Hot Posts

6/recent/ticker-posts

2000 हून अधिक म्यानमार नागरिकांनी भारतीय सीमा ओलांडून मिझोरामध्ये घेतला आश्रय

 गाझानंतर म्यानमारमध्ये युद्धाला सुरुवात, एअरस्ट्राईक! २००० लोक आश्रयासाठी भारतात घुसले



म्यानमार(कटूसत्य वृत्त):- चीन राज्यात एअरस्ट्राईक आणि भीषण गोळीबारामुळे गेल्या २४ तासांपासून त्या देशात अराजकता, भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे भारताच्या मिझोरामच्या सीमेवरून मोठ्या प्रमाणावर म्यानमारच्या नागरिकांनी प्रवेश केला आहे.

जवळपास २००० लोक आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून मिझोरममध्ये आल्याचे चम्फाई जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

रविवारी संध्याकाळी म्यानमारचे सत्ताधारी जुंटा-समर्थित सैन्य आणि मिलिशिया ग्रुप पीपल्स डिफेन्स फोर्स यांच्यात जोरदार गोळीबार झाला, असे जिल्हाधिकारी जेम्स लालरिंचना यांनी वृत्तसंस्था पीटीआयला सांगितले. पीडीएफने भारतीय सीमेजवळ असलेल्या म्यानमारच्या चिन राज्यातील खावमवी आणि रिखावदार या दोन लष्करी स्थानांवर हल्ला केला. यानंतर चकमक सुरु झाली.

गोळीबारामुळे शेजारच्या खवमावी, रिखावदार आणि चिन या गावांतील 2000 हून अधिक म्यानमार नागरिकांनी भारतीय सीमा ओलांडून मिझोरामध्ये आश्रय घेतला आहे. पीपल्स डिफेन्स फोर्सने सोमवारी पहाटे म्यानमारच्या रिखावदार लष्करी तळावर ताबा मिळवला आणि दुपारपर्यंत खवमावी लष्करी तळावरही नियंत्रण मिळवले.

प्रत्युत्तरादाखल म्यानमारच्या लष्कराने सोमवारी खावमावी आणि रिखावदार गावांवर हवाई हल्ले केले. गोळीबारात जखमी झालेल्या किमान 17 जणांना उपचारासाठी चंफई येथे आणण्यात आले. जोखावथर येथे म्यानमारच्या 51 वर्षीय नागरिकाचा मृत्यू झाला. सीमेपलीकडून आलेल्या गोळीने तो जखमी झाला आणि काही वेळाने त्याचा मृत्यू झाला.

Reactions

Post a Comment

0 Comments