Hot Posts

6/recent/ticker-posts

बळ बुद्धी वेचूनिया शक्ती | उदक चालवावे युक्ती ||

 बळ बुद्धी वेचूनिया शक्ती | उदक चालवावे युक्ती ||

बांधवांनो,

मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासूनच उन्हाच्या तीव्र झळा आपल्याला बसत आहेत. तशातच उन्हाळा म्हटला की पाणीटंचाई हा आपल्याकडे परवलीचा शब्द झालेला आहे. ग्रामीण भागात कित्येक किलोमीटर दूरवर जाऊन डोक्यावर पाण्याची ने आण करावी लागते आणि शहरी भागात सुद्धा बोअरवेल आटल्यामुळे अव्वाच्या सव्वा दरात टँकरचे पाणी विकत घ्यावे लागते. म्हणजेच पाणीटंचाई आता केवळ ग्रामीण भागापूर्ती मर्यादित राहिली नाही त्याच्या झळा शहरी भागातही पोचू लागलेल्या आहेत. याचे उत्तम उदाहरण म्हणजे बेंगलोर या आयटी (IT) शहराला बसलेला तीव्र पाणीटंचाईचा फटका. मार्च महिन्यातच बेंगलोर शहरातील रहिवासी पाण्यासाठी इतस्तत: भटकत होते आणि मोठमोठ्या रांगा लावत होते हे दृश्य आपण सर्वांनी पाहिलेच असेल. 

बांधवांनो पाण्याशिवाय आपल्या जीवनाची कल्पनाच केली जाऊ शकत नाही म्हणूनच जिथे जिथे पाणी आहे तिथेच माणसाने पहिली वस्ती केल्याचा इतिहास आहे. पाण्याचे हे महत्त्व लक्षात घेऊन पाण्याला जीवन असेही म्हटले जाते. आपल्याला आजही पाण्यासाठी निसर्गावर अवलंबून राहावे लागते. तंत्रज्ञानात आपण आकाशाला जरी गवसणी घातली तरी आजही आपण मुबलक प्रमाणात पाणी निर्माण करू शकत नाही हे वास्तव आहे. बेंगलोर शहर हे त्याचे जिवंत आणि ज्वलंत उदाहरण आहे. त्यामुळे पाण्याचा योग्य आणि काटकसरीने वापर करणे अतिशय गरजेचे झाले आहे. त्यासाठी आपणा सर्वांना एक छोटीशी सूचना द्यावीशी वाटते. विशेषतः शहरी भागात दाढी करण्यासाठी, तोंड धुण्यासाठी, आंघोळीसाठी टॅपिंग वॉटरचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. म्हणजे आपली एखादी कृती होईपर्यंत नळ चालूच ठेवले जातात. त्यामुळे जे कार्य एक ते दोन लिटर पाण्यात व्हायला हवे त्यासाठी कितीतरी लिटर पाणी विनाकारण वाया जाते. तेव्हा दाढी करण्यासाठी, तोंड धुण्यासाठी आपण एखाद्या मग वगैरेमध्ये पाणी घेऊन त्याचा वापर केल्यास बऱ्याच प्रमाणात पाण्याची बचत व्हायला मदत होईल. आंघोळीसाठी सुद्धा साधारण एक बकेट पाणी सर्वांना पुरेसे असते ते तसे वापरल्यास पाण्याची मोठ्या प्रमाणात बचत करता येऊ शकते. बांधवानो ही कृती छोटीशीच आहे. ज्यांच्याकडे चार चाकी गाड्या आहेत त्यांनी त्या गाड्या धुण्यासाठी सुद्धा कमी प्रमाणात पाण्याचा वापर करावा. कदाचित आपल्यासाठी दुर्लक्षित करण्यासारखी सुद्धा असू शकते. पण या छोट्याश्या कृतीचे महत्त्व पाणी बचत करण्यात खूप मोठे आहे. 

कारण पाणी हे निसर्गाचे प्रॉडक्ट असल्यामुळे त्यावर केवळ माणसांचाच नाही तर पशु पक्षांचा आणि झाडांचा सुद्धा आपल्या एवढाच हक्क आहे. म्हणून तर जगद्गुरु तुकोबाराय आदर्श गृहस्थाश्रमी व्यक्तीचे वर्णन करत असताना - 'भूतदया गाई पशूंचे पालन | तान्हेल्या जीवन वना माजी || ' असे म्हणतात. तहानलेल्या जीवांना पाणी देण्याएवढी उदारता जरी आपल्याकडे नसली तरी आपल्या हातून अनावश्यकपणे वाया जाणाऱ्या पाण्याला आपण आळा घालू शकतो. पाणी हे राष्ट्रीय संपत्ती असल्यामुळे पाण्याचा योग्य प्रमाणात वापर करणे आणि बचत करणे म्हणजे सुद्धा खूप मोठी राष्ट्रभक्ती आहे याचा सुद्धा आपण विचार करावा. 

शेवटी जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात - बळ बुद्धी वेचूनिया शक्ती | उदक चालवावे युक्ती || आपल्याकडील संपूर्ण बळ, शक्ती एवढेच नव्हे तर विचारशक्ती वापरून आपण उदक म्हणजे पाण्याचा युक्तीने वापर करण्याची शपथ घेऊया. आणि आपल्या भावी पिढ्यांना पाण्याच्या दुष्काळापासून वाचवूया.

@हभप डॉ बालाजी महाराज जाधव, छत्रपती संभाजीनगर

मो. ९४२२५२८१९०

Reactions

Post a Comment

0 Comments