Hot Posts

6/recent/ticker-posts

बालविवाह रोखण्यासाठी शासकीय यंत्रणा बरोबरच नागरिकांनीही जागरूक राहावे -जिल्हाधिकारी आशीर्वाद

 बालविवाह रोखण्यासाठी शासकीय यंत्रणा बरोबरच नागरिकांनीही जागरूक राहावे -जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद

*बालविवाह निर्मुलन प्रकल्प अंतर्गत जिल्हा कृती दल आराखड्यास मंजुरी


सोलापूर (कटूसत्य वृत्त) :- बालविवाह निर्मूलन प्रकल्प अंतर्गत सर्व संबंधित शासकीय विभाग बालविवाह होऊ नयेत यासाठी प्रयत्न करत असतात. 18 वर्षे खालील मुलीचा व 21 वर्षे खालील मुलाचा विवाह करणे हा कायद्याने गुन्हा आहे. तसेच प्रत्येक मुलगा किंवा मुलगी यांना शिक्षण घेण्याचा तसेच सुखाने बालपण जगण्याचा पूर्ण अधिकार आहे. त्यामुळे जिल्ह्यात एकही बालविवाह होणार नाही यासाठी सर्व शासकीय यंत्रणा तसेच नागरिकांनीही जागरूक राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले.

              जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात बालविवाह निर्मूलन करण्याच्या हेतूने जिल्ह्यातील विभाग निहाय जिल्हा कृती आराखडा तयार करण्याबाबत दि. 23 रोजी आयोजित जिल्हा कृती दलाच्या बैठकीत जिल्हाधिकारी आशीर्वाद बोलत होते.

             यावेळी जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रसाद मिरकले, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी रमेश काटकर, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अतुल वाघमारे , सहाय्यक आयुक्त कौशल्य विकास विभाग श्री.नलवडे, बाल कल्याण समिती अध्यक्ष समीर सय्यद, अर्चना मस्के, पोलीस अधीक्षक कार्यालय प्रणिती यादव, पोलीस उपनिरीक्षक सोलापूर ग्रामीण अजित कुमार, जिल्हा युवा अधिकारी नेहरू युवा केंद्र सोलापूर गोदावरी राठोड, शिक्षण विस्तार अधिकारी स्वाती स्वामी, जिल्हा समन्वयक चाईल्ड हेल्पलाईन आनंद ढेपे, बालविवाह निर्मुलन प्रकल्प प्रमुख विश्वेश्वर वाघमारे, वरिष्ठ प्रकल्प समन्वयक नंदू जाधव, सिद्धराम गायकवाड आदि उपस्थित होते.

             जिल्हाधिकारी आशीर्वाद पुढे म्हणाले की, महिला व बाल विकास विभाग तसेच अन्य सर्व शासकीय यंत्रणांनी जिल्ह्यात बालविवाह रोखण्यासाठी सर्वोत्तपरी प्रयत्न करावेत. बालविवाह निर्मूलन प्रकल्प अंतर्गत सर्व समाजाचे प्रबोधन करावे. बाल विवाह मुळे मुला मुलींचे होणाऱ्या दुष्परिणामांची माहिती पालकांना समजावून सांगावी. बालविवाह झाल्यास कायद्याने होणारी शिक्षा याविषयी समाजाला जागृत करावे. जिल्ह्यात एकही बालविवाह होणार नाही यासाठी यंत्रणांनी दक्ष रहावे, त्याबरोबरच समाजानेही अवतीभवती बालविवाह होत असतील तर त्याची माहिती प्रशासनाला त्वरित द्यावी व तसेच बालविवाहाला प्रखर विरोध करावा व लहान मुला मुलींचे पुढील जीवन सुखकर करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे त्यांनी आवाहन केले.

            महिला व बाल विकास विभागाच्या वतीने सादर करण्यात आलेला जिल्हा कृती आराखड्याला जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी मान्यता दिली तसेच या आराखड्याची जिल्ह्यात अत्यंत प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश त्यांनी दिले. तसेच या आराखड्याचे अंमलबजावणी कशा पद्धतीने केली जात आहे यासाठी गुगलचे फॉर्म भरून त्याची माहिती प्रत्येक महिन्याला सादर करण्याबाबतही त्यांनी निर्देशित केले.

            प्रारंभी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी रमेश काटकर यांनी बैठकीची प्रस्तावना केली तसेच मागील इतिवृत्त वाचून दाखवले. तसेच एसबीसी-३ बालविवाह निर्मुलन प्रकल्प प्रमुख नंदू जाधव व वरिष्ठ प्रकल्प समन्वयक सिद्धराम गायकवाड यांनी बालविवाह निर्मुलन जिल्हा कृती आराखडा विभागनिहाय सादरीकरण केले.  सक्षम प्रकल्प अंतर्गत सुरु असलेले उपक्रम शालेय कार्यक्रम पालक विद्यार्थी सत्र तसेच सक्षम युवा शक्ती कार्यक्रम याबाबत माहिती दिली.

            यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी बालविवाह निर्मुलनासाठी एस.बी.सी-३ मार्फत तयार करण्यात आलेल्या पोस्टरचे अनावरण केले. जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अतुल वाघमारे यांनी बैठकीस उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.

Reactions

Post a Comment

0 Comments