Hot Posts

6/recent/ticker-posts

एक वाटी रस्सा अन् ५ वर्ष बोंबलत बस्सा" - शर्मिला पवार

 एक वाटी रस्सा अन् ५ वर्ष बोंबलत बस्सा" - शर्मिला पवार


बारामती(कटूसत्य वृत्त):-आगामी लोकसभा निवडणुकीसाठी बारामतीच्या रिंगणात पवारविरुद्ध पवार असा सामना रंगण्याची चिन्हे आहेत. अजित पवारांनी शरद पवारांशी फारकत घेतल्यानंतर आता बारामतीच्या लोकसभा रिंगणात अजितदादांच्या पत्नी सुनेत्रा पवार उतरणार असं बोललं जाते.

त्यातच सुप्रिया सुळे यांना या मतदारसंघातून महाविकास आघाडीकडून मैदानात उतरवलं आहे. अजित पवारांनी घेतलेल्या भूमिकेला विरोध करत खुद्द पवार कुटुंबातील अनेक जण सुप्रिया सुळेंच्या प्रचारासाठी उतरले आहेत. सध्या बारामतीच्या गावोगावी सुप्रिया सुळेंच्या प्रचारासाठी पवार कुटुंबातील श्रीनिवास पवार, शर्मिला पवार, युगेंद्र पवार आणि रोहित पवार कुटुंबीय फिरत आहेत. त्यात शर्मिला पवार यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना खावा कुणाचं बी मटण अन् दाबा फक्त तुतारीचं बटण असं आवाहन केले आहे.


बारामतीतील एका गावात प्रचार करताना शर्मिला पवार म्हणाल्या की, आम्ही कित्येक वर्षापासून बारामतीत प्रचार करतोय. प्रत्येकवेळी तुम्हाला आमिष दाखवले जाईल असं म्हणतोय. मटण, बोकड, जेवायला या सगळं सांगतील. एक वाटी मटणाचा रस्सा, खावा कुणाचं बी मटण, दाबा फक्त तुतारीचं बटण, नाहीतर एक वाटी रस्सा अन् ५ वर्ष बोंबलत बस्सा" अशा गावरान भाषेत त्यांनी कार्यकर्त्यांसोबत संवाद साधला.


तसेच वडिलांची पुण्याई सुप्रिया सुळेंच्या पाठिशी असणार आहे. परंतु त्यांनी कधीही पवार नावाचा वापर स्वत:च्या कामासाठी केला नाही. त्यांना निवडून द्यायचं की नाही हा अधिकार तुमचा आहे. जनता सुज्ञ आहे. आज काय घडतंय ते तुम्हाला माहिती आहे. आज मुखाने श्रीराम म्हणतोय, पण घराघरात रामायण सुरू आहे की महाभारत, अनोळखी व्यक्तीला मतदान करण्यापेक्षा जो आपल्या माहितीतला उमेदवार आहे. जी लेक माहेरवाशीण आहे तिला पुन्हा एकदा संधी द्यावी असं आवाहन शर्मिला पवार यांनी लोकांना केले.


दरम्यान, तुतारी फुंकणारा माणूस हे सुप्रियाताईंचे चिन्ह आहे. जे तुमचे बहुमूल्य मत आहे ते सुप्रिया सुळेंना, साहेबांना देऊन विजयी करायचे आहे. सुप्रिया सुळेंना पुन्हा एकदा संसदेत पाठवायचे आहे. संसदेत तुम्हाला बोलावेच लागते, भाषण करावेच लागते. तुम्हाला लोकांच्या समस्या मुद्देसूद मांडाव्या लागतात. जर ते काम सुप्रिया सुळे चांगले करत असेल. आधीचा माणूस चांगले काम करतोय, मग नव्याला संधी कशाला, साहेबांनी आजपर्यंत एकही निवडणूक हरली नाही. मग आता त्या व्यक्तीला हरवायचं का? ते पाप आपण घ्यायचे का? जर आपण दुसऱ्याला मत दिले तर पुन्हा पश्चाताप होईल. एकदा निर्णय घेतला की घेतला. त्यामुळे ४ जूनला सुप्रिया सुळे पुन्हा एकदा बारामतीच्या खासदार झाल्यात अशी गोड बातमी आपल्या सगळ्यांच्या कानावर येणार आहे असा विश्वास शर्मिला पवार यांनी व्यक्त केला. शर्मिला पवार या अजित पवारांचे बंधू श्रीनिवास पवार यांच्या पत्नी आहेत.

Reactions

Post a Comment

0 Comments