यांची धडपड
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- साखर कारखान्यांचे ऊस गाळप सध्या जोमात सुरु झाले आहे. राज्यातील १८३ साखर कारखान्यांनी गाळप हंगाम सुरु केला आहे. दरम्यान राज्यातील सर्व साखर कारखान्यांना मिळणारा साखर उतारा मात्र चिंताजनक असल्याचे समोर आले आहे.
साखर उतारा कमी मिळत असल्याने त्याचा थेट परिणाम ऊस दरावर होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमधून ऊस दराविषयी काळजी व्यक्त केली जात आहे.
राज्यातील कोल्हापूर, सांगली, सोलापूर आणि पुणे जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी ऊस गाळपात जोरदार मुंसडी मारली आहे. राज्यात आज अखेर सुमारे २०६ लाख ९९ हजार टन ऊसाचे गाळप केले असून १७६ लाख ८१ हजार क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. सततचा दुष्काळ आणि फळ बागांकडे वाढलेला शेतकऱ्यांचा कल. यामुळे यंदा ऊसाचे क्षेत्र कमी झाले आहे.
ऊस दराची होणार स्पर्धा
ऊस कमी असल्याने आतापासूनच ऊस मिळवण्यासाठी साखर कारखान्यांची धडपड सुरु झाली आहे. यातूनच ऊस दराची स्पर्धा देखील सुरु झाली आहे. दरम्यान साखर उतारा कमी मिळत असल्याने याचा थेट परिणाम ऊस दरावर होणार आहे. या हंगामात अपेक्षित साखर उतारा मिळाला नाही; तर अनेक साखर कारखान्यांना जाहीर केलेला ऊस दर देणे मुश्किल होणार आहे.
उतारा वाढविण्यासाठी प्रयत्न
सरासरी साखर उतारा फक्त ७.४९ टक्के इतका आहे. राज्यात सर्वाधिक ९.५३ टक्के साखर उतारा कोल्हापूर विभागाचा आहे. छत्रपती संभाजीनगर विभागातील साखर कारखान्यांनाचा सर्वाधिक कमी ६.८८ टक्के इतका साखर उतारा आहे. तर पुणे विभागाचा ८.२२ टक्के साखर उतारा आहे. तुलनेने नांदेड, अमरावती आणि नागपूर या विभागातील कारखान्यांचा साखर उतारा जेमतेम असाच आहे. साखर उतारा वाढविण्यासाठी साखर कारखान्यांनी वैयक्तिक पातळीवर प्रयत्न सुरु केले आहेत.
राज्यात सर्वाधिक साखर कारखाने अशी ओळख असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील २८ साखर कारखान्यांमध्ये ऊस गाळप सुरु आहे. यामध्ये १८ खासगी तर १० सहकारी साखर कारखान्यांचा समावेश आहे. आज अखेर सोलापूर जिल्ह्यात ३० लाख २३ हजार ९८० टन ऊसाचे गाळप झाले आहे. तर २२ लाख ६४ हजार १८ क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. तसेच कोल्हापूर विभागातील ३९ कारखान्यांनी ४६ लाख ९३ हजार टन ऊसाचे गाळप केले आहे. तर ४४ लाख ७२ हजार क्विंटल साखर उत्पादन घेतले आहे.
0 Comments