काँग्रेसमध्ये गटबाजी, जिल्हाध्यक्ष पदावरुन मोठा वाद
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर काँग्रेसमध्ये वादाची ठिणगी पडली असतानाच जिल्हाध्यक्षांनी बुधवारी सायंकाळी मोठा खुलासा केला आहे. लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ग्रामीण भागात काँग्रेसचे दोन जिल्हाध्यक्ष नेमावे अशी मागणी शहर अध्यक्ष चेतन नरोटे यांनी केली होती.यावरून ग्रामीण भागातील डॉ धवलसिंह मोहिते पाटील यांच्या समर्थकांनी व तालुकाध्यक्षकांनी तीव्र विरोध केला होता.
पत्रकार परिषद घेऊन ग्रामीण भागातील तालुकाध्यक्षकांनी शहर अध्यक्षवर नाराजी व्यक्त केली होती. दोन जिल्हाध्यक्ष पदावरून शहर अध्यक्ष व जिल्हाअध्यक्ष असे दोन गट पडले आहेत.सोलापूर काँग्रेस मध्ये दोन जिल्हाध्यक्ष पदावरून फूट पडते की काय असे चित्र निर्माण झाले आहे. ग्रामीण भागातील काँग्रेस नेत्यांनी थेट सुशीलकुमार शिंदे यांची भेट घेऊन शहर अध्यक्षकांना ताकीद द्यावी अशी मागणी केली आहे.
काँग्रेस नेत्यांची शहराध्यक्षांवर टीका
काँग्रेस शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी प्रथम शहरात लक्ष घालावे. ग्रामीण भागाच्या कामावर बोलू नये, अशी टीका जिल्हा काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष सुधीर लांडे आणि उपाध्यक्ष विजयकुमार हत्तुरे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत घेतली. १० पक्ष फिरून आलेल्यांनी मला शिकवू नये, असे प्रत्युत्तर नरोटे यांनी दिले होते.यावर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ धवलसिंह यांनी खुलासा करत बुधवारी सायंकाळी माध्यमांना सांगितले, काँग्रेसच्या घटनेत तशी तरतूद नाही. एका जिल्ह्यासाठी दोन जिल्हाध्यक्ष नेमता येत नाही.
लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नुकतीच पुण्यात बैठक घेतली. सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी स्वतंत्र जिल्हाध्यक्ष नेमावा, अशी मागणी चेतन नरोटे यांनी केली होती. या मागणीवर मोहिते- पाटील समर्थकांनी पटोले यांच्याकडे आक्षेप नोंदविला होता. पुन्हा मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडली. विजयकुमार हत्तुरे म्हणाले, सुशीलकुमार शिंदे आणि मोहिते-पाटील कुटुंबीय जवळ येत असल्याचे काही जणांना बघवत नाही. काँग्रेस जिल्हाध्यक्ष, शहराध्यक्ष किती असावेत याचा निर्णय राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये होतो. लोकसभेसाठी स्वतंत्र जिल्हाध्यक्ष हे अज्ञानातून केलेले वक्तव्य आहे.
0 Comments