संतोष पवार यांच्या पदयात्रेला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
सोलापूर(कटूसत्य वृत्त):- 251-सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार संतोष सेवू पवार यांच्या पदयात्रेला मतदारांचा भरभरून प्रतिसाद मिळाला आहे. निलम नगर येथील प्रभाग क्रमांक 19, 20 तसेच नई जिंदगी व होटगी भागात त्यांच्या पदयात्रेच्या ठिकाणी नागरिकांची उपस्थिती लक्षणीय होती. पदयात्रेला तरुणाईचा जल्लोष, ज्येष्ठांची उपस्थिती आणि नागरिकांचा आत्मीय प्रतिसाद लाभला.
संतोष पवार यांच्या समर्थनार्थ फटाक्यांची आतषबाजी आणि जयघोषांनी पदयात्रेची सुरुवात झाली. वाद्यांच्या गजरात निघालेल्या या पदयात्रेत पवार यांनी मतदारांचे अभिवादन स्वीकारले. यात्रा दरम्यान विविध ठिकाणी माता-भगिनींनी त्यांचे औक्षण केले. पवार यांनी आपल्या भाषणात मतदारसंघातील अर्धवट ड्रेनेज लाईन, रस्त्यांची कामे यावर प्रकाश टाकला आणि या कामांच्या अपूर्णतेवरून सध्याच्या लोकप्रतिनिधींना लक्ष्य केले. "गेल्या १० वर्षात या भागासाठी आमदारांनी काय केले?" असा सवाल उपस्थित करत त्यांनी "दाखव रे तो व्हिडिओ" या त्यांच्या प्रचार मोहीमेच्या माध्यमातून स्थानिक समस्यांवर चर्चा घडवून आणली.
पवार यांनी मार्ग फाऊंडेशनच्या माध्यमातून केलेल्या सामाजिक उपक्रमांची माहिती दिली आणि मतदारसंघाच्या भविष्यासाठी त्यांचा दृष्टिकोन स्पष्ट केला. "स्थानीय समस्यांचे निराकरण करण्यासाठी आणि मतदारसंघाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी मला मतरूपी आशीर्वाद द्या," असे आवाहन करत पवार यांनी बदल घडवून आणण्याची ग्वाही दिली.
या पदयात्रेत वंचित बहुजन आघाडीचे आणि मार्ग फाउंडेशनचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
0 Comments