Hot Posts

6/recent/ticker-posts

या पुढील काळातही मतदारसंघाच्या सर्वांगीण हितासाठी वचनबद्ध राहणार - माजी आमदार राजन पाटील

 या पुढील काळातही मतदारसंघाच्या सर्वांगीण हितासाठी वचनबद्ध राहणार - माजी आ.राजन पाटील

अनगर (कटूसत्य वृत्त):-गेल्या चार दशकापासून सत्ता ताब्यात ठेवू शकलेल्या माझ्या आणि माझ्या परिवाराबद्दल मतदार संघातील काही लोकांच्या मनात आकस भावना होती आणि त्याच आकस आणि द्वेष भावनेतून संपूर्ण मतदारसंघांमध्ये माझ्याबद्दल आणि माझ्या उमेदवाराबद्दल नकारात्मकता निर्माण करून केलेल्या पराभवाबद्दल मी माझ्या पक्षातील कोणतेही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना आणि मतदार बांधवांना दोष देत नाही. मी या पराभवाची जबाबदारी स्वीकारतो, एका निवडणुकीतील पराभवाच्या अपयशाने खचून जायचे नाही, आगामी निवडणुकीमध्ये नव्या उमेदीने कामाला लागू असे आवाहन मोहोळचे माजी आमदार तथा राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष राजन पाटील यांनी अनगर येथे केले.

नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर पराभवानंतर आलेली मरगळ झटकून टाकण्यासाठी राष्ट्रवादी आणि महायुतीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा अनगर येथे आयोजित करण्यात आला होता, यावेळी राजन पाटील कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

व्यासपीठावर माजी आमदार यशवंत माने, लोकनेते शुगरचे चेअरमन बाळराजे पाटील, सिनेट सदस्य अजिंक्यराणा पाटील, कल्याणराव पाटील, सुनील भोसले पांडुरंग ताटे, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष वर्षा शिंदे, भाजपचे संजीव खिलारे, शिवसेनेचे दादासाहेब कारणावर, दादासाहेब पवार यांच्यासह महायुती आणि राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते. राजन पाटील पुढे म्हणाले की यशवंत माने यांच्यासारख्या अत्यंत धडपडी आणि कार्यक्षम उमेदवाराची निवड या निवडणुकीसाठी मी केली होती. या पुढील काळातही कधी असा आमदार मोहोळ तालुक्याला कधीच मिळू शकणार नाही अशा शब्दात त्यांनी आ. यशवंत माने यांच्या विकासात्मक कार्याचे कौतुक केले. निवडणुकीत विजयी झालेल्या आमदारांचे अभिनंदनच करतो. विकासात्मक बाबतीत त्यांनी कधी सहकार्याची अपेक्षा केली तर त्यांना मोहोळ मतदारसंघाच्या सर्वांगीण हिताच्या उदात्त भावनेतून आमचीही सहकार्याची भूमिका निश्चितपणे राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी प्रास्ताविक करताना बाळराजे पाटील म्हणाले,  विकासावर मते मिळत नसतात ही बाब या निकालावरून लक्षात आली आहे.  संघर्ष करावा लागला तरी चालेल मात्र विरोधकांना त्यांच्याच शैलीने प्रत्युत्तर देणे अंगीकारावे करावे लागेल, असेही यावेळी बाळराजे म्हणाले.

यापुढील काळातही मोहोळ, उत्तर सोलापूर आणि पंढरपूर तालुक्यातील मतदार बंधू-भगिनींच्या सर्वांगीण हितासाठी राजन मालक यांच्या नेतृत्वाखाली निष्ठेने कार्यरत राहणार आहे. अजित पवार आणि राजन मालक यांच्यावर प्रेम करणाऱ्या जनतेने दिलेले पाठबळ कधीही विसरू शकणार नाही.
- यशवंत माने

 कोणत्याही आमिषाला बळी न पडता राष्ट्रवादी महायुतीचे उमेदवार यशवंत माने यांना निरपेक्ष भावनेने पक्षाला मतदान करणाऱ्या सर्व कार्यकर्ते आणि मतदार बंधू-भगिनींचे कृतज्ञतापूर्वक आभार मानतो. ज्या मतदारांनी कार्यकत्यांनी मेहनत घेतली त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा मेळावा आहे. कोणीही काळजी करू नये  प्रथमच ही निवडणूक विकासाच्या मुद्याऐवजी अमिष, प्रलोभनाच्या जोरावर हायजॅक करून लढवली. राजकारणामध्ये अपयश आणि चढउतार होतच असतात, तरीही कार्यकत्यांनी हताश न होता यापुढेही विकासाच्या ध्येयातून कार्यरत रहावे. यापुढेही कोणत्याही कार्यकर्त्यांला वाऱ्यावर न सोडता या पुढील काळातही मतदारसंघाच्या सर्वांगीण हितासाठी वचनबद्ध राहणार आहे.
-राजन पाटील, 


यावेळी कल्याणराव पाटील, पांडुरंग ताटे, माऊली जाधव, मदन पाटील, दादासाहेब पवार, संजीवदादा खिलारे, राहुल कसबे, महेश पवार, ज्योत्स्ना पाटील, नागेश साठे, जगन्नाथ कोल्हाळ, वर्षा शिंदे यांनीही आपापली मनोगत व्यक्त केले.
Reactions

Post a Comment

0 Comments