Hot Posts

6/recent/ticker-posts

शाहू महाराजांनी आंदोलक शेतकऱ्यांची भेट घेतल्याने शेट्टींनाही १२ हत्तींचे बळ

 शाहू महाराजांनी आंदोलक शेतकऱ्यांची भेट घेतल्याने शेट्टींनाही १२  हत्तींचे बळ 


 कोल्हापूर(कटूसत्य वृत्त):-स्वाभिमानी शेतकरी संघटनेने गुरुवार दि २३ नोव्हेबर रोजी सकाळपासूनच पुणे-बेंगलोर महामार्ग रोखून धरला आहे. मागील हंगामातील १०० रुपये शेतकऱ्यांना मिळावेत, यासाठी संघटनेचे प्रमुख तथा माजी खासदार राजू शेट्टी ठाम आहेत. तब्बल सहा तासांहून अधिक काळ महामार्ग रोखून धरल्याने दोन्ही बाजूने प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरचे श्रीमंत शाहू महाराज यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांची भेट घेऊन स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. 

श्रीमंत शाहू महाराज यांनी दोन आठवड्यापूर्वी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली होती. आता त्यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची पुणे-बेंगलोर महामार्ग पंचगंगा पुलावर येथे ऊस उत्पादक शेतकऱ्यांची भेट घेतली. यावेळी माजी खासदार राजू शेट्टी यांनी श्रीमंत शाहू महाराज यांनी आपल्या आंदोलनकर्त्याची भेट घेतल्याने स्वाभिमानी संघटनेला बारा हत्तीचे बळ मिळाल्याचे सांगितले.

ऊस उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या कामाचा मोबदला मिळाला पाहिजे, त्यासाठी मी शेतकऱ्यांच्या सोबत आहे. राज्य सरकार आणि कारखानदारांनी या प्रश्नाची योग्य दखल घेतली पाहिजे. आजच्या आज यावर तोडगा निघाला पाहिजे, असे या वेळी श्रीमंत शाहू महाराज यांनी सांगितले.

मागील हंगामात गाळप झालेल्या उसाचे १०० रुपये देण्यास तीन-चार कारखाने तयार आहेत. मात्र कारखानदारांकडून लेखी प्रस्ताव आल्याशिवाय आम्ही मागे हटणार नाही, अशी भूमिका शेट्टी यांनी घेतल्याचे सांगितले. श्रीमंत शाहू महाराज यांच्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा विश्वास आहे. त्यांनी जिल्हा प्रशासन कार्यालयात जाऊन कारखानदारांचे प्रस्ताव खात्रीशीर बघावेत. ते आल्यानंतरच आम्ही आंदोलनाची पुढील दिशा ठरवू, अशी प्रतिक्रिया राजू शेट्टी यांनी दिली.

दरम्यान, श्रीमंत शाहू महाराज यांनी आंदोलन स्थळी भेट दिल्यानंतर ते स्वतः, स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष जालिंदर पाटील, सावकार मादनाईक, जिल्हा पोलिस प्रमुख महेंद्र पंडित हे या प्रस्तावाची पडताळणी करायला जिल्हाधिकारी कार्यालयाकडे गेले असल्याची माहिती शेट्टी यांनी दिली

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी सकाळपासून आंदोलनात सहभागी झालेले आहेत. दुपारी चार वाजता त्यांनी भात आमटी शिजवून रस्त्यावरच पंगत बसवली. महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच राष्ट्रीय महामार्गावर आंदोलनाच्या निमित्ताने मोठी जेवणाची पंगत बसलेली पहायला मिळाली. जवळपास तीन हजारपेक्षा जास्त कार्यकर्त्यांनी या जेवणाचा लाभ घेतला.

Reactions

Post a Comment

0 Comments