नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या कथित विमान अपघाताचा पर्दाफाश
------------------------------------
" नेताजींचा मृत्यू विमान अपघातामध्ये झालाच नाही ! "
- सुभाष सिक्रेट पुस्तकामध्ये लेखक क्रांती महाजन यांचा दावा
------------------------------------
महाराष्ट्राच्या अमरावती शहरातील सांस्कृतिक भूमीत जन्मलेल्या क्रांती महाजन या युवकाने सुवर्णकाळ म्हटल्या जाणारे आयुष्याचे संपूर्ण तिसरे दशक राष्ट्रीय विचारधारेस समरस होवून घालविले . समकालीन युवकांना आदर्श ठरावे असे ' क्रांतीचे कमळ ' चिखलात उगविणे तेवढे नाविण्याचे नाही . अक्षरशः दोन तपाचा कालखंड आयुष्याच्या अगदी उमेदीच्या काळात नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जीवन व मृत्यूविषयक अध्ययनावर खर्ची घालून आज ' सुभाष सिक्रेट ' या आगळ्या वेगळ्या पुस्तकाची निर्मिती क्रांती महाजन या महाराष्ट्रातील युवकाने केली अन् पश्चिम बंगाल राज्यासह संपूर्ण भारत देशाने त्या पुस्तकाची दखल घेतली . प्रारंभी प्रचंड विरोध झाला असतांनाही आज बघता-बघता ' सुभाष सिक्रेट ' या पुस्तकाच्या बावीस आवृत्ती प्रकाशित झाल्या आहेत . प्रत्यक्ष महाराष्ट्र राज्याच्या राजभवन येथे ' सुभाष सिक्रेट ' पुस्तकाचे प्रकाशन झाले आहे . या पुस्तकाने वाचक संख्येचे सर्व उच्चांक मोडले आहेत . एकाच वेळी मराठी , हिंदी व इंग्रजी भाषांसह जगातील इतरही काही भाषांमध्ये प्रकाशित होत असलेले ' सुभाष सिक्रेट ' हे पुस्तक अमरावती नगरीतून जगाच्या व्यासपीठावर जाणे , ही बाब सबंध महाराष्ट्राच्या अस्मितेला उंचाविणारी ठरते . खुद्द नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आशियाई देशांमध्ये आणि सिंगापूरच्या ज्या कॅथे हॉल मध्ये आझाद हिंद सेनेची स्थापना करणारी घोषणा केली होती , त्याच आशियाई देशांमध्ये व सिंगापूरच्या कैथे हॉलमध्ये 'सुभाष सिक्रेट' च्या इंग्रजी आवृत्तीचे प्रकाशन सुनियोजित आहे . मराठी मातीचा गंध दूरवर नेवू पाहणाऱ्या ' सुभाष सिक्रेट ' या पुस्तकाच्या क्रांती महाजन या लेखकाला प्रेरणा अन् प्रोत्साहन मिळावी म्हणून ' सुभाष सिक्रेट ' या पुस्तकातील काही भाग नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या कथित विमान अपघाताच्या दिनविशेष (18 ऑगस्ट ) पार्श्वभूमीवर जागरूक विचारांच्या भारतीय नागरिकांना व सर्वसामान्य वाचकाला कळावा , याकरीता वाचकांसमोर मांडला आहे .
भारतीय स्वातंत्र्य लढ्यात अनेक राष्ट्रभक्त पुढे आलेत . त्यांनी अपार कष्ट सोसले . सरकारी राग ओढावून घेतल्यामुळे त्यांना कारावासातही जावे लागले . हे सर्वमान्य आहे की , नेताजी सुभाषचंद्र बोस हे अतिशय लोकप्रिय काँग्रेसवादी नेता होते आणि म्हणूनच सन १९३९ च्या त्रिपुरा येथील अधिवेशनात सुभाषचंद्र बोस यांनी पट्टाभिसितारमय्या यांच्यावर खुद्द महात्मा गांधींचा पाठिंबा असतांनादेखील जबरदस्त मात केली होती . नेहरु आणि गांधी घराण्याला प्रचंड हादरा देवून गेलेले नेताजी सुभाषचंद्र बोस हे शतकातले एकमेव व्यक्तीमत्व होते , असे म्हणणे अतिशयोक्ती ठरणार नाही .
नेताजी सुभाषचंद्र बोस हे माझ्या जीवनातले एक अतीव आदराचे आणि श्रध्देचे स्थान आहे . भारताच्या इतिहासात छत्रपती शिवाजी महाराजानंतर एवढा धाडसी आणि पराक्रमी महापुरुष दुसरा झालेला नाही , असे माझे अढळ मत आहे . या वीर पुरुषाला महात्मा गांधी आणि पंडित नेहरु यांनी दुर्लक्ष करून भारताच्या राजकीय जीवनातून उठवून लावण्याची पराकाष्ठा केली , हा दुर्दैवी इतिहास जगजाहीर आहे .
भारताला स्वातंत्र्य मिळवून द्यायचे वास्तविक श्रेय देशाबाहेर राहून तडफदार कार्य करणारे सुभाषबाबू ह्यांना द्यावयास हवे . पण काँग्रेसने तसे न करता आपल्या पक्षीय स्वार्थासाठी भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील सन्माननीय नेताजींची भूमिका व दि. १८ ऑगस्ट , १९४५ ची विमान दुर्घटना संशयास्पद , अस्थिर स्वरुपाची व वैचारिकतः संशोधनास गरजेची वाटत असतांनाही तत्कालीन पंडित नेहरु सरकराने शहानवाज चौकशी आयोगासारखी समिती स्थापन करुन पुन्हा एकदा भारतीय जनतेला दिशाभूल करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला असल्याचे आढळते . नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा दिनांक १८ ऑगस्ट , १९४५ रोजी तैहोकू येथील विमान अपघात व नेताजीचा 'कथित' मृत्यू आजवर एक कोडेच बनून आहे . हे कोडे सोडविण्याचा अनेकांकडून प्रयत्न करण्यात आला व आज पुन्हा त्याच संदर्भात नेताजीच्या 'कथित' अस्थिकलशाच्या अनुषंगाने हा डोंगर पोखरून काढण्याची नव्याने गरज निर्माण झाली आहे . कारण अलिकडील दिवसांत भारताचे पंताधान श्री. नरेंद्र मोदी यांनी सत्तर वर्षाच्या प्रदीर्य कालखंडानंतर प्रथमतःच नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणासंदर्भातील काही महत्वाच्या फाईल्स भारतीय जनतेसमोर उघड केल्या , हे जरी सत्य असले तरी रशियाच्या केजीबी या गुप्तचर संघटनेजवळ नेताजींसंदर्भात अद्यापही असलेल्या ३६ अति गुप्त फाईलाचे रहस्य गुलदस्त्यातच आहे . पंतप्रधान श्री. गरेंद्र मोदी यांनी उघड केलेल्या कागदपत्रांची या संदर्भात भारतीय नागरिकांसमोर स्पष्ट झालेली माहिती यापूर्वीच 'सुभाष सिक्रेट' पुस्तकाच्या प्रथम आवृतीमध्ये नमूद करण्यात आली होती व त्या आवृत्तीच्या पंधरा वर्षांमध्ये बावीस आवृत्यांचे प्रकाशन घडून आले आहे . भारताचे विविध राज्यपाल व केंद्रीय मंत्री यांनी पुरस्कृत केलेले तसेच थायलंड येथील आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये प्रकाशित झालेले 'सुभाष सिक्रेट' हे पुस्तक पश्चिम बंगाल सरकारने व भारत सरकारने कागदपत्रे उघड केल्यानंतर नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्यु संदर्भातील रहस्याचा पर्दाफाश करणारे भारतातील पहिले पुस्तक ठरते .
येणेप्रमाणे सरकारच्या उघड केलेल्या दस्तावेज ( फाईलींमध्ये ) असणारी माहिती येथे समोर येणे तेवढेच गरजेचे आहे . ती माहिती अशी -
(1) या फाईली १९३८ ते १९४७ दरम्यानच्या आहेत . नेताजी सुभाषचंद्र बोस आणि त्यांचे भाऊ शरदचंद्र बोस यांनी एकमेकांना लिहिलेली पत्रेही या फाईलीमध्ये असल्याचे सांगितले जात आहे .
(2) एका विमान अपघातामध्ये १९४५ मध्ये नेताजींचा मृत्यू झाला होता , असा दावा केला जातो . मात्र आता १९४७ पर्यंतच्या फाईली समोर येत असल्यामुळे नवे प्रश्न उपस्थित झाले आहेत .
(3) नेताजी जीवंत आहे , असे माझे अंत:र्मन सांगत आहे , अशी भावना महात्मा गांधीजींनी व्यक्त केली होती . १९४६ मधील एका फाईलमध्ये ही माहिती दिली गेली आहे .
(4) आपण रशियात आहोत आणि भारतात परतायचे आहे , अशा आशयाचे सुभाषबाबूंचे एक पत्र पंडित नेहरुंना मिळाले होते . असे या फाईलीमध्ये म्हटले असल्यामुळे गांधीजींचे वक्तव्य त्याच काळातले असल्याचे मानले जात आहे .
(5) एका इंग्रजी वृत्तपत्राने केलेल्या दाव्यानुसार या फाईलींमध्ये असे काही पुरावे आहेत , ज्यामध्ये १९६० च्या दशकात तयार करण्यात आलेला अमेरिकेचा एक अहवालही आहे . त्यातील माहितीनुसार नेताजी सुभाषचंद्र बोस हे फेब्रुवारी १९६४ मध्ये भारतात परतले होते .
(6) वर्ष १९४८-४९ मध्ये ब्रिटन आणि अमेरिकेच्या गुप्तचर संघटना नेताजी जीवंत असल्याचे मानत होत्या , असे काही कागदपत्रांत म्हटले आहे . नेताजींनी दक्षिण-पूर्व आशियातील अनेक डाव्या चळवळीत महत्वाची भूमिका बजावली होती , असे त्यांचे म्हणणे होते .
येथे आपण लक्षात घ्यावे की , नेताजी सुभाषचंद्र बोस हे दिनांक १८ ऑगस्ट , १९४५ रोजी फार्मोसा बेटातील तैहांकू येथे विमान अपघातात जखमी होवून मरण पावले , असे त्यावेळी जपान सरकारकडून प्रसिध्द करण्यात आले होते . पण आश्यर्याची गोष्ट अशी की , या विमान अपघाताची किंवा नेताजींच्या मृत्यूची अधिकृत चौकशी आजवर कोणीच केली नाही . त्यावेळी तर भारत सरकारतर्फे जवाहरलाल नेहरूंची भूमिका उदासिन होती , हे विशेष . तरी सुध्दा भारत सरकारने औपचारिकतेच्या कर्मकांडातून दिनांक ५ एप्रिल , १९५६ रोजी नेताजी चौकशी समितीची ( नंबर एफ ३० - २६ इफ.इ.एं. /५५ ) नेमणूक केली . समितीचे चेअरमन म्हणून शहनवाझ खान होते . सरकारचे दुसरे प्रतिनिधी म्हणून एस.एन. मेत्र होते . सुरेशचंद्र बोस हे एकमेव बिनसरकारी प्रतिनिधी त्या समितीवर होते . शहनवाझ खान हा नेताजींचा समर्थक कधीच नव्हता , तो काँग्रेसकर्त्या नेहरूंचा हस्तक होता . नेहरु हे सुभाषचंद्राचे कट्टर राजकीय विरोधक होते . तेव्हा सुभाषचंद्र बोस मृत्यूसंदर्भात कायमचा पूर्णविराम द्यायचा दृष्टीकोन विमान आपघातानंतर तब्बल अकरा वर्षांनी समिती नेमून तिच्या तोंडून नेताजी बोस अपघातात मरण पावलेत , हे नेहरुंनी वदवून घेतले . याला नेहरुंच्या पांढऱ्या प्रतिमेवरचा काळा डाग म्हणावा लागेल . ज्या तैहोकू ( फार्मोसा ) बेटात विमान अपघात झाला त्या बेटाच्या चौकशीप्रसंगी शहनवाझ खान कमिटीवरचे एक सभासद होते , पण त्यांनी त्या कमिटीच्या अहवालात सही केली नाही . ह्या सर्व गोष्टी काय दर्शवितात ? नेताजींची राख एवढा त्यांचा मृत्युचा पुरावा शहनवाझ कमिटीला मिळाला . भारत सरकारने उच्च पातळीवरुन नेमलेल्या एका जबाबदार समितीने नेताजींच्या मृत्यूचा असा हास्यास्पद नि पोरकट पुरावा द्यावा , ह्या गोष्टीची तिला खरोखरच लाज वाटायला हवी . सारांश , शहनवाझ कमिटीच्या रिपोर्टवरुन नेताजी विमान अपघातात मरण पावले , ही गोष्ट सिध्द होत नसतांना संबंधित सरकारच्या परंपरागत उदासिनतेच्या अलिप्त धोरणाने हिंदवासीयांची विद्वता , जिज्ञासा जाहीर व्हावी, ह्याच एका उद्देशापोटी 'सुभाष सिक्रेट' या पुस्तकाचे प्रयोजन केल्या गेले आहे .
'सुभाष सिक्रेट' मधील महत्वपूर्ण मुद्दे -
(1) ज्या विमानतळावर नेताजींचे विमान कोसळले असे सांगितले जाते तिथे दिनांक १८ ऑगस्ट , १९४५ रोजी कुठलाही अपघात झाल्याची नोंदच नाही , असे आढळले आहे .
(2) भाजलेल्या नेताजींवर उपचार करणारे डॉ. योशिनी यांनी अलीकडेच सांगितले की , एका हिंदी अधिकान्याने
नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या मृत्यूचे प्रमाणपत्र तयार करण्याची सक्ती त्यांच्यावर केली . तो हिंदी अधिकारी कोण ?
(3) एक तर विमान अपघात झालाच नव्हता , आणि दिनांक १८ ऑगस्ट , १९४५ रोजी नेताजी हे फार्मासामधील तेहोकूतसुध्दा नव्हते . खरी वस्तुस्थिती अशी होती की , नेताजी हे दक्षिण व्हिएतनामची राजधानी सायगाव येथून अदृश्य झाले होते .
(4) नेताजींची समोर न येण्याचे हेही एक कारण आहे की , दुसऱ्या महायुध्दाच्या समाप्तीनंतर आंतरराष्ट्रीय निर्बंधानुसार त्यांना ' युद्ध अपराधी ' ठरविण्यात आले होते . दिनांक १८ ऑगस्ट , १९४५ रोजी ब्रिटनच्या ९ पार्लमेंटमध्ये तत्कालीन पंतप्रधान मिस्टर अॅटली यांनी एका प्रश्नाला उत्तर देतांना असे म्हटले होते की , ' हिंदुस्थानच्या पुढाऱ्यांशी ठरल्याप्रमाणे जेंव्हा केव्हाही सुभाषबाबू दिसतील तेंव्हा त्यांना ब्रिटनच्या हाती हिंदुस्थानने सोपविले पाहिजे . ' याचा लेखी आधार वाचकांना ( Transfer of Power Vol.6 , 1942 - 1947 ) या खंडात पाहायला मिळेल . स्वातंत्र्यानंतर यावर विचार का केला गेला नाही ?
(5) नेहरू सरकारने 'कथित' विमान अपघातानंतर अकरा वर्षांनी आणि दिनांक ५ मार्च , १९५२ रोजी लोकसभेत 'नेताजी मरण पावले आहेत व त्याची काही चौकशी केली जाणार नाही' असे सांगितल्यानंतर ४ वर्षांनी सन १९५६ मध्ये 'शहनाज-तपास-समिती' का बरे नेमली ? आणि वर्ष १९४५ मध्ये दुसरे जागतिक महायुद्ध संपल्यानंतर टोकियोमधील न्यायालयाचे एक न्यायाधिश डॉ. राधाविनोद पाल यांच्याऐवजी जनरल शहानवाज खान यांनाच तपास समितीचे अध्यक्ष म्हणून का बरे नेमले होते ? .
(6) जपानच्या रैंकोजी मंदिरातील नेताजींच्या 'कथित' अस्थि या मुळात नेताजी बोस यांच्या नसून द्वितीय महायुद्धातील 'इचिरो ओकुरा' नामक जपानी सैनिकाच्या आहेत . तसे नसल्यास भारत सरकार नेताजी बोस यांच्या अस्थिकलशाची डि.एन.ए. चाचणी का करीत नाही ?
(7) विमानाच्या अपघाताचे आणि त्यानंतर नेताजींच्या 'राखे'चे फोटो प्रसिध्द झाले आहेत , तो त्यांच्या मृत्यूचा पुरावा होऊ शकतो काय ? नेताजीच्या 'प्रेता' चा फोटो कोणीच कसा घेतला नाही ? हा फोटो का घेण्यात आलेला नाही ?
(8) जगातील प्रथम दर्जाची गुप्तचर संघटना म्हणून ख्याती असलेल्या अमेरिकेच्या 'सीआयए' या गुप्तचर संस्थेने तर नेताजी बोस हे केवळ जीवंतच नाही तर ते भारतात असल्याचा दावा वर्ष १९६४ साली केला होता व अलिकडेच वर्ष २००२ मध्ये नेताजी बोस हे १०५ वर्षाचे झाले असल्याचा दावा 'सीआयए' या अमेरिकेच्या गुप्तचर संस्थेने केला असल्याचे वृत्त आहे .
(9) भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या निधनानंतर त्यांच्या पार्थिवाला श्रध्दांजली अर्पण करण्यासाठी दिनांक २८ मे , १९६४ रोजी नेताजी सुभाषचंद्र बोस हे स्वतः त्रिमूर्ती भवन , नवी दिल्ली येथे बौद्ध भिक्कुच्या वेषात आले होते . स्वतः लालबहादूर शास्त्री त्यावेळी नेताजी सुभाषचंद्र बोस यांना विशेष अतिथी मार्गाने त्रिमुर्ती भवनात पंडित नेहरुंच्या पार्थिवाजवळ घेवून आले होते . त्या संबंधीचे दृश्य भारत सरकारच्या डॉक्यूमेंट्री फिल्म विभागाच्या वतीने त्रिमूर्ती भवनाच्या आतील चित्रीकरणाच्या ( फिल्म डिव्हीजन क्र. ८१६ बी ) या अंतिम भागात पाहायवयास मिळेल . सदरचे चित्रिकरण आज माझ्याजवळ उपलब्ध आहे . त्या चित्रिकरणाचे रहस्य काय ?
(10) कोलकाताच्या एशिएन्टिक सोसायटीचे काही लोक मॉस्कोमध्ये काही सरकारी कागदपत्रे पाहत होते . तेव्हा त्यांना वर्ष १९४६ मधील काही कागदपत्रे मिळाली . त्यात स्टॅलीन व मोलोटोव यांच्यातली वर्ष १९४६ मधील चर्चा होती . त्यात सुभाषचंद्र बोस रशियात राहतील की , दुसरीकडे निघून जातील यावर बोलणे चालले होते . रशियनांकडे नेताजीसंबंधीचे कागदपत्रे आहेत . भारत सरकार ती मागत का नाही ?
(11) भारताच्या राष्ट्रपतींनी आपल्या राष्ट्रपतींच्या अधिकारात नेताजीच्या मृत्युचे वृत्त आकाशवाणी व दूरचित्रवाणीवरुन राष्ट्राला घोषित करून सांगावे व आदरपूर्वक नेताजींचा स्मृतिदिन जाहीर करावा .
(12) अत्यंत वस्तुनिष्ठ आणि तर्कशुध्द भूमिकेतून विचार केल्यास नेताजी सुभाषचंद्र बोस हे दिनांक १८ ऑगस्ट , १९४५ रोजी 'कथित' विमान अपघातात मरण पावले , असे म्हटल्या जाते . याउलट तैहोकू विमानतळावरच्या अपघातात नेताजींचा मृत्यू झाला अशी खात्री पटली आहे , त्यांनी जपान येथील टोकियोतल्या रेनकोजी मंदिरात जपून ठेवलेल्या अस्थि किमान भारतात आणण्यासाठी सरकारकडे आग्रह धरला पाहिजे . भारताचे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी जपानला जाऊन आल्यानंतरदेखील हा विषय दुर्लक्षित रहावा , ही देखील एक शोकांतिकाचं !
रेणकोजी मंदिरातला अस्थिकलश भारतात आणण्याबाबत इंफाळचे जयचंद्रसिंग यांनी तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांना नेताजींच्या अस्थि भारतात आणण्याबद्दल पत्र पाठविले होते . त्यानंतर दिनांक २६ सप्टेंबर , १९८५ रोजी डॉ. शिशिरकुमार बोस यांनी तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधींना पत्र पाठवून नेताजींच्या दृष्टीने सबंध राष्ट्रच त्यांचे कुटुंब असल्याने नेताजीच्या मृत्यू प्रकरणाचा प्रश्न हा राष्ट्रीय कर्तव्याचा व राष्ट्रीय स्वरुपाचा प्रश्न ठरतो . तेव्हा भारत सरकारने त्या संदर्भात योग्य ती पावले उचलावीत अशी सूचना दिली होती .
त्यानंतर दिनांक 1 डिसेंबर , 1995 रोजी भारत सरकारने नेताजींच्या मृत्यूप्रकरणी सत्यता उघड करण्यासाठी प्रयत्न करुन वास्तविक कारणांचा नव्याने लावण्यासाठी चौकशी आयोग स्थापन करावा , अशी मागणी भाजपाचे विष्णुकांत शास्त्री व फॉरवर्ड ब्लॉकचे जयंतो यांनी दिल्लीत राज्यसभेत केली असून 'कथित' जपान येथील अस्थिकलश नेताजींचा असल्याच्या विदेशमंत्र्यांच्या निवेदनाने आपण असमाधानी असल्याचे नमूद आहे .
सदर अस्थिकलशास अनुसरून तर माजी संसद सदस्य प्रो. समर गुहा यांनी आपल्या 'नेताजी डेड ऑर अलाइव' या पुस्तकात सरकार दुसऱ्याच्याच अस्थिकलशास नेताजींच्या अस्थि संबोधित करीत असून भारतीयांची फसवणूक करीत असल्याचा खळबळजनक आरोप केला आहे . तसेच नेताजींच्या अनुयायांनी व आझाद हिंद फौजेतल्या सैनिकांनी 1989 मध्ये एक समिती स्थापन करून जपानचा अस्थिकलश भारतात आणण्याची मागणी पंतप्रधान राजीव गांधी यांना केली होती . अगदी याचं संदर्भात नेताजींचे फॉरवर्ड ब्लॉक मधील सहकारी एन. जी. रंगा , शीलभद्र याजी , नेताजींचे पुतणे डॉ. शिशिरकुमार बोस , कर्नल प्रेमकुमार सहगल , कॅप्टन लक्ष्मी सहगल , कर्नल गुलबक्षसिंग धील्ला यांनी ही मागणी उचलून धरली होती .
अगदी याचं संदर्भात मी स्वतः दिनांक 17 जानेवारी , 1996 रोजी तत्कालीन पंतप्रधान नरसिंहराव यांना पत्र पाठवून नेताजींचा 'कथित' अस्थिकलश भारतात आणून ब्रिटिश फॉरेन्सिस सायन्स सर्व्हिसेसच्या दाव्यानुसार नेताजींचे भाचे वा पुतणे यांच्या रक्ताच्या साहाय्याने अस्थिकलशातील राखेची डी. एन. ए. चाचणी करण्याची मागणी केली होती . आजवर विविध सरकारने नेताजींच्या संदर्भात अनेक तपास आयोग स्थापन केले आहेत . मात्र त्याचं तपासाचा एक भाग म्हणून जपानचा अस्थिकलश भारतात का आणत नाही ? , हा एक प्रश्नच आहे .
(13) नेताजींच्या कन्या डॉ. अनिता बोस जेव्हा सर्वप्रथम जर्मनीहून भारतात आल्या असतील तेव्हा भारत सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाने त्यांचे पारपत्र ( पासपोर्ट ) तपासले नव्हते का ? जर तपासले असेल तर त्या पासपोर्टवर ' वडीलांचे नाव ' या ठिकाणी काय लिहिले होते ? . डॉ अनिता बोस ज्याअर्थी भारतात आल्या त्याआधीच त्यांच्या वडीलांचे नाव हे ' सुभाषचंद्र बोस ' होते , याविषयी भारत सरकारला माहिती होती . मग ही माहिती उगीच का लपविण्यात आली ?
(14) हिमालयातील गुमनामी बाबा , शौलमारी आश्रामातील व्यक्ती , फैजाबादचे बाबा , इत्यादी विषयी भारतात एवढ्या चर्चा होतात . तरी भारत सरकारचे या बाबींकडे आजवर दुर्लक्ष राहिले. ते का ?
(15) वर्ष 1948 - 49 मध्ये ब्रिटन आणि अमेरिकेच्या गुप्तचर संघटना नेताजी जीवंत असल्याचे मानत होत्या . नेताजींनी दक्षिण - पूर्व आशियातील अनेक डाव्या चळवळीत महत्वाची भूमिका बजावली होती , असे त्यांचे म्हणणे होते .
तात्पर्य असे की , ' सुभाष सिक्रेट ' मध्ये आधुनिक भारताच्या इतिहासाचा परामर्श घेतला आहे . आधुनिक कालखंडाच्या हिंदुस्थानाचं रसग्रहण त्यातून केल्या जावू शकते . येथे वाचकांनी लेखकाचा वास्तविक विषय लक्षात घेवूनच पुस्तक वाचले असावे , अशी माझी समजूत आहे . नेताजी सुभाषचंद्र बोस म्हणजे हिंदुस्थानाच्या इतिहासातील एक झंझावात होय . ' समग्र नेताजी ' हा विषय शब्दांत मांडता येणं कोणालाही शक्य झाले नाही . सामाजिक प्रगतीचे किंबहुना राष्ट्रीय विकासाचे सिद्धांत स्पष्ट करुन हिंदुस्थानाच्या आधुनिक कालखंडातील प्रश्नांचे विश्लेषण करतांना नेताजींची सुसूत्र , स्वतंत्र , स्वयंपूर्ण व स्वयंसिद्ध अशी संशोधनपर विचारसरणी या पुस्तकात उपयोगिली आहे , एवढेच .
एका जिज्ञासूवृत्तीने निर्माण झालेल्या प्रश्नापासून लेखकाच्या संशोधनाला प्रारंभ झाला . संशोधन हे काही हौसेचे कार्य नाही अथवा वेळ घालविण्याचे साधन नाही . ती पूर्ण वेळेने , निष्ठेने , त्यागाने , समर्पणाने केल्या जाणारी कृती होय . अल्पावधीकरीता स्वीकार करावी , अशी ती वृत्ती नाही . जिज्ञासा , सत्यनिष्ठा , निर्भयता , परिश्रमशीलता , चिकाटी , महत्त्वाकांक्षा , आत्मविश्वास हे सर्वच प्रकारच्या संशोधनासाठी आवश्यक असणारे गुणविशेष आहेत . ज्ञानोपसकाच्या भूमिकेवरुन संशोधनाची बौद्धीक प्रक्रिया पूर्ण करीत असतांना चौदा वर्षे नव्या तथ्याचा शोध आणि उपलब्ध तथ्याचे पुनरनुसंधान मी करीत गेलो . केवळ नेताजींचा 'कथित' विमान अपघात व त्यातील त्यांचे 'कथित' निधन एवढाच या पुस्तकाचा प्रतिपाद्य विषय मुळीच समजू नये . तसंही ' नेताजींचा मृत्यू ' हा काही चघळण्याचा विषय नाहीय . त्यामुळे पुस्तक हाती घेताच थेट ' नेताजींचा मृत्यु कधी झाला ? ' या प्रश्नावर येणाऱ्या वाचकांनी थोडे या दिशेने जागरुक होणे गरजेचे आहे . वाचकाने पुस्तकाचे प्रमाणिक पठन केले असेल तर आपोआपच सर्व प्रश्नांची उत्तरं मिळू शकतात , याची मला खात्री आहे . लक्षात असू द्यावे की , कोणताही विषय समजण्यात त्याचे तथ्य वा घटना यांची मनुष्याला खरी अडचण नसते , तर त्या घटनांचा आकलोनत्तर निर्णय करण्याची कुवत असण्याचा अभाव हिच अडचण असते . हि अडचण झुगारुन हिंदुस्थानातील ज्या ज्या वाचकांनी कळत-नकळत ' सुभाष सिक्रेट ' ची प्रत केवळ हाती जरी घेतली असेल , तरी मी त्यांचा शतशः ऋणी आहे .
0 Comments