Hot Posts

6/recent/ticker-posts

श्री विठ्ठल कारखान्याची ४८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न

 श्री विठ्ठल कारखान्याची ४८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न


वेणुनगर, (कटूसत्य वृत्त):- श्री विठ्ठल सह. साखर कारखान्याची ४८ वी अधिमंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा दिनांक ३०.०९.२०२३ रोजी सकाळी ११.०० वाजता कारखाना कार्यस्थळावर कारखान्याचे चेअरमन, अभिजीत धनंजय पाटील यांचे अध्यक्षतेखाली उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. यासभेत सभासदांनी सर्व विषयांना एकमताने मंजूरी दिली. सभेच्या सुरुवातीस श्री विठ्ठलाच्या प्रतिमेचे पुजन, कारखान्याचे संस्थापक चेअरमन कर्मवीर कै. औदुंबरआण्णा पाटील, संस्थापक-व्हाईस चेअरमन यशवंतभाऊ पाटील, दिवंगत सर्व माजी चेअरमन यांच्या प्रतिमेचे पुजन उपस्थित जेष्ठ सभासदांचे शुभहस्ते करण्यात आले.

कारखान्याचे कार्यलक्षी संचालक प्रा. तुकाराम मस्के यांनी सर्व उपस्थित सभासदांचे स्वागत करुन श्रध्दाजंलीचा ठराव मांडला. यावेळी कारखान्याचे प्र. कार्यकारी संचालक, डी. आर. गायकवाड यांनी विषय पत्रीकेवरील विषयांचे वाचन केले. या सर्व विषयांना सभासदांनी आवाजी मतांनी व हात उंचावून मंजूरी दिली. कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांनी सन २०२२ - २३ हंगामाचा अहवाल सादर करुन या हंगामात फक्त १२५ दिवसात ७,२६,१४२ मे.टन ऊसाचे गाळप होऊन ६,६४, ४२० क्विंटल साखरेचे उत्पादन होवुन सरासरी साखर उतारा १०.९० टक्के इतका मिळाला आहे. मागील हंगामात साखर उताऱ्याचा विचार करता केंद्र शासनाच्या एफ.आर.पी. धोरणानुसार तोडणी वाहतूक खर्च वजा जाता निव्वळ एफ. आर. पी. रुपये २३९५.५८ प्र. मे. टन एवढी निघत आहे. परंतु मा.संचालक मंडळाने सभासद शेतकऱ्यांना रुपये २५००/- प्रति मे. टन दर देणेचे आश्वासन दिलेले होते. त्याप्रमाणे आजतागायत प्र. मे.टन रुपये २४०० /- रक्कम अदा केली आहे. उर्वरीत रक्कम रुपये १००/- प्र. मे. टन याप्रमाणे तिसरा व अंतिम हप्ता दिपावली सणानिमित्त सभासद शेतकऱ्यांना अदा करणेचा संचालक मंडळाने निर्णय घेतलेला आहे. गळीत हंगाम २०२३-२४ करिता कारखान्याचे कार्यक्षेत्रामधून ३५,५०२ एकर ऊसाची नोंद झालेली असुन त्यापासुन अंदाजे ९ लाख मे.टन ऊस उपलब्ध होईल. सदर नोंदलेल्या ऊसाचे गळीत वेळेत पार पाडणेसाठी कारखान्याने पुरेशी ऊस तोड यंत्रणा उभी केलेली आहे. येणाऱ्या २०२३ - २४ हंगामकरीता जिल्हयातील इतर कारखान्याबरोबर दराची स्पर्धा करू कारखान्याने अद्यावत बॉस ई. आर. पी. प्रणाली घेवून संपूर्ण कामकाज संगणकीकृत व मोबाईल अॅपव्दारे सुरु केले असून यापुढे शेतकऱ्यांना त्यांच्या ऊसाच्या नोंदी मोबाईल अॅपव्दारे करता येतील. सध्या जागतीक बाजार पेठेमध्ये साखरेचे दर वाढलेले असून केंद्र सरकारने डिसेंबर महिन्यापासून साखरेवर निर्यात बंदी केलेली आहे. त्यामुळे ही निर्यात बंदी उठविणेबाबत व साखरेची किमान आधारभुत किंमत रु.३७२०/- करावी, असे दोन ठराव सभेमध्ये मंजुर करुन केंद्र व राज्य शासनास पाठविण्यात यावे. याकरिता सर्व उपस्थित सभासदांनी एकमताने मंजुरी दिली.

कारखान्याचे २९.८ मे.वॅट को - जन व ३०,००० लिटर्स क्षमतेचा डिस्टीलरी प्रकल्प यशस्वीपणे चालू आहेत. व कारखान्याचा बायो सी. एन. जी. प्रकल्पाचे भुमिपुजन दि. ७.५.२०२३ रोजी माजी केंद्रीय कृषीमंत्री तथा खासदार शरदचंद्रजी पवार यांच्या शुभहस्ते, आमदार रोहित पवार व इतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. हा प्रकल्प उभा करणेसाठी सभासदांनी सभेमध्ये मंजुरी दिली.
कारखाना परिसरात राहणाऱ्या महिलासाठी, गारमेंटसमध्ये काम करणाऱ्या वेगवेगळया ३० कंपन्याशी करार करुन कारखान्याच्या ३ गोडावूनमध्ये ५०० शिलाई मशिन उपलब्ध करुन देवून, त्यामधून भविष्यामध्ये १ हजार महिलांना रोजगार उपलब्ध करुन देणार असल्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांनी सांगीतले. कारखाना कार्यस्थळावर अंगणवाडी ते ज्युनिअर कॉलेजमध्ये ११५० इतके विद्यार्थी ज्ञानार्जन करीत आहेत, प्रशालेमध्ये सध्या ४५ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी कार्यरत असून ज्ञानदानाचे कार्य करीत आहेत. शाळेची गुणवत्ता वाढीस लागली आहे.

कारखान्यामार्फत सभासदांकरीता व कामगारांकरीता कार्यक्षेत्रामध्ये शेतकरी मेळावे, ऊस पिक परिसंवाद, सांस्कृतिक कार्यकम, कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य शिबीर, सर्व रोग निदान शिबीरे असे विविध सुविधा उपलब्ध करुन दिल्या जातात. कामगार पतसंस्थेचे कामकाज सुरु करुन पुर्वीप्रमाणे कर्ज व लाभांस वाटप सुरु केलेले आहे. गळीत हंगाम २०२२ - २३ यशस्वीरित्या पार पाडल्याबद्दल कामगारांना उत्तेजनार्थ ११ दिवसाचा पगार बक्षीस म्हणुन देण्याचे ठरले आहे ते दिपावली सणांचे अगोदर देण्यात येणार असल्याचे जाहिर केले व कारखान्यामार्फत सभासदांचा सभासद अपघात विमा घेतलेला असून कारखान्याने प्रिमियची रक्कम रु.२१.५५ लाख स्वभांडवलातून भरलेली आहे. दुर्दैवाने मयत झालेल्या सभासदांच्या वारसाना ५ लाखाची मदत केली जाते. या सभेसाठी कारखान्याच्या व्हाईस चेअरमन सौ. प्रेमलता बब्रुवाहन रोंगे, स्वेरी कॉलेजचे संस्थापक सचिव बब्रुवाहन रोंगे, संचालक संभाजी भोसले, कालिदास पाटील, दिनकर चव्हाण, सुरेश भुसे, बाळासाहेब हाके, धनंजय काळे, साहेबराव नागणे, कालिदास साळुंखे, जनक भोसले, प्रविण कोळेकर, नवनाथ नाईकनवरे, सिताराम गवळी, अशोक जाधव, सिध्देश्वर बंडगर, समाधान काळे, श्रीमती कलावती खटके, सौ. सविता रणदिवे, तज्ञ संचालक दशरथ जाधव, अशोक तोंडले, अंगद चिखलकर, अशोक घाडगे, तानाजी बागल, सचिन शिंदे (पाटील), समाधान गाजरे, धनाजी खरात, उमेश मोरे, गणेश ननवरे, एम.एस.सी.बँकेचे प्रतिनिधी सी. एस. पाटील, मोठया संख्येने कारखान्याचे सभासद, सर्व अधिकारी, कर्मचारी वर्ग, उपस्थित होते. सर्व उपस्थित सभासदांचे निमंत्रीत संचालक सचिन शिंदे-पाटील यांनी आभार मानले व सुत्रसंचलन प्रा. नागटिळक यांनी केले.

Reactions

Post a Comment

0 Comments