Ads

Ads Area

देवेंद्रजी, महाराष्ट्रावर गाढवाचा नांगर फिरवा ?

 देवेंद्रजी, महाराष्ट्रावर गाढवाचा नांगर फिरवा ?

पुण्यात ललीत कला केंद्राच्यावतीने नाटक सादर करणा-या विद्यार्थ्यांच्यावर अभाविपच्या गुंडांनी हल्ला केला. मुलींनाही बेदम मारले. वरती पोलिसांनी अभाविपच्या गुंडांना मोकळे सोडून नाटक सादर करणा-या विद्यार्थ्यांच्यावरच गुन्हे टाकलेत. परवा भाजपाच्या आमदारानेच चक्क गोळ्या घातल्या. हे सगळ पाहताना, ऐकताना महाराष्ट्र जळायचा काय बाकी उरलाय ? असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. आदिलशहाचा सरदार खवासखानाचा कारभारी मुरार जगदेवने पुण्यावर गाढवाचा नांगर फिरवला होता. पुणे जाळून बेचीराख करत चप्पल लावलेली पहार ठोकली होती. १६३० साली मुरार जगदेवने पुण्याची अशी हालत केली होती. हा इतिहास आत्ता का आठवला ? असा अनेकांना प्रश्न पडेल. सध्या महाराष्ट्र ज्या पध्दतीने जळतो आहे ते पाहता महाराष्ट्रात जाळण्यासारखं फारसं काय उरलं आहे ? असं वाटत नाही. मुरार जगदेवने पुणे जाळून बेचीराख केले. त्यानंतर गाढवाचा नांगर फिरवत चप्पल लावलेली पहार ठोकून दिली होती. सध्याची महाराष्ट्राची अवस्था पाहता राज्यावर फक्त गाढवाचा नांगर फिरवणे आणि चप्पल लावलेली पहार ठोकणेच बाकी उरले आहे असे वाटते. आसुरी राजकीय महत्वकांक्षेने सर्वप्रथम स्वत:चीच वाट लावत नंतर राज्याची वाट लावणा-या देवेंद्र फडणवीस यांनी राज्यावर गाढवाचा नांगर फिरवावा. रोज थोडं थोडं करण्यापेक्षा एकदा संपुर्ण राज्य बेचीराख करावे, जाळून ध्वस्त करावे. मुरार जगदेव नंतर असा पराक्रम केलात म्हणून इतिहास तुमची नक्की नोंद घेईल देवेंद्रजी.

        २०१४ ला देवेंद्र फडणवीस जसे मुख्यमंत्री झाले. भाजपात मुंडे-महाजनांच्या निधनानंतर दिल्लीच्या आशिर्वादाने सर्वात जास्त पॉवरफुल नेते म्हणून ते पुढे आले तसे त्यांचे उपदव्याप वाढले. सर्वात प्रथम त्यांनी स्वत:ची खुप चांगली प्रतिमा बेचीराख केली. देवेंद्र फडणवीस या हूशार व प्राणाणिक माणसावर सर्वपक्षीय लोक प्रेम करत होते. आम्हीही फडणवीसांच्या तत्कालीन  प्रतिमेच्या प्रेमात होतो. पण फडणवीस मुख्यमंत्री झाले आणि त्यांची मती फिरली. फडणवीसांच्या सुदैवाने विरोधी पक्षातले सर्वच मात्तबर नेते एकतर संपले किंवा त्यांचे वय झाले. त्यामुळे त्यांचा प्रभाव संपुष्टात आलेला होता. कुणी खंबीर विरोधकच नसल्याने फडणवीसांचा  वारू चौखूर उधळू लागला. सोबतीला तपास यंत्रणांची ताकद, सत्ता त्यामुळे तो कुणाला रोखता येईल का ? याची धास्ती निर्माण झाली आहे. बाकी उरलेल्या भ्रष्ट व सुमार नेत्यांच्यात फडणवीस मोठे दिसू लागलेत. "वासरात लंगडी गाय शहाणी" या नियमाने फडणवीस ताकदवर दिसू लागलेत. निरंकूश सत्ता हातात असल्याने सर्वपक्षीय हुजरे व लाचार फडणवीसांचे तळवे चाटू लागलेत. विरोधी पक्षातले भ्रष्ट व भानगडबाज पटाटा देवेंद्रजींच्या समोर वाकू लागलेत. नेहमीच घमेंडीने फुरफुरलेले अजित पवारही लंगोटीत घाण असल्याने फडणवीसांच्या समोर शेळी झालेत. त्यांची खुषमस्करी करू लागलेत. भाजपासह विरोधी पक्षातले नेतेही फडणवीसांना शरण जात त्यांची उष्टी चाटू लागलेत. माझ्यासारखा बडा नेता राज्यात नाही याच भ्रमात फडणवीस जगू लागलेत. विरोधकांचा प्रभाव कमी करण्याचे राजकारण न करता त्यांना संपवण्याचेच कारस्थान करू लागलेत. लोकांच्या मनातून संपवता येत नाहीत तर त्यांना विकत घेवून त्यांचे पक्ष फोडले जात आहेत. पैशाच्या व इडीच्या बळावर विरोधी पक्ष फोडून त्यातल्या नेत्यांना आपल्या कळपात ओढले जात आहे. टिनपाट लोकं सोबतीला घेवून विरोधकांच्यावर सोडली जात आहेत. नळावर किंवा पान टपरीवर ज्या लायकीने भांडतात तशा लोकांची टोळी करून त्यांना विरोधकांच्यावर सोडले जात आहे. अत्यंत खालच्या पातळीवर जात आरोपांचे शेण फेकण्याचे काम चालू आहे. असे अनेक वाचाळवीर त्यांनी पाळले आहेत. पक्षासाठी जीवनातील अनेक वर्षे घालवणा-या स्वपक्षीय  नेत्यांना अडगळीत टाकून फडणवीस या वाचाळवीरांना सत्तेचे स्तन्य पाजू लागलेत. यामुळेच महाराष्ट्राच्या अवघ्या राजकारणाचा चिखल झाला आहे.

    अवघ्या महाराष्ट्राचे कल्याण करण्याची संधी देवेंद्रजींच्या समोर असताना या माणसाने स्वत:ला व स्वत:च्या पक्षातील स्पर्धक नेत्यांना ध्वस्त करत राज्याच्या राजकारणात सुडाच्या राजकारणाचे सुरूंग पेरले आहेत. राज्यातले राजकारण अत्यंत गलिच्छ पातळीवर आणून ठेवले आहे. देवेंद्र फडणवीसांनी एका चांगल्या राज्याची वाट लावली आहे. सत्तेची महत्वकांक्षा आणि आभाळाला भिडलेला त्यांचा अहंकार राज्याची वाट लावलेच पण त्यांची स्वत:चीही वाट लावल्याशिवाय राहणार नाही. एकेकाळी सर्वांना प्रिय वाटणारा हा नेता आज द्वेषाची आणि मत्सराची मिसाल ठरला आहे. त्यांना वाटतं लोक त्यांची जात पाहून तिरस्कार करतात. पण हे सत्य नाही. तस असतं तर लोकांनी सचिन तेंडूलकरला क्रिकेटचा देव म्हंटल नसतं. सामान्य जनता सर्वात जास्त तिरस्कार फडणवीसांचाच करते. देवेंद्रजींनी कधीतर खुषमस्क-यांच्या, लाचारांच्या व हुज-यांच्या झुंडीतून बाहेर पडत कानोसा घ्यावा. लोक काय म्हणतात ? काय बोलतात ते नक्की ऐकावे. "जैसी करणी वैसी भरणी" हा काळाचा नियम आहे. जे पेराल तेच उगवते. देवेंद्रजी तुम्ही जे सुडाचे सुरूंग पेरलेत ते एक ना एक दिवस भरभरून उगवतील. तुम्ही धर्म मानता, देव मानता, आत्मा-परमात्मा मानता.लकधीतर सत्तेच्या धूंदीतून बाहेर पडून स्वत:च्या आत डोकावा आणि आत्मचिंतन करा. आज जे तुमच्यासोबत आहे त्यातलं आयुष्याच्या संध्याकाळी सोबत असेल याची खात्री नाही. आत्ता जे चमचे मागे-पुढे करत आहेत, तळवे चाटत आहेत, तुमचे खरकटे ढूंगण चाटायलाही जे पुढे पुढे येत आहेत ते सगळे त्यावेळी सोबत नसतील. ही सगळी झुंड स्वार्थी, मतलबी लोकांची आहे. तुमच्या हातातली सत्ता जाऊ द्या मग बघा हे तुमच्यावरच वार करायला कसे सरसावतात ते. लाचार, हुजरे, तळवेचाटू असेच असतात. जिथ मतलब तिथ विष्ठा खायलाही हजर होतात. अशा लोकांच्या जीवावर तुम्हाला तुमची उंची आभाळाला टेकली असल्याचा भास होत असेल तर त्यातून बाहेर पडा. 'जग हे दिल्या घेतल्यांचे । असं संत तुकारामांनी सांगितल आहे. अजूनही वेळ गेली नाही. या सगळ्या भानगडीतून बाहेर पडा. अजूनही तुम्ही या द्वेषाच्या फॅक्टरीला आग लावून सकारात्मक विकासाचे राजकारण करू शकता. राज्याचे खुप चांगले हित करू शकता. राज्यात विकासाचे नवे पर्व सुरू करू शकता आणि राज्याला प्रगतीपथावर नेऊ शकता. वेळ गेल्यावर अक्कल येऊन उपयोग नाही. बैल गेल्यावर झोपा करण्यात शहाणपण नसते.  एकेकाळी लालकृष्ण अडवाणींची भाजपात काय ताकद होती. आज त्यांची काय अवस्था आहे ? याचा साकल्याने विचार करा देवेंद्रजी. किमान आयुष्याची संध्याकाळ तरी सुखाची व चैतन्याची जाईल. मुरार जगदेवने जिथं गाढवाचा नांगर फिरवला तिथच जिजाऊ मातेनं आपल्या बारा वर्षाच्या लेकराला म्हणजे शिवरायांना सोबत घेवून सोन्यांचा नांगर धरला. त्याच जमिनीत स्वराज्याचे पिक नंतर तरारून आले. देवेंद्रजी तुम्ही या राज्यावर आज गाढवाचा नांगर फिरवता आहात पण येणा-या काळात याच चिखलातून सोन्याचा नांगर धरणारा कुणीतर पुढे येईल. कारण या महाराष्ट्राला शुर-वीरांचा, संताचा वारसा आहे. आज लाचार, हुजरे, चमचे व बाजारबुनगे सर्वत्र माजलेले दिसत असले तरी हे शाश्वत नाहीत. सत्यासाठी मरणा-या मावळ्यांचा वारसा या मातीला आहे.  

   देवेंद्रजी तुमच्या या हलकट राजकारणाने महाराष्ट्राचा उत्तरप्रदेश होताना दिसतो आहे. इतका धार्मिक उन्माद आणि  अनागोंदी या पुर्वी कधीच दिसत नव्हती. २०१४ नंतर शिवरायांचा, फुले, शाहू, आंबेडकरांचा महाराष्ट्र धार्मिक उन्मादाने भरताना दिसतो आहे. राजकारणात, समाजकारणात विकृती प्रस्थापित होताना दिसते आहे. महाराष्ट्राची सामाजिक व राजकीय घडी विस्कटली आहे. जिथं फुलं वेचली तिथं गोव-या वेचायची वेळ आली आहे. तुम्हाला जर काही विधायक नाही करता आल तर नका करू पण जो महाराष्ट्र अनेक चळवळींनी, समाजसुधारकांच्या त्यागाने, संताच्या शिकवणीने घडला आहे तो तरी उध्वस्त नका करू इतकीच विनंती.

दत्तकुमार खंडागळे संपादक वज्रधारी, मो. 9561551006


Post a Comment

0 Comments

Top Post Ad

Below Post Ad

close