आजच्या प्रगत तंत्रज्ञानाच्या युगात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अवघ्या आठ महिन्यात कोसळून पडणे याला काय म्हणावे ??? सरकारचे अपयश, बेजबाबदारपणा, भ्रष्टाचार की तंत्रज्ञानाचा अभाव....
अधुनिक विज्ञान तंत्रज्ञान, प्रगत आणि विकासाच्या कायम पोकळ वल्गना करणार्या भारत सरकार च्या अक्षम्य बेजबाबदार पणाची अनेक उदाहरणे निसर्गाच्या माध्यमातून एका मागोमाग एक सद्या जनतेसमोर समोर येवू लागली आहेत. असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही. कारण याचे ताजे उदाहरण म्हणजे काल २६ ऑगस्ट रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्याच्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा नुसत्या हवेने कोसळून पडण्याच्या या दुर्दैवी अनपेक्षित घटनेने संपूर्ण जगासमोर भारतासह महाराष्ट्राची मान खाली झुकली. उभ्या जगाला ज्यांच्या अद्वितीय शौर्याचा आजही कायम हेवा वाटतो ते हिंदवी स्वराज्य संस्थापक रयतेचे राजे बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या असामान्य पराक्रमाची, शौर्याची , गनिमी कावा, युद्ध रणनीती, जिद्द, चिकाटी, ध्येय, दूरदृष्टी, द्रष्टेपणा, दुर्दम्य इच्छाशक्ती, प्रजा प्रेम, सर्व धर्म समभाव, प्रजाहितदक्ष वृत्ती, न्याय, नीतिशास्त्र, कर्तव्य कठोरता इत्यादी गुणादर्शांसह त्यांच्या अभेद्य स्थापत्य शैलीची साडेतीनशे वर्षे उलटूनही साक्ष देणारे सह्याद्रीच्या अति दुर्गम कडे कपारीत आणि अत्युच्च गगनभेदी डोंगर रांगेतील गड किल्ले आजही ताठ मानेने महाराजांच्या अद्वितीय पराक्रम आणि इतिहासाची साक्ष देत उभे आहेत. हि समस्त भारतीयांसाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे. कारण सोळाव्या सतराव्या शतकात अधुनिक प्रगत तंत्रज्ञानाच्या युगासारखी सर्व क्षेत्रात प्रगती झाली नव्हती. त्या काळात ना पक्के रस्ते होते, ना वीज होती, ना अधुनिक उपकरणे, ना मशनरी अशा प्रतिकुल परिस्थिती समोर महाराजांनी कधीही हात टेकले नाहीत. उलट उपलब्ध संसाधनांचा आपल्या बुद्धी कौशल्याचा वापर करून स्वराज्याच्या रक्षणासाठी असंख्य आणि अभेद्य अशा मजबूत गिरीदुर्ग, जलदुर्ग आणि भुईकोट गड किल्ल्यांची निर्मिती केली. मोगल, पोर्तुगीज, डच, इंग्रज इत्यादी शत्रूंच्या आक्रमणांचा धीरोदात्तपणे सामना करून हे गड किल्ले आजही ताठ मानेने आणि डौलाने उभे आहेत. या वरून छत्रपती शिवाजी महाराजांचे निर्णय आणि दूरदृष्टी कीती दूरगामी व्यापक होती हे सिद्ध होते.
भारत देशाची शान आणि महाराष्ट्र राज्याची अस्मिता असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अतुलनीय पराक्रमाची आणि शौर्याचा इतिहास भावी पिढीला कायम प्रेरणादायी आणि मार्गदर्शक ठरावा म्हणून स्वातंत्र्यानंतर त्या त्या काळातील सरकारने देशात आणि राज्यात सर्वत्र छत्रपती शिवाजी महाराज यांचे प्रेरणादायी पुतळे उभारण्यात आले. महाराजांच्या अभेद्य आरमाराची आणि सागरी सुरक्षेची साक्ष देणार्या सिंधूदुर्ग मालवण येथील राजकोट किल्यावर ४ डिसेंबर २०२३ रोजी इंडियन नेव्ही अर्थात भारतीय नौसेना नौदल दिनाचे औचित्य साधून नौदलाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे उदघाटन प्रधान मंत्र्यांच्या हस्ते मोठ्या दिमाखात आणि उत्साहात करण्यात आले होते. परंतू जनतेचा हा उत्साह फार काळ टिकला नाही. कारण अवघ्या आठ महिन्यातच हा पुतळा कोसळून पडण्याच्या दुर्दैवी अनपेक्षित घटनेने जनतेचा उत्साह हिरावून घेतला. त्यामुळे तमाम शिवप्रेमी जनतेच्या भावना दुखावल्या गेल्या. कारण उभ्या आयुष्यात महाराज कोणत्याही शत्रू समोर अथवा तख्ता समोर झुकले नव्हते. आयुष्यभर कायम ताठ मानेने जगलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांचा स्वाभिमानी आणि निर्भीड बाणा होता. अशा रयतेच्या धुरंधर महापराक्रमी राजाचा कोट्यवधी रुपये खर्च करून उभारण्यात आलेला पुतळा अवघ्या आठ महिन्यात नुसत्या हवेने कोसळतो ही अत्यंत खेदाची, बेजबाबदार पणाची आणि चिंतनाची बाब आहे. या घटनेला जबाबदार कोण ? शिल्पकार, नौदल की सरकार ? प्रगत तंत्रज्ञानाच्या युगात उभारण्यात आलेला महाराजांचा पुतळा असा सहजासहजी कोसळून पडणे ही बाब अत्यंत अपमानास्पद, त्याच प्रमाणे देशाच्या प्रगत तंत्रज्ञाना विषयी देश विदेशात शंका निर्माण करणारी आणि कमीपणाची आहे. कारण या आधी सरकारने अत्यंत अधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून सुमारे नवशे एकाहत्तर कोटी रुपये खर्च करून निष्णात स्थापत्यकार यांच्या नेतृत्वाखाली २८ मे २०२३ मध्ये नवीन संसद भवनाची निर्मिती केली. परंतू पहिल्या पावसातच या संसद भवनात गळती झाली. त्या नंतर २२ जानेवारी २०२४ रोजी सुमारे अकराशे करोड रुपये खर्च करून भव्य दिव्य अशा राम मंदिराचे निर्माण केले. तिथेही तिच अवस्था पहायला मिळाली. या नंतर समृद्धी महामार्ग, अटल सेतू, एअरपोर्ट, फ्लायओव्हर ब्रिज आणि तब्बल १७ वर्षे राजकीय अभिशापात रखडलेला मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग ज्याच्या अत्यंत खड्डेमय निकृष्टतेची, आणि नरसंहारी अपघाती महामार्ग म्हणून गिनिज बुक ऑफ वर्ल्ड आणि लिमका बुक ऑफ वर्ल्ड मध्ये नोंद व्हावी असा देशाच्या उत्तर आणि दक्षिण ध्रुवाला जोडणारा मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १७ ( पुर्वीचा ) आणि आताचा क्रमांक ६६ अर्थात मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग इत्यादी निर्माण कार्यात प्रकर्षाने तंत्रज्ञानाचा अभाव दिसून आला अशा सदोष तृटी आजच्या आधुनिक प्रगत विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या युगात जनतेला बिलकूल अपेक्षित नाही.
साडेतीनशे वर्षापूर्वी महाराजांनी बांधलेल्या गडकोट किल्ल्यांचे बुरूज आणि त्यांचे दगडी चीरे तब्बल साडेतीनशे वर्षे उन,वारा,पाऊस यांचा मारा झेलत आजही भक्कमपणे एकसंध आणि मजबूत स्थितीत आहेत. आणि आजच्या आधुनिक विज्ञान तंत्रज्ञानाच्या काळात अधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कोट्यवधी रुपये खर्च करून उभारण्यात आलेला पुतळा अवघ्या आठ महिन्यात पडतोच कसा. याचा अर्थ एक तर तो पुतळा उभारण्यासाठी वापरलेले साहित्य अत्यंत निकृष्ट दर्जाचे असले पाहिजे, किंवा पुतळा निर्माण कार्यात भ्रष्टाचार झाला असावा किंवा निर्माण कार्यातील बेजबाबदारपणा किंवा तंत्रज्ञानाचा अभाव, तंत्रज्ञानातील तकलादूपणा अशी अनेक कारणे असू शकतात. या सर्व गोष्टींची चिकित्सा आणि उकल होणे गरजेचे आहे. जेणेकरून भविष्यात अशा घटना घडता कामा नये. कारण असा बेजबाबदारपणा जागतिक स्तरावर देशाच्या सुरक्षेला, प्रतिष्ठेला आणि प्रगतीला गालबोट लावणारा ठरू शकतो. तरी भारत सरकार कडून लवकरात लवकर घटनास्थळी अर्थात मालवण राजकोट किल्ला या ठिकाणी चिरकाल टिकून राहिल असा भव्य दिव्य, प्रेरणादायी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात यावा.
पत्रकार विश्वास बळीराम गायकवाड बोरघर, माणगाव रायगड भ्रमणध्वनी ९८२२५८०२३२,८००७२५००१
0 Comments