Hot Posts

6/recent/ticker-posts

बबनदादांच्या पाठीशी पांडुरंग परिवार; तर अभिजीत पाटलांना कोकाटे, शिंदेंचे बळ!

 बबनदादांच्या पाठीशी पांडुरंग परिवार; तर अभिजीत पाटलांना कोकाटे, शिंदेंचे बळ!




माढा (कटूसत्य वृत्त):- माढ्यात राजकीय घडामोडींना वेग आला असून मतदारसंघाच्या निकालात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या पंढरपूर तालुक्यातील 41 गावातून माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी आपली ताकद आमदार बबनराव शिंदे यांचे चिरंजीव रणजित शिंदे यांच्या पाठीशी उभी केली आहे.


दुसरीकडे, माढ्यातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून इच्छुक असलेले संजय कोकाटे आणि माजी जिल्हा परिषद सदस्य भारत शिंदे यांनी अभिजीत पाटील यांना पाठिंबा जाहीर केला. त्यामुळे माढ्यात शिंदे आणि पाटील यांच्यात काँटे की टक्कर होताना दिसत आहे.

सोलापूर जिल्ह्यात माढा मतदारसंघाची लढाई ही सर्वाधिक प्रतिष्ठेची झाली असून मोहिते पाटील आणि बबनराव शिंदे दोघांनीही ताकद पणाला लावली आहे, त्यामुळे माढ्याच्या लढतीकडे संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

आमदार बबनराव शिंदे यांनी मुलाच्या निवडणुकीसाठी आतापर्यंतची सर्व राजकीय पुण्याई कामाला लावली आहे. एक एक मत जोडण्यासाठी ते कठोर परिश्रम घेताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी बबनराव शिंदे यांनी पंढरपूरचे माजी आमदार प्रशांत परिचारक यांची भेट घेऊन विधानसभा निवडणुकीत मुलाला पाठिंबा देण्याची विनंती केली होती, त्यानुसार परिचारक यांनी आमदार बबनराव शिंदे यांना पाठिंबा दिला आहे.

पंढरपूर तालुक्यातील करकंब येथे प्रणव परिचारक यांच्या उपस्थितीत रणजित शिंदे यांच्या प्रचारासाठी सभा झाली. त्यात सभेत प्रणव परिचारक यांनी परिचारक आणि शिंदे कुटुंबीयांचे अनेक वर्षांचे ऋणानुबंध आहेत, त्यामुळे माढा मतदारसंघात अपक्ष उमेदवार रणजित शिंदे यांना परिचारक कुटुंबाने आपला पाठिंबा जाहीर केला आहे, असे सांगितले, त्यामुळे बबनराव शिंदे यांनी माजी आमदार परिचारक यांची घेतलेली भेट फलदायी ठरली आहे.

आमदार बबनदादा शिंदे यांना आव्हान देणारे अभिजीत पाटील यांच्यासाठी माढा तालुक्यातूनही बळ मिळत आहे. तुतारीच्या चिन्हावर माढ्यातून विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेले संजय कोकाटे यांनी शरद पवारांबरोबर कायम राहण्याचा निर्णय घेत अभिजीत पाटील यांना पाठिंबा जाहीर केला आहे.

माढ्यातील जिल्हा परिषदेचे माजी सदस्य भारत शिंदे यांनीही अभिजीत पाटील यांच्या पाठीशी आपली ताकद उभी करणार असल्याचे सांगितले आहे. परिचारक यांच्या माध्यमातून बबनदादा शिंदे यांनी बेरजेचे राजकारण सुरू केले असले तरी अभिजीत पाटील यांनीही माढ्यातून गोळाबेरीज सुरु केली आहे, त्यामुळे माढ्यातून तुल्यबळ लढत होण्याची शक्यता आहे.
Reactions

Post a Comment

0 Comments