सोलापुरात माथाडींच्या आंदोलनाचा कांदा लिलावाला फटका; चार दिवसापासून ५० हजार क्विंटल कांदा पडून
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- देशातील विविध बाजारपेठांमध्ये नवीन खरीप कांद्याची आवक वाढल्याने कांद्याचे दर पडले आहेत. कांद्याच्या दरात क्विंटलमागे २००० रुपयांपर्यंत दरात घसरण झाली आहे. यामुळे कांदा उत्पादक शेतकरी चिंतेत असतानाच सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये माथाडी कामगारांचे आंदोलन सुरूच आहे.
चौथ्या दिवशीही आंदोलन सुरूच राहिल्याने येथे चार दिवसापासून ५० हजार क्विंटल कांदा पडून आहे. यामुळे कांदा सडण्याची भीती कांदा उत्पादक शेतकरी व्यक्त करत आहेत.
माथाडींचे कामबंद आंदोलन
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांविषयी केलेल्या कथित आक्षेपार्ह विधानाच्या विरोधात देशभरात संताप व्यक्त होत आहे. राज्यातही अनेक ठिकाणी आंदोलन आणि निदर्शने करण्यात आली आहेत. तर सोलापुरच्या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये माथाडी कामगारांनी कामबंद आंदोलन पुकारले आहे. या आंदोलानाचा आजचा चौथा दिवस असून येथे लिलाव बंद आहेत.
आज रविवारी (ता.२२) बाजार समिती बंद असल्यामुळे कांद्याचा लिलाव होणार नाही. तर उद्या (ता. २३) कांदा लिलाव होण्याची शक्यता आहे. यामुळे अनेक कांदा उत्पादक बाजार समितीमध्येच थांबून आहेत. तर येथे शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेला सुमारे ५० हजार क्विंटल कांदा लिलाव बंद असल्याने पडून आहे.
गुरूवारी (ता.१९) बाजार समितीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या विधानाच्या विरोधात माथाडी कामगारांनी अचानकपणे काम बंद आंदोलन सुरू केले होते. यामुळे शेतकऱ्यांनी आणलेला कांदा बाजार समितीमध्ये उतरवून घेतला नाही. तो वाहनांमध्ये तसाच पडून होता.
दुसऱ्या दिवशीही शुक्रवारी माथाडी कामगारांनी त्यांचे आंदोलन सुरूच ठेवले. पण कांदा उतरवून घेतला. शनिवारीही कांदा आवक होत राहिली. मात्र तिसऱ्या दिवशीही कांदा लिलाव झालाच नाही. तर रविवारी कृषी उत्पन्न बाजार समितीला साप्ताहिक सुटी असल्यामुळे सलग चौथ्या दिवशीही कांदा लिलाव बंद आहे. यामुळे येथे ५० हजार क्विंटल कांदा तसाच पडून राहिला आहे. त्यामुळे कांद्याचा दर आणखी कोसळण्याची भीती व्यक्त केली जात असून याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसण्याची शक्यता आहे.
0 Comments