ध्येय ठरवण्यासाठी मदत करणारी
पुस्तकेच घडवतात खरे परिवर्तन
वाचन प्रेरणा दिन कार्यक्रमात सिद्धाराम पाटील यांचे मत
दयानंद शिक्षण संस्था व जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाचे आयोजन
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- ज्ञानाचा सागर अफाट आहे. प्रत्येकाकडे वेळ आणि शक्ती मर्यादित आहे. अशा वेळी नेमके काय वाचायचे हे कळणे महत्त्वाचे आहे. ध्येय ठरवण्यासाठी मदत करणारी पुस्तकेच माणसाच्या जीवनात खरे परिवर्तन घडवत असतात, असे प्रतिपादन पत्रकार सिद्धाराम पाटील यांनी केले. जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय आणि दयानंद शिक्षण संस्थेच्या वतीने वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी संस्थेचे डॉ. विजयकुमार उबाळे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी संतोष जाधव, ग्रंथालय निरीक्षक प्रमोद पाटील, ग्रंथमित्र कुंडलिक मोरे, डॉ. पी. व्ही. अडस्कर, प्रदीप गाडे , ज्योतिराम चांगभले, मिसालोलू आदी उपस्थित होते.
स्वामी विवेकानंद यांचे विचार तरुणांसाठी प्रेरक असून प्रत्येक तरुणाने स्वामीजींचा एक विचार आयुष्यभरासाठी स्वीकारल्यास देशात मोठे परिवर्तन होईल, असे थोर शास्त्रज्ञ डॉ. एपीजे कलाम यांनी म्हटले होते. स्वामी विवेकानंद यांचे ‘भारतीय व्याख्याने’ हे पुस्तक तरुणांना आपले ध्येय निश्चित करण्यासाठी उपयुक्त आहे. ध्येयाला अनुकुल वाचन केल्याने आपले जीवन विकसित होते, असे पाटील यांनी सांगितले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील उदाहरणे सांगत वाचनासोबत शील आणि देशभक्तीची भावना महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संतोष जाधव यांनी केले सूत्रसंचालन डॉ. अडसकर तर आभार प्रदर्शन प्रमोद पाटील यांनी मानले. प्रसंगी सार्वजनिक ग्रंथालयांचे प्रतिनिधी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments