अनोखा विवाह सोहळा
लग्नात सत्काराला फेटे,हाराला बगल देत संविधानाचे केले वाटप,अरण
येथील ताकतोडे-चौधरी परिवाराचा संविधानाच्या जनजागृतीसाठी आदर्श
उपक्रम
माढा (कटूसत्य वृत्त):-कोणताही लग्न समारंभ म्हटलं की लग्नात आलेल्या पै पाहुणे मान्यवर मंडळीच्या सत्काराला हजारो रुपयांचा चुराडा केला जातो.हा खर्च निर्थक ठरतो.अश्यातच लग्नात सत्काराला फेटे बांधुन हार घालुन स्वागत करण्याला बगल देत संविधानाची प्रती वाटप करण्यात आल्या.अरण येथील ताकतोडे-चौधरी परिवाराने संविधानाच्या जनजागृतीसाठी हा आदर्श उपक्रम लग्न समारंभात राबवला.
लग्न समारंभात सत्कारासाठी फेटे, शाल, हारतुरे या अनावश्यक होणाऱ्या मोठ्या खर्चाला फाटा देत. अरण (ता.माढा) ताकतोडे परिवाराने एक आगळावेगळा उपक्रम राबविला असून, संविधान घराघरात वाचले जावे व जनजागृती व्हावी यासाठी आलेल्या पै-पाहुण्यांचे स्वागत गुलाबपुष्प व संविधानाचे पुस्तक भेट देऊन केले आहे. वाचन संस्कृती रुजविणाऱ्या या अनोख्या विवाह सोहळ्याचे सध्या सर्वत्र कौतुक होत आहे. अरण येथे नुकताच विशाल व नम्रता यांचा विवाह पार पडला. या विवाह समारंभात ताकतोडे परिवाराकडून पाहुण्यांना पुस्तके भेट दिली आहेत.
यावेळी नागरिकांमध्ये समता, बंधुता रुजावी, धार्मिक तसेच जातीभेद नष्ट व्हावेत, यासाठी प्रत्येकाने महापुरूषांचे विचार आत्मसाद करावे, ते घराघरात पोहचावेत. तसेच मोबाईमुळे लोप पावत असलेली वाचन संस्कृती रुजावी या पार्श्वभूमीवर लग्नात आलेल्या पै-पाहुण्यांचा संविधान देऊन सत्कार करण्याचा निर्णय वराचे बंधू दिपक ताकतोडे व बसवेश्वर आखाडे यांनी घेतला. त्यानुसार त्यांनी लग्न समारंभासाठी आलेल्या, पाहुण्यांना 'संविधानाचे पुस्तक' वाटप केले. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य भारत शिंदे, माजी सभापती शिवाजी कांबळे, सेवानिवृत्त पोलिस अधिकारी शिवदास ताकतोडे, तात्या शिंदे, पांडूरंग राऊत, अण्णासाहेब देशमुख, राजेंद्र ढेकणे, राहुल सरवदे, संजय सदाफुले आदी उपस्थित होते.
फेटे बांधून लग्नाला शोभा वाढविण्याच्या नादात खर्च, वेळेचा अपव्यय होतो. याशिवाय आलेल्या पाहुण्यांना पुस्तके दिल्यास ज्या व्यक्तीला वाचता येत नाही असेही व्यक्ती पुस्तके आवडीने घरी घेऊन जातात. त्यात संविधान मिळाल्यावर लोक आणखी आवडीने वाचतील व संविधानाचे वाचन घराघरात होईल या हेतूने हा उपक्रम राबविण्यात आला असुन इतरांसाठी अनुकरणीय आहे
0 Comments