सिव्हिलसाठी सिटी स्कॅन मशीन जिल्हा नियोजन निधीतून खरेदी
करण्याची आ. राम सातपुते यांची मागणी
माळशिरस (कटूसत्य वृत्त):- सोलापूर जिल्ह्यासाठी एकमेव शासकीय रुग्णालय म्हणून असलेल्या सिव्हील हॉस्पिटलमध्ये सध्या सिटी स्कॅन मशीन नाही, अनेक वर्षांपासून ती बंद अवस्थेत आहे, जिल्ह्यातून शेकडो रुग्ण रोज त्या ठिकाणी जातात मात्र त्यांना सिटी स्कॅन मशीन बंद असल्याने ना इलाजाने बाहेर उपचार करावे लागतात, ही आर्थिक परिस्थिती हलाखीची असलेल्या रुग्णाची एक प्रकारे आर्थिक पिळवणूक आहे, सिव्हिल रुग्णालयाला आरोग्य विभागाकडून सिटी स्कॅन मशीन जर मिळत नसेल ती मशीन जिल्हा नियोजनच्या पैशातून खरेदी करा अशी आक्रमक मागणी माळशिरसचे आ राम सातपुते यांनी सोलापूर येथे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या जिल्हा नियोजन बैठकीत बोलताना केली.
दरम्यान आजच्या बैठकीत आ राम सातपुते चांगलेच आक्रमक झालेले पहायला मिळाले. प्रत्येक बैठकीला अनेक विषय आम्ही उचलतो मात्र त्यावर कारवाई काय केली जाते?तसेच, आम्ही राज्य सरकडून निधी आणतो मात्र त्यानंतर कागदपत्रांची पूर्तता करण्याची जबाबदारी कर्मचाऱ्यांची असते. जिल्हा परिषद कर्मचारी आणि ग्रामसेवक यांच्या कागदपत्र देण्याच्या टाळाटाळीमुळे आम्ही माळशिरस तालुक्यात आणलेला तीन कोटी रुपये निधी रद्द होण्याच्या मार्गावर आहे. गटविकास अधिकारी सुद्धा यामध्ये गंभीर नाहीत, सर्व अधिकाऱ्यांना या विषयात स्पष्ट सूचना द्या, कागदपत्र न देणाऱ्या कर्मचारी, अधिकाऱ्यांवर कारवाई करा अशी मागणीही आ सातपुते यांनी केली.
अनेक ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र बांधून पूर्ण आहेत, मात्र कर्मचारी नसल्याने त्या खोल्या पडून आहेत, मात्र राज्याच्या आरोग्य विभागातून शक्य नसेल तर राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अंतर्गत कर्मचारी भरती करा मात्र तातडीने ती बांधून पूर्ण असलेली प्राथमिक आरोग्य केंद्र तातडीने कार्यरत करा, त्यासाठी पालकमंत्र्यांकडे स्वतंत्र बैठक लावा असेही आ राम सातपुते बैठकीत म्हणाले. दरम्यान विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्जासाठी अनेक अडचणी येत आहेत, एखाद्या कुटुंबाचे सिबिल स्कोअर खराब असेल तर त्याची शिक्षा त्या विद्यार्थ्याला होते, त्याला शैक्षणिक कर्ज मिळू शकत नाही, विद्यार्थी अनेकवेळा बँकेत हेलपाटे मारतो मात्र त्याला दाद दिली जात नाही. यासाठी जिल्हा स्तरावर एक अधिकारी नेमला पाहिजे, या विषयात विविध महामंडळ असतील तर त्या बैठका आणि समन्वय त्या त्या तालुक्यात बैठका घेऊन झाला पाहिजे, जेणेकरून सामान्य विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्ज मीळण्यासाठी सोपे होईल अभी भूमिका आ राम सातपुते यांनी बोलताना सभागृहात मांडली.
एक महिना सर्व आमदार आणि खासदार एकत्रित मिळून आरोग्य विभागाकडे मशिनची मागणी करू, जर मशीन एक महिन्यात मिळाली नाही तर मात्र जिल्हा नियोजनाच्या पैशातून ती खरेदी करू अशी भूमिका पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मांडली.
0 Comments