शिंदेंसोबत सुरत-गुवाहाटीला गेले; त्या 39 जणांना पुन्हा उमेदवारी, फक्त एकाचं तिकीट कापलं
मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेची 20 जणांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे, त्यामुळे शिवसेनेने आतापर्यंत जाहीर केलेल्या उमेदवारांची संख्या 65 झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्यासोबत सुरत आणि गुवहाटीला गेलेल्या 40 पैकी 39 आमदारांना पुन्हा तिकीट दिलं आहे, तर फक्त एकाच आमदाराचा पत्ता कट करण्यात आला आहे.
शिवसेनेने जाहीर केलेल्या 45 जणांच्या पहिल्या यादीत सुरत आणि गुवहाटीला गेलेल्या 40 पैकी 36 आमदारांना किंवा त्यांच्या घरातल्या व्यक्तींनाच तिकीट दिलं होतं, पण शांताराम मोरे, बालाजी किणीकर, विश्वनाथ भोईर आणि श्रीनिवास वनगा यांना तिकीट दिलं नव्हतं.
शिवसेनेने जाहीर केलेल्या दुसऱ्या यादीत श्रीनिवास वनगा वगळता उरलेल्या तीनही जणांना तिकीट देण्यात आलं आहे. शांताराम मोरे हे भिवंडी ग्रामीणमधून, बालाजी किणीकर अंबरनाथमधून तर विश्वनाथ भोईर कल्याणमधून विद्यमान आमदार आहेत, या सगळ्यांना पुन्हा एकदा शिवसेनेकडून तिकीट देण्यात आलं आहे.
पालघरचे विद्यमान आमदार श्रीनिवास वनगा हेदेखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत सुरत आणि गुवहाटीला गेले होते, पण त्यांचं तिकीट कापण्यात आलं आहे. श्रीनिवास वनगा यांच्याऐवजी माजी खासदार राजेंद्र गावित यांना पालघरमधून उमेदवारी देण्यात आली आहे. राजेंद्र गावित हे भाजपमध्ये होते, पण त्यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला, यानंतर आता त्यांना पालघरची शिवसेनेची उमेदवारी देण्यात आली आहे. आता श्रीनिवास वनगा नेमकी काय भूमिका घेतात? याकडे लक्ष लागलं आहे.
साडू विरुद्ध साडू सामना
दरम्यान पालघरमधून राजेंद्र गावित यांना उमेदवारी मिळाल्यामुळे या मतदारसंघात साडू विरुद्ध साडू असा सामना रंगणार आहे. पालघरमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाकडून जयेंद्र दुबळा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. राजेंद्र गावित आणि जयेंद्र दुबळा हे दोन सख्खे साडू आहेत.
महायुतीचं जागावाटप
महायुतीमध्ये भाजपने आतापर्यंत 121, शिवसेनेने 65 आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने 49 उमेदवारांची घोषणा केली आहे. त्यामुळे महायुतीच्या उमेदवारांची संख्या 235 झाली आहे. महायुतीकडून अजूनही 53 उमेदवारांची घोषणा अजूनही झालेली नाही. मंगळवार 29 ऑक्टोबर ही उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे.
0 Comments