Hot Posts

6/recent/ticker-posts

सोलापूर जिल्ह्याच्या वाट्याला यंदा तरी मंत्रिपद येणार का?

 सोलापूर जिल्ह्याच्या वाट्याला यंदा तरी मंत्रिपद येणार का?




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर सोलापूर जिल्ह्याला उत्सुकता लागली आहे, ती मंत्रिपदाबाबत, जिल्ह्यात महायुतीचे वर्चस्व असूनही मागच्या मंत्रिमंडळात एकही मंत्रिपद मिळाले नव्हते.
यंदा पुन्हा जिल्ह्यात सर्वाधिक ५ जागा भाजपने मिळवल्या आहेत. त्यामुळे सोलापूर जिल्ह्याला यंदातरी मंत्रिपद मिळणार का आणि कोणाला, याकडे लक्ष लागले आहे.
सोलापूर जिल्ह्यात विधानसभेचे ११ मतदार संघ आहेत. यंदाच्या निवडणुकीत भाजपने सर्वाधिक ५ जागा मिळवल्या आहेत. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने (शरदचंद्र पवार गट) ४ आणि शेतकरी कामगार पक्ष आणि शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) प्रत्येकी १ असे पक्षीय बलाबल आहे.
भाजपमध्ये सोलापूर शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख हे सलग पाचव्यांदा निवडून आले आहेत. माजीमंत्री आमदार सुभाष देशमुख हेही सोलापूर दक्षिण मतदार संघातून सलग तीनवेळा निवडून आले आहेत.
तर भाजपचे जिल्हाध्यक्ष आणि अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी, पंढरपूरचे आमदार समाधान आवताडे हे दुसऱ्यांदा तर सोलापूरमध्यमध्ये देवेंद्र कोठे हे पहिल्यांदाच निवडून आले आहेत. या भाजपच्या ५ आमदारापैकी सध्या तरी ज्येष्ठ आमदार म्हणून दोन्ही देशमुखांचे पारडे जड आहे.
या आधी दोन्ही देशमुखांना मंत्रिपदाची संधी मिळालेली आहे. सुभाष देशमुख हे सहकार व पणनमंत्री म्हणून कॅबिनेट मंत्री होते, तर विजयकुमार देशमुख परिवहन राज्यमंत्री होते. आता पुन्हा दोघांपैकी कोणाला संधी मिळणार की नवीन चेहरा म्हणून भाजपचे जिल्हाध्यक्ष सचिन कल्याणशेट्टी यांना पसंती दिली जाते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Reactions

Post a Comment

0 Comments