सोलापूर (कटूसत्य वृत्त):- श्रीराम ग्रामीण संशोधन व विकास प्रतिष्ठान संचलित आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्नित लोकमंगल कृषी महाविद्यालय वडाळा येथे राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत दिनांक ५ जून रोजी जागतिक पर्यावरण दिन व्याख्यानाच्या आयोजनाने साजरा करण्यात आला. सदरील कार्यक्रमास प्रा. कल्पना मिटकरी ह्या अध्यक्ष म्हणून लाभल्या. कार्यक्रमा मध्ये प्रास्ताविक मांडताना कार्यक्रमाधिकारी प्रा. अजित कुरे यांनी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना जागतिक पर्यावरण दिनाची पार्श्वभूमी समजावून सांगितली. यात प्रामुख्याने जागतिक पातळीवर निसर्गाच्या संरचनेत होत असलेल्या बदलाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी असे दिवस वैचारिक चर्चासत्रा द्वारे साजरे करून त्याची प्रात्यक्षरीत्या वास्तवात अनुकरण करणे महत्त्वपूर्ण असल्याचे त्यांनी नमूद केले. यानंतर कार्यक्रमांमध्ये मनोगत व्यक्त करताना पीक शास्त्र विभागातील कार्यरत प्रा. नम्रता गोरे यांनी विद्यार्थ्यांना निसर्गाचा ऱ्हासास कारणीभुत असणाऱ्या गोष्टीबद्दल सविस्तर अशी माहिती दिली. यात त्यांनी प्रमुख कारणांचा उल्लेख करताना प्रदूषण, प्लास्टिकचा अतिवापर, जंगलतोड आणि वृक्षतोड इत्यादी यामुळे होणारे विघातक परिणाम याविषयी सर्वांना जागृत केले. विद्यार्थ्यांनी देखील वृक्ष लागवडी बरोबरच वृक्ष संवर्धन करण्याचे त्यांनी आवाहन केले. बदलत्या जीवनशैलीमुळे शरीरावर होणारे विघातक परिणाम टाळण्याकरिता आणि निसर्गाचा आस्वाद घेण्याकरिता देखील सभोतालचा परिसर निसर्गमय केला पाहिजे असे मत व्यक्त केले. त्यानंतर प्रा. अजित कुरे यांनी आपले मत व्यक्त करताना निसर्गाचा होणारा असमतोल टाळण्यासाठी करावयाच्या विविध उपयोजनावर सविस्तर असे मार्गदर्शन केले. नैसर्गिक स्त्रोतांचा पुरेपूर वापर करून निसर्गाला हानी न पोचवता अनेकविध सकारात्मक गोष्टी करता येतात याची त्यांनी जाणीव करून दिली. पावसाळ्यात छतावर पडणाऱ्या पाण्याचे संकलन व उपयोग, शेतातील बांधबंधिस्ती, शोषखड्डे, वृक्षारोपण अशा उपक्रमाद्वारे पर्यावरणाचे संगोपन करणे काळाची गरज असल्याची त्यांनी सांगितले. विद्यार्थिनी प्रतिनिधी रुद्राक्षी हिरेमठ हिने स्वतच्या अपार्टमेंट घरकुल प्रणालीमध्ये मुक्या प्राण्या आणि पक्षांसाठी सोसायटीमध्ये राबवल्या जाणाऱ्या कौतुकास्पद अशा प्रात्यक्षिक उपक्रमाबद्दल उपस्थितांना माहिती दिली. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा. अजित कुरे यांनी केले. पर्यावरण दिनाचे आयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अमोल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. सदरील कार्यक्रमास प्रा. शुभांगी काळे, प्रा. संगन्ना कुंभार, प्रा. प्रकाश गुरव, प्रा. सुकन्या जाधव, प्रा. जायभाई, प्रा. प्रथमेश काळपांडे आणि डॉ. आशिष तिवारी यांची तसेच प्रथम वर्षातील विद्यार्थी विद्यार्थिनींची उल्लेखनीय उपस्थिती होती.
0 Comments