बीए, बीकॉम, बीएससी, बीसीए, बीबीए अंतिमचे निकाल
30 दिवसांत जाहीर!
सोलापूर विद्यापीठ: परीक्षा संचालक डॉ. अंधारे यांची माहिती
सोलापूर(कटूसत्य वृत्त):- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या बीए, बीकॉम, बीएससी, बीसीए आणि बीबीए अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाचे निकाल 30 दिवसांत जाहीर झाल्याची माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. श्रीकांत अंधारे यांनी दिली.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षा विभागाकडून 2024 च्या उन्हाळी सत्राच्या विविध अभ्यासक्रमांच्या परीक्षांचे निकाल वेळेत जाहीर होत आहेत. कुलगुरू प्रा. प्रकाश महानवर व प्र-कुलगुरू प्रा. लक्ष्मीकांत दामा यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठ परीक्षा विभागाची टीम परीक्षांचे निकाल लवकरात लवकर जाहीर करण्यासाठी काम करीत आहे. यामुळे परीक्षा संपल्यानंतर अवघ्या काही दिवसांमध्ये वेळेवर निकाल जाहीर होत आहेत.
वेळेत निकाल लावण्यासाठी परीक्षा विभागातील अधिकारी व कर्मचारी, विविध विद्याशाखांचे सर्व अधिष्ठाता, शिक्षक आदींचे सहकार्य लाभत आहे. यंदाच्या वर्षी वेळेच्या आत सर्व अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर होत असल्याने विद्यार्थ्यांमध्येही आनंद आहे. आता नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होत आहे. ऍडमिशनची प्रक्रिया ही सुरू आहे.
बी टेक अंतिम वर्षाचे निकाल पंधरा दिवसात
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाकडून यंदा अभियांत्रिकीच्या बी टेक अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षाचे सर्व निकाल पंधरा दिवसात जाहीर झाल्याची माहिती देखील परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डोस श्रीकांत अंधारे यांनी दिली.
0 Comments