Hot Posts

6/recent/ticker-posts

सहकारमंत्री असताना सोसायटी तरी काढली का?

 सहकारमंत्री असताना सोसायटी तरी काढली का?


सुरेश हसापुरे यांनी देशमुखांचे काढले वाभाडे




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- विकासकामांच्या भूलथापा मारणारे व सूडबुध्दीने वागून गावागावात भांडणे लावणारे सोलापूर दक्षिणमधील भाजपच्या उमेदवाराने सहकारमंत्री असताना गावपातळीवर साधी सोसायटी तरी काढली का? असा सवाल करून कॉंग्रेसचे नेते सुरेश हसापुरे यांनी आमदार सुभाष देशमुख यांच्या गैरकारभारावर शरसंधान साधत चांगलेच वाभाडे काढले. शनिवारी, होटगी येथे सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या जाहीर सभेत हसापुरे यांनी भाजपचे उमेदवार देशमुख यांच्यावर टीकेची झोड उठविली. यावेळी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब शेळके, श्री स्वामी समर्थ सहकारी सूत गिरणीचे अध्यक्ष राजशेखर शिवदारे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष हरीश पाटील, श्री सिध्देश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक शिवानंद
पाटील, ज्येष्ठ नेते धोंडप्पा पटणे, राधाकृष्ण पाटील, प्रकाश पटणे, दत्ता घोडके, प्रा. भोजराज पवार, बंडुलाल बागवान, सैपन तांबोळी आदी उपस्थित होते. प्रारंभी माजी उपसरपंच असीम शेख यांनी प्रास्ताविकात धर्मराज काडादी यांच्या रुपाने चारित्र्यसंपन्न व पारदर्शी नेतृत्व मिळाले असल्याने आपण त्यांना लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत दुप्पट मताधिक्य देऊ, अशी ग्वाही दिली.
हसापुरे म्हणाले, सहनशीलता आणि माणुसकीच्या भावनेने काँग्रेस गप्प आहे. ही लढाई भाजपविरूध्द काँग्रेस पुरस्कृत अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांच्यातच आहे. स्वच्छ चारित्र्य, पारदर्शी आणि सचोटीचा कारभार यामुळे जनता काडादी यांच्या पाठीशी ठामपणे उभी आहे. अशातच काँग्रेसच्या सर्व ज्येष्ठ नेत्यांचा काडादी यांना आशीर्वाद आहे. मतदारसंघाचा खऱ्या अर्थाने विकास साधण्यासाठी काडादी यांना प्रचंड मतांनी निवडून देण्याचे आवाहन त्यांनी केले.
भाजपचे उमेदवार सुभाष देशमुख यांच्या गेल्या दहा वर्षांतील कारभाराचा पाढाच हसापुरे यांनी वाचला. दूध भुकटीची संस्था अस्तित्वात नसताना ती केवळ कागदोपत्री दाखवून पाच कोटींचे अनुदान लाटले. होटगी रस्त्यावर अतिक्रमण करून उभारलेले घर बेकायदेशीररित्या नियमात बसवून पदाचा गैरवापर केला. याशिवाय शेतकऱ्यांच्या नावाने बोगस कर्जे उचलून स्वत:चा खासगी कारखाना चालू केला. त्यांनी सर्व काही स्वत: साठीच केले. जनतेसाठी काय केले, हे त्यांनी जाहीरपणे सांगावे, आव्हानही हसापुरे यांनी देशमुख यांना दिले. यावेळी उपस्थितांनी 'धर्मराज काडादी यांचा विजय असो', अशा घोषणा दिल्या.
गावागावात भांडणे लावून तालुक्याचा सत्यानाश केलेल्या देशमुखांचे पानिपत करण्यासाठी आता धर्मराज काडादी यांना मैदानात उतरविले आहे. मतदारांनी मतयंत्रातून आपली ताकद दाखवून गैरकारभार करणाऱ्या लोकप्रतिनिधीचा पर्दाफाश करावा, असे आवाहन हसापुरे यांनी केले. यावेळी अल्लाउद्दीन तांबोळी, पिंटू जाधव, सचिन व्हनमाने, इंद्रजित लांडगे, संजय जाधव, सागर माने, राजशेखर दिंडुरे, रहेमान तांबोळी, विनोद पाटील यांच्यासह होटगी व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चौकट
धर्मराज काडादी हाच पर्याय
सहकारमहर्षी वि. गु. शिवदारे अण्णा, आनंदराव देवकते, गुरूनाथ पाटील, कमळे गुरूजी, सुशीलकुमार शिंदे यांनी चांगल्या पध्दतीने तालुक्याचा विकास केला. देवकते यांच्यामुळेच तालुक्यात हरितक्रांती झाली, हे नाकारून चालणार नाही. असे असताना आता अलीकडील काळात आलेल्या लोकप्रतिनिधीने तालुक्याचे वाटोळे केले. अशा लोकांना आता सत्तेतून बाहेर काढण्याचे काम करावे लागणार असून याला पर्याय धर्मराज काडादी हे एकमेव आहेत. त्यामुळे काडादी यांना भरघोस मतांनी निवडून देण्याचे आवाहन काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब शेळके यांनी केले.

चौकट
काडादींसारखे नेतृत्व विधानसभेत हवे
काडादी घराणे राजकारणापासून अलिप्त होते. तरीपण काही कारण नसताना सत्ताधाऱ्यांनी त्यांना त्रास दिला. शेतकरी, कामगार यांना मंदिरासमान असलेल्या श्री सिध्देश्वर साखर कारखान्याची चिमणी पाडून भाजप सरकारने गरिबांच्या अन्नात माती कालविण्याचा प्रयत्न केला. गेल्या काही वर्षात भाजपने कायमच शेतकरी व कामगारविरोधी धोरणे राबवून कष्टकऱ्यांना वेठीस धरले. धर्मराज काडादी हे सुसंस्कृत घराण्यातील प्रामाणिक नेते आहेत. काडादी यांच्यासारखे नेतृत्व विधानसभेत गेले पाहिजे. यासाठी सर्वांनीच येणाऱ्या निवडणुकीत काडादी यांना भरघोस मतांनी निवडून द्या, असे आवाहन श्री स्वामी समर्थ सहकारी सूत गिरणीचे अध्यक्ष राजशेखर शिवदारे यांनी केले.

Reactions

Post a Comment

0 Comments