काँग्रेसने ओबीसी समाजाचे कायम शोषण केले
हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांचा हल्लाबोल
खोटारड्या काँग्रेसला महाराष्ट्राच्या जनतेने नाकारावे
मुंबई ( कटूसत्य वृत्त ):- गेल्या दहा वर्षांच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने व राज्य सरकारने केलेल्या विकास कामांमुळेच हरियाणात जनतेने काँग्रेसला नाकारले. प्रदीर्घ काळ सत्ता उपभोगणाऱ्या काँग्रेसने जितकी कामे केली नसतील तितकी कामे केंद्रातील भाजपा सरकारने केवळ दहा वर्षांमध्ये केली आहेत. महाराष्ट्रात डबल इंजिन सरकारद्वारे विकासाचा वेग कायम ठेवण्यासाठी काँग्रेस आणि महाविकास आघाडीला महाराष्ट्रातील जनतेने धडा शिकवावा, असे आवाहन हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांनी मंगळवारी केले. भाजपा मीडिया सेंटरमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत श्री. सैनी बोलत होते. या वेळी भाजपा केंद्रीय माध्यम समन्वयक के. के. उपाध्याय, राष्ट्रीय प्रवक्ते प्रेम शुक्ला, प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये, माध्यम विभाग प्रमुख नवनाथ बन आणि प्रवक्ते ओमप्रकाश चौहान उपस्थित होते. काँग्रेसने कायम ओबीसी समाजाचे शोषणच केले. ओबीसींना कधी अधिकार दिले नाहीत तर उलट त्यांचेच अधिकार अन्य वर्गाला दिले, असा आरोपही श्री. सैनी यांनी केला.
काँग्रेसचा खरा चेहरा जनतेसमोर आला आहे. मोदींवरील विश्वास आणि हरियाणात भारतीय जनता पार्टी सरकारने जी कामे केली ते लक्षात घेऊनच हरियाणात मतदारांनी काँग्रेसला नाकारत भाजपाला कौल दिल्याचे सांगत श्री. सैनी यांनी काँग्रेसवर टीकेची झोड उठवली.
श्री. सैनी यांनी सांगितले की दहा वर्षात मोदी सरकारने शेतकरी, महिला आणि युवकांसाठी अनेक योजना आणत सरकारने या घटकांची प्रगती केली. 2014 पूर्वी एक गॅस सिलेंडर घ्यायचा तर चार दिवस रांग लावावी लागायची. आता घरपोच गॅस सिलेंडर मिळतो. पायाभूत सुविधा निर्माण करत सरकारने देशाला जवळ आणायचे काम केले. सबका साथ सबका विकास हे सरकारचे ब्रीद वाक्य असल्याने भाजपा म्हणजे विकासाची गॅरंटी असल्याचेही श्री. सैनी यांनी नमूद केले.
महाराष्ट्रात महायुती सरकारने लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांना 1500 रुपये दिले तर काँग्रेसवाले ती योजना बंद पाडण्यासाठी न्यायालयात गेले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि संविधानाचा काँग्रेसने कायम अपमानच केल्याचे श्री. सैनी म्हणाले.
0 Comments