हमीभाव सोयाबीन खरेदी केंद्रांमुळे बाजारात सोयाबीन विक्री दरात वाढ होण्याची शक्यता
.png)
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- यंदा सोयाबीनचे उत्पादन बऱ्यापैकी होत आहे. त्यामुळे बाजारात विक्रीसाठी शेतकरी गर्दी करीत असल्याने दरात वरचेवर घसरण होत आहे.ही बाब लक्षात घेता मंगळवारपासून जिल्ह्यात सहा ठिकाणी हमी भावाने सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यात येत आहेत.त्यामुळे बाजारात सोयाबीन विक्री दरात वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.दरम्यान १३ दिवसांत केवळ, बार्शी व मानेगाव या दोनच ठिकाणी शेतकऱ्यांनी नाव नोंदणी केली आहे. यंदा जून महिन्यापासून पिकांच्या गरजेइतका पाऊस पडल्याने खरीप पिके जोमात आली आहेत.सप्टेंबर महिन्यात संततधार व सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडल्याने काही ठिकाणची पिके पाण्यात गेली. मात्र, जून, जुलै व ऑगस्ट महिन्यांत वेळेवर चांगला पाऊस पडल्याने खरीप पिके जोमात वाढली.त्यामुळे पाण्यात गेलेली पिके सोडली तर इतर ठिकाणच्या पिकांची काढणी, मळणी व बाजारात विक्रीची घाई शेतकऱ्यांना आहे. जवळपास एक महिन्यापासून सोयाबीन बाजारात विक्रीला येत आहे.
यावर्षीच्या उत्पादनाचा अंदाज आल्याने शेतकऱ्यांनी घरातील सोयाबीन बाजारात विक्रीला आणले. नवे सोयाबीन बाजारात येण्यास सुरुवात झाल्यानंतर हळूहळू दरात घसरण सुरू झाली.
सोयाबीन प्रति क्विंटल चार हजार रुपयांवर आल्यानंतर आणखीन खरेदी दर खाली येण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.ही बाब लक्षात घेऊन जिल्ह्यात बार्शी, सोलापूर, माळकवठे, मानेगाव, मंगळवेढा व पंढरपूर येथील हमीभाव केंद्रावर सोयाबीन खरेदी मंगळवारपासून केली जाणार आहे.पणन मंडळाकडून सोयाबीन हमी भावाने खरेदी सुरू झाल्यानंतर बाजारातील सोयाबीन खरेदी दरात सुधारणा होण्याची शक्यता आहे.
४ हजार ८९२ रुपये मिळणार दर सोमवारी बाजार समित्यांमध्ये सोयाबीन क्विंटलला ४२०० रुपये इतक्या दराने विक्री झाले. हमी भाव केंद्रावर चार हजार आठशे ब्याण्णव रुपये इतका दर सोयाबीनला मिळणार आहे. जवळपास पाच हजार रुपयांनी सोयाबीन हमी भाव केंद्रावर विक्री होणार असल्याने शेतकऱ्यांना चार पैसे मिळण्याची अपेक्षा आहे.
नोंदणीच नाही, खरेदी कशी होणार?
राज्य शासनाकडून जिल्ह्यातील सोलापूर, बार्शी, माळकवठे, मानेगाव, पंढरपूर, मंगळवेढा याठिकाणी मंगळवारपासून तर अक्कलकोट व करमाळा येथे शेतकऱ्यांच्या मागणीनुसार हमी भाव केंद्र सुरू करण्यात येणार आहेत. त्यासाठी एक ऑक्टोबरपासून शेतकऱ्यांना नाव नोंद करण्याची संधी दिली आहे. सोमवापर्यंत फक्त मानेगाव येथे १९२ व बार्शीत ४५० शेतकऱ्यांची नोंद झाली आहे. उर्वरित बाजार समितीतील हमी भाव केंद्रावर एकाही शेतकऱ्याने नाव नोंदले नसल्याचे जिल्हा मार्केटिंग फेडरेशनकडून सांगण्यात आले.
0 Comments