आरक्षणाला विरोध करणाराला पाडा
फडणवीसांनी मराठा समाजास जाणीवपूर्वक टार्गेट केलं
जालना (कटूसत्य वृत्त):- मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या एका आंदोलनात लाठीचार्ज झाल्यापासून त्यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवर शाब्दीक हल्ला करायला सूरूवात केली. त्यामुळे सतत जरांगेंच्या टार्गेटवर देवेंद्र फडणवीस राहिले आहेत. पण विधानसभा निवडणुकीत माघार घेतल्यानंतर जरांगे फडणवीसांना टार्गेट करणं बंद करतील, असे बोलले जात होते.
मात्र आता जरांगेंनी पुन्हा टार्गेटवर घेतलं आहे. तुम्ही अमुक दिलं तमुक दिलं या गुर्मीत राहु नका. पठ्या इथे उभा आहे, तुम्हाला गुडघ्यावरच टेकवणार. तुम्हाला आता सोडतच नाही, असा इशारा जरांगे पाटलांनी देवेंद्र फडणवीसांना दिला आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी आज अंतरवाली सराटीत पत्रकार परिषद घेऊन विधानसभा निवडणुकीवर भुमिका मांडली. यावेळी जरांगेंनी फडणवीसांना देखील टार्गेटवर घेतलं. 40-40 वर्ष काम करणाऱ्या नेत्यांनी आरक्षणासाठी प्रयत्न केला,आता जनता त्यांचा विचार करेल असे विधान फडणवीसांनी केल्याचं पत्रकारांनी जरांगेंना विचारलं. यावर जरांगे म्हणाले, आरक्षणासाठी रस्त्यावर उतरलेल्या महिलांचा तुम्ही अपमान केला आहे. तुम्ही कितीही रस्त्यावर उतरा आणि आंदोलन करा, मी नाही देत आरक्षण तुम्हाला,अशी भूमिका फडणवीस व त्यांच्या टोळीची असल्याचे जरांगे यांनी सांगितले. तसेच 40 वर्ष त्यांनी नाही दिलं अशा गप्पा फडणवीस मारतात. त्यांनी नाही दिलं म्हणून तुम्हाला निवडून दिलं होत ना. पण तुम्ही शेतकऱ्यांचा एक प्रश्न मार्गी नाही लावला. ना कर्जमाफी केली आणि ना एक रूपयात पीक विमा भरला म्हणून थापच मारतात. अमुक केलं, तमुक केलं, अशा थाप मारायच्या पलिकडे काय दिलं. त्या गुर्मीत नाही राहायच. सरकार कुणाचंही येऊ दे. हा पठ्ठ्या उभा आहे. तुम्हाला गुडघ्यावर टेकवणारच, तुम्हाला सोडणार नाही,असा इशारा जरांगेंनी दिला.
मनोज जरांगे पुढे म्हणाले, मी स्पष्ठ सांगूनही देखील अनेकांमध्ये संभ्रम आहे. मतदानाचा सन्मान तुमच्या हातात आहे. त्यामुळे कुणाला पाडायचे त्याला पाडा, ज्याने आपल्यावर अन्याय केला. ज्याने आपल्या आया-बहीणींची डोकी फोडली. आपल्याच समाजातील तरुणांवर खोटे गुन्हे दाखल केले त्याला सोडू नका असे आवाहन जरांगे पाटलांनी केले. तसेच मतदान कुणाला करायचे, कुणाला पाडायचे आणि कुणाकडून बॉण्ड आणि व्हिडिओ घ्यायचा ते आता स्वतः मराठा समाजाने ठरवावे. तुम्हाला कोण मदत करेल? कोण आपल्या आरक्षणासाठी काम करेल? अशा लोकांच्या पाठीशी राहावे आणि हा निर्णय स्वतः समाजाने ठरवावे, असे जरांगे यांनी सांगितलंय.
राजकारणाच्या तयारी पेक्षा फुकट कुणाला मोठे करण्या पेक्षा आंदोलनाच्या तयारीला लागू. प्रचार सभेला प्रचाराला जाऊ नका.पण मतदान मात्र सर्वांनी करावे. ज्याला जे करायचे ते करा पण आरक्षणासाठी ज्याने त्रास दिला त्याला सोडायचे नाही, आता पूर्ण कारभार मराठा समाजाच्या हातात दिला आहे,असे देखील जरांगेंनी सांगितले.
0 Comments