महात्मा फुल्यांनी मुक्तिमंत्र दिला
आपल्या देशाला विकसनशील असे म्हटले जाते. त्याला विकसितही म्हटले जात नाही आणि अविकसितही म्हटले जात नाही. शहाणपणाच्या भाषेत बोलायचे तर तो शहाणाही नाही आणि वेडाही नाही, म्हणजेच बौद्धिकदृष्ट्या तो धड सुधारलेलाही नाही आणि ठार मागासलेलाही नाही. आपल्या समाजाच्या ह्या विसंगत वर्तनाबद्दल पु.ल. देशपांडे म्हणतात, 'जोतीबाच्या पुण्यतिथीला एखादा विचारवंत भिक्षुकशाहीवर तळमळीने तुटून पडतो आणि काही दिवसांनी जोतीबाच्या पुतळ्यासमोर सार्वजनिक सत्यनारायणही होतो. म्हणजे एकाच जागी फुल्यांचेही नामस्मरण आणि ज्या भाकडकथांना फुल्यांनी आजन्म विरोध केला त्या सत्यनारायणाचेही नामस्मरण!'
महात्मा जोतिराव सत्यशोधक होते, त्यांनी आपल्या चिंतन, मनन, लेखन, भाषणातून पोथ्या-पुराणातील अनेक खोट्या गोष्टींचा खरपूस समाचार घेतला त्यांच्या 'गुलामगिरी' ह्या नवविचाराधिष्ठित ग्रंथाचे महत्त्व विशद करताना विचावंत बापूजी संकपाळ म्हणतात, 'गुलामगिरी' हा स्फोटक ग्रंथ आहे. त्यातील विचारांची ज्वालाग्राही स्फोटकता आजमितीसही टिकून आहे. हा ग्रंथ म्हणजे ज्वालाग्राही विचारांच्या सुरुंगाच्या दारूने भरलेले एक प्रचंड कोठार आहे.' या ग्रंथाद्वारे जोतिबांनी सृष्टीक्रमाशी विसंगत तर्कदुष्ट आणि काल्पनिक अशा धर्मग्रंथातील आचार-विचारांची सडेतोड हजेरी घेतली आहे. मनुस्मृतीच्या शब्दप्रामाण्यावर आणि भागवतासारख्या ग्रंथातील दंतकथांवर त्यांनी जोरदार हल्ला चढवून त्यांचे असत्य उघडे पाडले आहे.
भागवत पुराणातील मत्स्य, कूर्म, वराहादि अवतार कल्पना म.फुले यांना मान्य नाहीत, परशुरामाला अंधश्रद्धाळू भाविक चिरंजीव मानतात या गोष्टीची चीड येऊन त्यांनी 'त्याने सहा महिन्यात हजर होऊन आपल्या सर्वसाक्षी चिरंजीवित्वाचा पुरावा द्यावा म्हणून नोटीस जारी केली होती.' याचा अर्थ भारतात दीडशे वर्षापूर्वीच वैचारिक स्वातंत्र्याचा सूर्य उगवला होता. लोकहितवादींनी त्याच सुमारास ब्राहाण्यातील ढींग, बडेजाव यावर स्वतः ब्राह्मण असूनही हड़ चढविले होते आणि आगरकर, प्रबोधनकार ठाकरे, छ. शाहू महाराज, कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे, डॉ. आंबेडकर यांचा वैचारिक मार्ग या महापुरुषांनी प्रशस्त केला होता. त्यामुळे ज्ञानसूर्याचे किरण समाजरूपी आकाशात बऱ्याच अंशी पसरले, आकाश तेजाने मरून गेले यात वाद नाही. या घटनेचे वर्णन बौद्धिक प्रगती ह्या शब्दात आज करायला हरकत नाही. म. फुले, लोकहितवादी पासून डॉ. आंबेडकरांपर्यंतचे महापुरुष जन्मले नसते तर मात्र आपला समाज तमीयुगातच ठेचा खात राहिला असता.
याचा अर्थ आज समाजाची बौद्धिक, वैचारिक पातळी खूप वाढली असे मात्र दुर्दैवाने होत नाही. म. जोतिरावांनी नवी मते मांडली हे खरे पण भारतीय समाज हा स्वभावाने परंपरावादी, पुराणमतवादी आहे. शिक्षणाने माणसात होतात ते बदल वरवरचेच असतात. मुळात माणूस जसा असतो तसाच तो मरेपर्यंत असतो. स्वतः म. फुले यांनीही अशीच तक्रार केली होती ते म्हणतात, 'आजपावेतो लक्षावधी रुपये विद्याखात्याकडे जरी खर्ची पडले तथापि त्यापासून समाजाच्या मानाप्रमाणे विद्वान लोकांचा भरणा वाढला नाही.' आज सुद्धा अशीच तक्रार शहाणी माणसे शिक्षितांबद्दल करीत असतात. उदाहरणार्थ, एका नव्या युगाच्या अभंगात, 'शाळा-कॉलेजात फिजिक्स शिकवी। संकष्टीही करी भक्तिभावे। अशा शिक्षकाला नदीत लोटावे। धारेतच द्यावे ढकलून।। यांच्यापेक्षा बरा अडाणी माणूस। तर्काने वागतो जन्मभर।।' असे दुखणे मांडले गेले आहे. ते खोटे नाही.
तरीही म. जोतिरावांच्या काळापेक्षा आजचा काळ बराच सुधारला आहे. त्यामुळे ह्या नवपरिवर्तनाची दखलही आपण घेतली पाहिजे आणि आशावादीही झाले पाहिजे, म्हणून तर परिवर्तनवादी विचारवंत डॉ.आ.ह. साळुखे म्हणतात. आता आमच्या धडावर आमचेच डोके असेल!' आपल्या एका विचारप्रधान पुस्तकाला त्यानी हे शीर्षक दिले असून त्यात ते म्हणतात, 'ठरावीक लोकांनीच डोके वापरायचे ही ऋग्वेदाच्या पुरुषसूक्ताने घातलेली मर्यादा आमच्या शंभरदीडशे पिढ्यांचे खच्चीकरण करायला कारणीभूत झाली पण आता आम्ही बोलू आणि त्यांना ऐकावे लागेल. त्यांनी सांगितलेल्या खोट्या इतिहासाला आम्ही आता चूड लावीत आहोत. आमच्या मेंदूतील गुलामीची जळमटे आम्ही जाळून टाकीत आहोत. वैदिकांनी आमच्या धडावर पुनःपुन्हा कलम करून चिकटवलेली शोषकांची डोकी चार्वाक, गौतम बुद्ध, म.फुले, छ. शाहू, डॉ. आंबेडकर यांनी छाटली आहेत आणि त्यांनी आमच्या धडावर आमचीच डोकी पुन्हा प्रस्थापित केली आहेत. समताप्रेमी महापुरुषांचे स्वप्न साकार व्हायला आता फार वेळ लागणार नाही.
॥ अभंग ।।
नवा सूर्य आता येतसे उदया। प्रकाशाची नव्या जागे आशा ।।१
समाजाने त्रास सोसलासे फार । शोषण अपार त्याचे झाले ।।२
दुष्ट आर्यभट पक्षपाती नीच। स्वतःकडे उच्च जात घेई ।।३
तिन्ही वर्णा केले गुलाम दुष्टाने । मेले ते कष्टाने बहुजन ।।४
जागे केले लोका थोर चार्वाकाने । गौतम बुद्धाने ज्ञान दिले ।।५
महात्मा फुल्यांनी मुक्तिमंत्र दिला । तोडिल्या शृंखला गुलामीच्या ।।६
वागविले आम्ही डोके भटजींचे। नर्कप्राय याचे दुःख होते ॥७
आता धडावर डोके आमुचेच। मोक्षसुख हेच आम्हांसाठी ।।८
प्रबोधनकार
प्रा.डाॅ.जे.बी. शिंदे
मो. ९२२५८०९०७१
कोल्हापूर.
0 Comments