Hot Posts

6/recent/ticker-posts

माझ्या आठवणीतले महास्वामीजी : तपोरत्नं योगीराजेंद्र शिवाचार्य महास्वामीजी

 माझ्या आठवणीतले महास्वामीजी : तपोरत्नं योगीराजेंद्र शिवाचार्य महास्वामीजी 




           भारतात विशेषत: महाराष्ट्र आणि कर्नाटकत वीरशैव धर्माचे लोक बहुतांश आहेत. वीरशैव संप्रदायात रंभापुरी, उज्जैयिनी, केदार , श्रीशैल व काशी अशी पंचपीठे आहेत. बृहन्मठ  होटगी हा श्रीशैल पीठाचा शाखा मठ आहे. पंचाचार्य जगदगुरूंच्या आशीर्वादाने होटगी मठावर अनेक शिवाचार्य आरुढ झाले. लिं.श्री प.पू.चनबसव  शिवाचार्य महास्वामीजी नंतर लिं.प.पू. वीरतपस्वी चन्नवीर शिवाचार्य महास्वामीजींनी होटगी मठाची उन्नती केली. ६ फेब्रुवारी १९५६ रोजी महास्वामीजी लिंगैक्य झाले. त्यांनी तत्पूर्वी उत्तराधिकारी म्हणून तपोरत्नं योगिराजेंद्र शिवाचार्य महास्वामीजींची होटगी मठावर नेमणूक केली.
 तपोरत्नं योगिराजेंद्र शिवाचार्य महास्वामीजी हे मूळचे तालुका देवदुर्ग जिल्हा रायचूर येथील आंचेसुगुर येथील माता गुळम्मा व पिता कोडय्या यांच्या पोटी १९ एप्रिल १९३० रोजी जन्माला आले. त्यांचे बालपणाचे नाव गुरुबसय्या होते. त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण आंचेसुगुर येथे झाले. त्यानंतर त्यांना वैदिक शिक्षणासाठी आई-वडिलांनी श्री बृहन्मठ  होटगी मठात आणून सोडले. तेथून माता-पिता यांना गावी परतत असताना पाहून गुरुबसय्या हळवे झाले व त्यांच्या डोळ्यात पाणी आले. तेव्हा गुरुचन्न्वीर  यांनी त्यांच्या डोक्यावर हात ठेवून त्यांना म्हणाले“ बाळा केदारनाथा रडू नकोस”. तेव्हा पासून ते गुरुबसय्याचे  केदारनाथ झाले. केदारनाथाची अफाट, अचाट अशी बुद्धिमत्ता व दांडगी स्मरणशक्ती पाहून त्यांना पुढील शिक्षणासाठी महास्वामीजींनी  बेंगळूर संस्कृत पाठशाळेत पाठवले. तेथे उत्तम ज्ञान घेऊन  'संस्कृत पंडित' ही पदवी त्यांनी मिळवली. या काळात चन्नवीर शिवाचार्य महास्वामीजी यांचे शिखर शिगणापूर श्रावण मास अनुष्ठान सुरू होते. अनुष्ठानच्या समाप्तीवेळी त्यांनी केदारनाथला  शिखर शिंगणापूरला बोलवून घेतले. १०ऑक्टोबर १९५३ रोजी शिखर शिंगणापूरच्या शंभू महादेव भंडारगृहाचे मठाधिपती म्हणून पट्टाभिषेक करून  'योगिराजेंद्र'  असे नामाभिधान केले. तेव्हा पासून श्री योगिराजेंद्र शिवाचार्य महास्वामीजी शंभू महादेव भंडार गृहाचे मठाधिपती म्हणून शिखर शिंगणापूर येथे वास्तव्य करू लागले. ३ फेब्रुवारी १९५६ रोजी चन्नवीर शिवाचार्य महास्वामीजींची प्रकृती खालवल्याने श्री योगीराजेंद्र महास्वामीजींना शिखर शिंगणापूर येथून बोलावून घेण्यात आले. ६ फेब्रुवारी १९५६ रोजी चन्नवीर शिवाचार्य महास्वामीजी लिंगैक्य झाले. त्यांचे इच्छेनुसार श्री योगीराजेंद्र शिवाचार्य महास्वामीजींचा श्री बृहन्मठ  होटगी  मठाचे मठाधिपती  म्हणून पट्टाभिषेक करण्यात आला. तेव्हापासून श्री योगीराजेंद्र महास्वामीजी श्री बृहन्मठ होटगी मठाचे कारभार  पाहू लागले.     
   श्री योगीराजेंद्र महास्वामीजीची आपल्या गुरुवर नितांत श्रध्दा व निष्ठा होती. महास्वामीजींना आपल्या गुरूंचा वियोग एवढा असहय झाला होता की, त्यांनी स्वतःस एका खोलीत कोंडून घेतले. तीन दिवस त्यांनी अन्नाचा, पाण्याचा त्याग केला. "का तुम्ही जाण्याची घाई केलात ? ” म्हणून ते त्यांना आळवू लागले. त्यांना माहिती होते की, श्री बृहन्मठ  होटगी मठाचे उत्पन्न अत्यंत तोटके असून ही गुरुवर्य गुरुकुलाची, सिध्दलिंग आश्रमाची उत्तम व्यवस्था ठेवीत. दरमहा बेंगलोरला माझ्या शिक्षणासाठी न चूकता पैसे पाठवीत असत. त्यांना स्वतःला पुढच्या शिक्षणासाठी काशीला जायचे होते. पण त्यांनी स्वतःची मनोकामना दूर ठेवून माझ्यासाठी अनेक अडचणींना तोंड देत, माझ्या शिक्षणाचा भार उचलला अशा गुरूंच्या सेवेची संधी मला न देता तडकाफडकी ते मधेच मला सोडून का गेले ? त्यांनी अचानक माझा पट्टाभिषेक शिखर शिंगणापूर मठावर का केला ? त्यांना काही ईश्वरी संकेत मिळाले असतील   का ?” असे अनेक प्रश्न पडू लागले. अशाच तिसऱ्या दिवशी पहाटे त्यांना झोपेतच महास्वामीजींचा दृष्टांत झाला. “ केदारनाथ आता तू श्री बृहन्मठ  होटगी  मठाचा मठाधिपती झाला आहेस. तुला हे शोक अशोभनीय आहे. तू माझे अपुर्ण राहिलेले संकल्प पुर्ण कर. मी जरी शिवैक्य झालो तरी माझी आत्मज्योत सदैव तूझ्या हृदयात तेवत ठेव.” गुरु आत्म्याच्या साक्षात्काराने महाराजांना खडबडून जाग आली. गुरू माऊलीची तेजस्वी विलोभनीय मुर्ती, डोक्यावरील रुद्राक्षाने बांधलेल्या जटा, कपाळावरील भस्म,  हातातील  सिद्धांत शिखामणी  डोळ्यासमोरून क्षणभर  हलतच नव्हते.
'योगियाने योग्या सारखे व्रतस्थ राहावे' हा गुरूमंत्र जपत त्यांनी गुरुसाठी शोक करणे बंद केले. व व्रतस्थ  जीवन अंगिकारले व आपल्या गुरूंना त्यांनी कायम वेगवेगळया शैक्षणिक शाखेस नाव देत आजीवन जिवंत ठेवले.
 आपल्या गुरूंची इच्छा पूर्ण करण्यासाठी योगीराजेंद्र  शिवाचार्य यांनी १९५८ मध्ये श्री बृहन्मठ  होटगी शिक्षण संस्था स्थापन केली. समाजाला अंधश्रध्देपासून  दूर करून श्रध्देकडे नेण्यासाठी शिक्षण हा  एकमेव मार्ग आहे हे त्यांनी ओळखले व प्रत्येक  खेड्यात एक अशी शैक्षणिक शाखांची  स्थापना ते करु लागले. १९५९ मध्ये होटगी व बोरामणी या गावात संस्थेच्या दोन माध्यमिक शाळा सुरू केल्या. त्यानंतर धोत्री, लिंबीचिंचोळी, बोरेगांव, अरळी, सातन दुधनी, दर्गनहळळी ,विडी घरकुल, भवानी पेठ, एम.आय.डी.सी. अक्कलकोट रोड सोलापूर येथे पुर्व प्राथमिक, प्राथमिक , माध्यमिक, उच्च माध्यमिक, अध्यापक विद्यालय, वसतीगृह, वाचनालयाची स्थापना त्यांनी केली. प्रत्येक शाळा या  भौतिक सुविधेने  सुसज्ज केल्या. स्थापत्य शास्त्राचा महास्वामीजींना दांडगा अभ्यास असल्यामुळे संस्थेची इमारत, मंदीर निर्माण,  राजगोपूर  बांधताना ते स्वतः मार्गदर्शन करीत. संस्थेचा विस्तार पाहून जुन्या प्रिटींग प्रेसचे नूतनीकरण केले.
 धर्म व शिक्षण एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. ही वीरतपस्वी महाराजांची शिकवण आयुष्यभर त्यांनी  आचरणात आणली. श्री  मद्वीरशैव गुरुकुलात शिक्षण घेवून अनेक बटू हे मठांच्या गादीवर मठाधिपती म्हणून विराजमान झाले. व काही जण जगदगुरु ही झाले.त्या पैकी श्री श्री श्री १००८ ज्ञानसिंहासनाधिश्वर डॉ.चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी काशीपीठ व श्री श्री श्री १००८ वैराग्यसिंहासनाधीश्वर भीमाशंकरलिंग शिवाचार्य महास्वामीजी जगदगुरू केदार पीठ. श्री मव्दिरशैव  मठामध्ये शिक्षण घेणाऱ्या बटुवर महाराजांचा दरारा असा काही होता की, मठामधून बाहेर पडलेल्या बटूंमध्ये शिस्तपालन, स्वावलंबन ,कष्ट करण्याची प्रवृत्ती, एकमेकांना सहकार्य करणे, अभ्यासूवृत्ती असे सर्व गुण अंगी यायचे. 
तळवारगेरी हे आदिवासी क्षेत्रातील गाव. आपल्या गुंरुचे जन्मस्थान असल्याने या ठिकाणी महास्वामीजींनी नवीन मठ व कन्नड माध्यमाची शाळा काढली. तसेच तुळजापूर येथे देखील मठ व भक्तनिवासाची स्थापना त्यांनी केली. आजमितीस श्री बृहन्मठ होटगी मठाचे एकूण महाराष्ट्र, कर्नाटक व दिल्ली येथे व इतरत्र शाखा महास्वामीजींनी स्थापन केलेले आपणास आढळतात .आपल्या गुरुने दाखविलेल्या अध्यात्मिक मार्गावर मार्गक्रमण करताना ते श्रावण मासात ४१ दिवस, धनुर्मासात ३० दिवस, नवरात्रीत ९ दिवस तपोनुष्ठान व महापूजा करीत असत. महापूजेच्या  दरम्यान महास्वामीजी सहा ते आठ तास पद्मासनात बसत असे. पद्मासनात बसलेल्या महास्वामीजीच्या मुखकमलावर एक वेगळे तेज तळपायचे. त्यांच्या कपाळावरील भस्म, हात, दंड, मनगट, खांदा, शूळ, हृदय, पाठीवर नजरेत भरेल असे भस्म शोभायचे. गळ्यात भगव्या वस्त्रात बांधलेले मोठे इष्टलिंग, दोन्ही हाताच्या मनगटावर रुद्राक्ष माळा, गळ्यात मोठी रुद्राक्षांची माळ, मस्तकावर जटा एका रुद्रांक्षानी घट्ट बांधलेली असे. साक्षात शिवाचा अवतार जणू पृथ्वीवर अवतरल्या सारखा भास होत असे जर पृथ्वीवर देव - देवता असले असते तर नक्की याहून वेगळे नसते. महाराज स्वतःमध्ये तल्लीन होऊन अशी इष्टलिंग पूजा करत; जणू काही समोर चेतानावस्थेत शिव पार्वती बसले आहेत. पूजा चालू असताना महास्वामीजींना पूजेत कसलेही विघ्न आलेले चालत नसे, पूजा शास्त्रोक्त पद्धतीने व्हायची. पूजा करताना म्हणण्यात येणारे मंत्र, नमक ,चमक ,भावगीत, प्रार्थना, भजन यातील उच्चार, ताल, लय चुकता कामा नये असा कडक दंडक होता. पूजेसाठी तबलावादक म्हणून कैलासवासी श्री. सिद्धरामय्या हिरेमठ, हार्मोनियम वादक म्हणून कैलासवासी श्री. शिवानंद बिराजदार ,भजनी मंडळात शिला बिराजदार, कमलाबाई रामचंद्र बिराजदार,पार्वती महादेव कारंजे, शकुबाई सिध्दाराम कारंजे, सुगलाबाई मुनाळे, सरुबाई कांरजे व  सुमन गदगे यांचा संघ सदैव तत्परतेने तयार असायचा. त्यांनी आपले अनुष्ठान जगदगुंरुच्या पंचपीठाच्या क्षेत्री, भारतातील वेगवेगळ्या तीर्थक्षेत्रांच्या स्थानी, नदीच्या काठी, मंदिरात मठात, ग्रामीण भागातील वाड्यावर- वस्तीवर केले. अनुष्ठानाच्या ठिकाणी आप्पावरु धर्मग्रंथाचे पारायण किंवा प्रवचनाचे आयोजन करीत. या कार्यक्रमांमधून धार्मिक शिक्षणाचा प्रसार तर होतच होता सोबत शिष्यांना धर्माचे ज्ञानही मिळे व भारतीय संस्कृतीची जोपासना करण्यास शिकवत असत. सिद्धेश्वर महाराजांच्या मंदिरात प्रत्येक श्रावण महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी महाराष्ट्र ,कर्नाटक राज्यातील सर्व देवतांच्या पालख्या भेटीसाठी येतात. दरवर्षी १०१ पालख्या न चुकता येतात. ही पालखी वारीची संकल्पना आप्पावंरुचीच. पालखीबरोबर येणाऱ्या सर्व भक्तगण जवळजवळ चार ते पाच हजार लोकांची जेवण्याची, झोपण्याची, विश्रांतीची व्यवस्था आप्पावरु एम.आय.डी.सी. येथील भव्य अशा अन्नछत्रामध्ये करत.दर्शन घेण्यासाठी आलेल्या भक्तगणांना महास्वामीजी शुद्ध गाईचे दुध व खडीसाखर प्रसाद म्हणून देत असत.भक्तांसोबत मनमोकळयां गप्पा मारत. भक्त त्यांना आपल्या घरगुती अडचणी सांगत, कोर्ट कचेरीच्या संदर्भात आप्पावरुकडून मार्गदर्शन घेत असत. लग्नकार्य, खरेदी, विक्री, अशा अनके गोष्टीवर भक्तगण महास्वामीजींचा सल्ला घेत. भक्ता सोबत एक वेगळ नातं प्रस्थापित करणारे ते गुरूमाऊली म्हणून प्रसिध्द आहेत. शालेय शिक्षणाबरोबर पौरोहित्याचे शिक्षण मिळावे म्हणून प्रत्येक वर्षी ते मे महिन्यात पौरोहित्याचे शिबिर आयोजित करत. त्या शिबिरात शास्त्रशुद्ध पद्धतीने विद्यार्थ्यांना धार्मिक विधी शिकविले जात. महास्वामीजी सदर शिबिरात जातीने लक्ष देत असत. 
श्रावणमास, गुरुपौर्णिमा, महाशिवरात्र, गुरुकुलाचा वर्धापन दिन, श्री वीरतपस्वी महाराजांची पुण्यतिथी अशा अनेक प्रसंगी सर्व भक्तासाठी  प्रसादाची सोय महास्वामीजी करायला लावत असत. भक्तासाठी त्यांच्या शिक्षणाची ,प्रसादाची, विश्रांतीची सोय करणारे महास्वामीजी स्वतः मात्र पत्र्याच्या शेडमध्ये  राहत असत. स्वतःच्या विश्रांतीसाठी चटईचा वापर करत. आपल्या प्रत्येक संस्थेला त्यांनी आपल्या गुंरुचे नाव दिले.तपोरत्न योगीराजेंद्र शिवाचार्य महास्वामीजींनी प्रत्येक मठात आपल्या गुरुंचे मंदिर बांधलेले आहे. समाजातील भक्तगणांना त्यांची ओळख आपल्या कार्यातून करून दिली. गुरुचे ऋण कसे फेडावे ? या ऋणातून मुक्तता तर सहज कोणाला मिळतच नाही   पण प्रयत्न मात्र महास्वामीजी सारखा  करावा. अगदी शून्यातून त्यांनी राजेशाही थाटातील मंदिराची, मठाची उभारणी केली. मठाला एक अभेद्य अशा भक्तांची मांदियाळी उभी करून दिली. साधा एक पैसा ही स्वतःच्या नावावर त्यांनी त्यांच्या हयातीत ठेवलेला नाही. उच्च विचारांच्या संतांची ओळख म्हणजेच निर्मोही, निस्पृह असे त्यांचे व्यक्तिमत्व असते . आप्पापण वैराग्याधिश्वरच ! त्यांना कशाचाही मोह नव्हता. अगदी मठाधिपती झाल्यापासून ते त्यांच्या अंतिम क्षणापर्यंत. स्वतःच्या हक्काचं असताना देखील त्यांनी कोणत्याही भौतिक सुखासीन साधनेस स्पर्श केले नाही. भक्तांच्या मागणीवरून १९८२ साली त्यांनी जीप घेतली. जीपमध्ये ते ड्रायव्हरच्या बाजूला आसनस्थ होत असत. भक्त दिसले की गाडी बाजूला घ्यायला सांगत. खुल्या जीपमध्ये भक्तांना आप्पाच्या चरणांना स्पर्श करुन दर्शन घेणे सोयीचे होत असे. अनेक भक्तांनी एसीची गाडी महास्वामीजींना भेट म्हणून देण्याची इच्छा व्यक्त केली पण महास्वामीजीनी नम्रपणे त्यांना नकार दिला. एकदा मठाचे मठाधिपती म्हणून अभिषेक झाला की मठाधिपतींना नाती राहत नाहीत.  मठ संप्रदायाचा हा नियम आप्पावरूनीही तंतोतंत पाळला. खास आमंत्रणा शिवाय ,त्यांच्या अटी मान्य केल्याशिवाय अनेक स्वामी, मठाधिपती भक्ताच्या घरी कधीही जात नाहीत. पण आप्पांचे मात्र निराळेच होते; त्यांना आमंत्रणाची व विनंतीची गरज भासलीच नाही मनाला येईल तेव्हा ते भक्ताच्या घरी जात व त्यांना भरभरून आशीर्वाद देत असत.
वैराग्य, गुरुभक्ती, भक्तवत्सलता, साधीराहणी, धर्मजागृती, ईश्वरभक्ती, आधुनिक विचारसरणी, समाजाभिमुखता या सर्व गुणांचा मिलाफ म्हणजे "श्री गुरु योगीराजेंद्र शिवाचार्य महास्वामीजी". त्यांच्या सातव्या पुण्यस्मरणानिमित्त कोटी कोटी प्रणाम!! अशा प्रकारे आम्हा सर्वांना गुरूंचे आशिर्वाद सदैव मिळत राहो ही गुरू चरणी प्रार्थना.
                                                                                                      
सौ.वैशाली सिध्दाराम कुंभार
                                                                                              मो.नं.८८०५०९०८९६

Reactions

Post a Comment

0 Comments