तुटून पडलेल्या वीजेच्या तारेला चिकटून हिवरेच्या तरुणाचा मृत्यू
करमाळा, (कटूसत्य वृत्त):- शेतातील मोटार चालू करण्यासाठी जात असताना तुटलेल्या विजेच्या तारेचा स्पर्श होऊन तालुक्यातील हिवरे येथील तरुणाचा दुर्दैवी अंत झाला आहे. शुक्रवार दि. ४ रोजी सकाळी नऊच्या सुमारास ही घटना घडली आहे.
हिवरे येथील हनुमंत तुकाराम शिंदे (वय-३५) हे शुक्रवारी सकाळी नऊच्या सुमारास हिवरे शिवारातील पांडवडा भागात असलेल्या शेतातील मोटर चालू करण्यासाठी निघाले होते. यावेळी ऊसातून जात असताना महावितरणच्या तुटून पडलेल्या उघड्या तारेचा त्यांच्या गळ्याला स्पर्श झाला आणि ते तारेला चिकटले. यावेळी झालेल्या आवाजाने शेजारील शेतकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन हनुमंत यांना तारेपासून सोडवले. यानंतर गावातील तरुणांनी तातडीने हनुमंत यांना खाजगी वाहनाने करमाळ्यात उपचारासाठी नेले. मात्र डॉक्टरांनी शिंदे यांना तपासून मृत घोषित केले.
करमाळा उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनानंतर हनुमंत यांच्यावर शुक्रवारी साडेचारच्या सुमारास हिवरे येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. घरातील कर्त्या पुरुषांच्या अकाली जाण्याने वृद्ध आई-वडील, लहान मुले यांचा आधार काळाने हिरावला आहे. महावितरणने तातडीने याबाबत नुकसान भरपाई देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
अडीच महिन्यांपूर्वी हनुमंत यांचे लहान बंधू नागनाथ यांच्यासह त्यांच्या आतेभावाचा अज्ञात वाहनाने ठोकरल्याने जागीच मृत्यू झाला होता. यानंतर लगेचच हनुमंत यांचाही वीजेचा धक्का लागून मृत्यू झाल्यामुळे हिवरे येथील शिंदे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मृत हनुमंत यांच्या पाठीमागे वृद्ध आई-वडीलांसह पत्नी, दोन मुली, एक मुलगा, भावजय, एक पुतण्या असा परिवार आहे.
0 Comments