Hot Posts

6/recent/ticker-posts

लोकमंगल कृषी पदवीच्या विद्यार्थीद्वारे रेशीम कोष उत्पादन

 लोकमंगल कृषी पदवीच्या विद्यार्थीद्वारे रेशीम कोष उत्पादन


सोलापूर (कटूसत्य वृत्त):- श्रीराम ग्रामीण संशोधन व विकास प्रतिष्ठान संचलित आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्नित लोकमंगल कृषी महाविद्यालय वडाळा येथे अंतिम वर्षाच्या रेशीम उत्पादन मॉड्युलअंतर्गत विद्यार्थी निर्मित रेशीम कोषाची या शैक्षणिक सत्रातील पहिली बॅच विक्री करता बाजारपेठेस पाठवण्यात आली. रेशीम कोष रेशीम किटकांच्या जीवन चक्रातील 5 व्या अवस्थेनंतर लाळेद्वारे रेशीमचा स्त्राव सोडून किटक स्वतः भोवती 48 ते 72 तासात सुरक्षा कवच बनवतो. त्यालाच रेशीम कोष म्हणतात. महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने संकरित व दुबार जातीचे कोष उत्पादन घेतले जाते. सुणर्वआंध्र, कोलार गोल्ड या बहुवार सी. बी. जातीचे व सी. एस. आर. आणि सी. एस. आर. हायब्रीड हे दुबार जातीचे संगोपन केले जाते. रेशीम अळीचे अंडिपुंजातून बाहेर आल्यानंतर पाच अवस्थेपासून संक्रमण करून साधारणतः 26 ते 27 दिवसानंतर पाला खाण्याचे प्रमाण कमी होऊन अळीची कोशी कमी होते व तोंडावाटे रेशीम धागा सोडण्यास सुरूवात करते. अशा अळया कोष निर्मिती करीता प्लास्टीक /बांबु चंद्रिकेवर सोडण्यात येतात. रेशीम अळी स्वतःभोवती धागा गुंडाळते व कोष बनविण्याची प्रक्रिया 4 ते 5 दिवसात पूर्ण होते. या अवस्थेत रेशीम गृहा मधील तपमान 24 डि. ग्री. से. , आर्द्रता 60 ते 65 टक्के व खेळती हवा असणे गरजेचे असते. कोषावर आलेली अळी जवळपास 1000 ते 1200 मीटर लांबीचा धाग सोडते. एका प्लास्टीक चंद्रिकेवर 400 ते 500 कोष तयार होऊ शकतात. एका कोषाचे वजन साधारणतः 1.5 ते 1.8 ग्रॅम असते. कोषातील रेशीमाचे प्रमाणे साधारणतः 18-20 टक्के असते.चंद्रिकेवरून 5 व्या दिवषी कोष काढले जातात. सदरचे कोष विक्री करता पातळ पोत्यामधून व थंड वातारणामध्ये वाहतुक केली जातात सदर पूर्ण झालेला कोष हा बायहोल्टाईन जातीचा (पांढरा) आहे. या बायहोल्टाईन पांढऱ्या कोशापासून उत्पादीत केलेल्या सुतास जागतिक मागणी आहे. एका किलो ग्रॅम मध्ये 600 ते 1000 कोष बसतात. सद्य स्थितीला प्रति किलो ग्रॅम रेषीम कोषास रू. 400-  500 पर्यंत ग्रेडनिहाय दर संचालयामार्फत प्रचलित आहेत.
        या रेशीम कोष उत्पादन  मॉड्युल अंतर्गत महाविद्यालयातील अंतिम वर्षातील भूषण शेंडे ,मनोहर तेजा तेडला, आदित्य नांगरे, ज्ञानेश्वर काशिद , सुवर्णा पिटेकर, स्नेहल शिंदे, तेजस्विनी पाटील, प्रसाद टेले, ऋषिकेश हांडगे आणि सागर ठवरे या विद्यार्थ्यांनी रेशीम कोशाच्या पहिल्या बॅचचे उत्पादन 60 किलो घेतले असून त्यास विक्री करता आंध्र प्रदेश येथील हिंदुपूर बाजारपेठेत पाठविण्यात आले. या रेशीम कोषास प्रति किलो रू. 458 चा बाजार भाव देखील प्राप्त झाला. सदरील रेशीम कोष उत्पादन व विक्री करीता विद्यार्थ्यांना प्रा. सोनिया रणवरे आणि प्रा. स्वाती खोबरे यांचे अमूल्य असे मार्गदर्शन लाभले. रेशीम कोष उत्पादनासाठी विद्यार्थ्यांनी घेतलेल्या मेहनती करता महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अमोल शिंदे यांनी विशेष कौतुक केले. 

Reactions

Post a Comment

0 Comments