अकलूज आरोग्य विभागातील कर्मचारी नितीन पेटकर ॲन्टी करप्शनच्या जाळ्यात
अकलूज (कटूसत्य वृत्त):- अकलूज नगरपरिषदेत स्वच्छता निरिक्षकाला कामाच्या मंजुरीसाठी दोन लाख रुपयांची मागणी केल्यावरुन लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई करीत ताब्यात घेतले.
याबाबत अधिक माहिती अशी,नितीन सिद्राम पेटकर वय ४० वर्षे रा.अक्कलकोट हे सध्या अकलुज नगरपरीषदेमध्ये आरोग्य निरीक्षक पदावर काम करीत होते.तक्रारदार यांची श्री गणेश इंडस्ट्रीयल सर्व्हिसेस, बारामती नावाची कंपनी नगरपालिकांना साफ सफाई व इतर कामांकरीता मनुष्यबळ पुरवठा करते.सदर कंपनीच्या वतीने विविध आस्थापनांशी समन्वय साधुन टेंडर भरणे, मनुष्यबळ पुरवणे,पत्रव्यवहार करणे,वेतनासाठी निधी प्राप्त करून घेणे इ.शासकीय कामे करतात.
अकलूज नगर परिषदेने शहरातील रस्ते,बाजारपेठा, गाळे,शौचालय साफ सफाई करणेकामी मनुष्यबळ पुरवठा करणेकरीता प्रसिध्द केलेले निविदा श्री गणेश इंडस्ट्रीयल सर्व्हिसेस,बारामती यांना मंजुर झाले.कंपनीने मनुष्यबळ पुरवठा केला होता.निविदा दर मंजुर करून वर्क ऑर्डर देताना नितीन पेटकर यांनी तक्रारदार यांचेकडे कामगारांच्या मासिक वेतनाच्या बिलाच्या तीन टक्के रक्कम व वर्क ऑर्डर मंजुरीसाठी म्हणजेच सुमारे १ लाख ९५ हजार रूपये लाचेची मागणी केली.त्यावरुन स्वच्छता निरिक्षक नितीन पेटकर यांचे विरूध्द अकलूज पोलीस ठाणे,सोलापूर ग्रामीण येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदरची कामगिरी पोलीस निरिक्षक गणेश पिंगुवाले,पोलीस अंमलदार कोळी,पो.ना.संतोष नरोटे,पोह.राहुल गायकवाड या लाच लुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी यशस्वीरित्या पार पाडली.
0 Comments