Hot Posts

6/recent/ticker-posts

कोविड काळात पालक गमावलेल्या बालकांना सर्व सोयी सुविधा वेळेत उपलब्ध करून द्याव्यात - जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद

 कोविड काळात पालक गमावलेल्या बालकांना सर्व सोयी सुविधा वेळेत उपलब्ध करून द्याव्यात - जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद


सोलापूर (कटूसत्य वृत्त):-कोविड-19 च्या काळात जिल्ह्यात एक किंवा दोन्ही पालक गमावलेल्या बालकांची संख्या 1 हजार 152 इतकी आहे. सर्व बालकांना केंद्र व राज्य शासनाकडून जाहीर झालेली सर्व आर्थिक मदत देण्यात आलेली असली तरी या सर्व बालकांची आरोग्य तपासणी व  मानसोपचार तज्ञाकडून समुपदेशन करून घ्यावे. तसेच या बालकांना सर्व सोयी सुविधा वेळेत उपलब्ध झाल्या पाहिजेत यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी दक्षता घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले.

  जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित कोविड 19 प्रादुर्भाव कालावधीमध्ये बालकांच्या काळजी व संरक्षणासाठी गठित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय कृती दलाच्या बैठकीत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद मार्गदर्शन करत होते. यावेळी जिल्हा महिला बाल विकास अधिकारी रमेश काटकर, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अतुल वाघमारे, जिल्हा परिषदेचे महिला व बाल विकास अधिकारी प्रसाद मिरकले, बालकल्याण समितीचे अध्यक्ष समीर सय्यद, बालकल्याण समितीचे सदस्य ऍड. सुवर्णा कोकरे, विजय फुटाणे, नीता गुंड, शहर पोलीस उपायुक्त अशोक तोरडमल, जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार यांच्यासह अन्य विभागाचे प्रमुख/प्रतिनिधी व तालुका बाल संरक्षण अधिकारी उपस्थित होते.

         जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद पुढे म्हणाले की कोविड काळात एक किंवा दोन्ही पालक गमावलेल्या सर्व बालकांना मानसोपचार तज्ञाकडून समुपदेशन करणे गरजेचे आहे, त्यानुसार महिला व बाल विकास कार्यालयाने जिल्हा शल्य चिकित्सक यांच्याकडील मानसोपचार तज्ञ यांच्या कडून तात्काळ या सर्व बालकांची तपासणी करून घ्यावी. या सर्व बालकांना संबंधित तालुक्यातील बाल संरक्षण अधिकाऱ्यांनी वेळोवेळी भेटी दिल्या पाहिजेत. त्यांची शैक्षणिक आरोग्य आर्थिक व अन्य गरजा असतील तर त्या यंत्रणांनी त्वरित सोडवणे अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी सुचित केले.

       बाल संगोपन योजनेअंतर्गत एक व दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना माहे मार्च 2023 पर्यंतचे प्रतिमहा अकराशे रुपये अनुदान मिळाले असले तरी माहे एप्रिल 2023 पासून ते आज पर्यंत प्रतिमहा 2250 रूपये दिले जाणारे अनुदान अप्राप्त असल्याने  महिला बाल व विकास कार्यालयाने हे अनुदान बालकांना थेट त्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यासाठी पाठपुरावा करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी दिले. त्याप्रमाणेच रस्त्यावरील मुलांना शोधणे व त्यांचे पुनर्वसन करण्याच्या अनुषंगाने महिला व बाल विकास कार्यालयाने उपविभागीय अधिकाऱ्यांना सोबत घेऊन पुन्हा रस्त्यावरील मुलांची शोध मोहीम राबवावी, यासाठी चाईल्डलाईनची ही मदत घ्यावी असे त्यांनी सूचित केले.

     मिशन वात्सल्य अंतर्गत लाभार्थ्यांना शिधापत्रिका, वारस प्रमाणपत्र, विमा पॉलिसी चा लाभ, आधार कार्ड, जन्म मृत्यू दाखला, जातीचे प्रमाणपत्र, मालमत्ता विषयक, अनाथ बालक असल्यास शालेय प्रवेश व फी, कौशल्य विकास,  कुटुंब निवृत्ती वेतन योजना, बाल संगोपन योजना श्रावण बाळ योजना घरकुल योजना या योजनेची आकडेवारी पुन्हा एकदा तपासून घ्यावी 25 व वस्तुनिष्ठ आकडेवारी शुक्रवार दिनांक 27 ऑक्टोबर पर्यंत सादर करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी दिले.

         प्रारंभी जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अतुल वाघमारे यांनी जिल्ह्यात कोविड काळात एक पालक गमावलेले 1109 तर दोन्ही पालक गमावलेले 43 बालक असल्याची माहिती देऊन दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना पीएम केअर फंडातून प्रति बालक दहा लाख रुपये तर मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रति बालक पाच लाख रुपये निधी देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. बाल संगोपन योजनेतून दोन्ही पालक गमावलेल्या बालकांना आठ महिन्याचे प्रत्येकी 1100 रुपये प्रमाणे प्रतिमहा अनुदान वितरित करण्यात आले आहे तर एक पालक गमावलेल्या एकूण 1109 बालकांना मागील सहा महिन्याचे प्रत्येकी 1100 रुपये प्रमाणे प्रतिमहा अनुदान वितरित करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

         रस्त्यावरील मुलांना शोधणे व त्यांचे पुनर्वसन करणे याबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे जिल्हा महिला व बालविकास कार्यालयामार्फत रस्त्यावरील राहणाऱ्या बालकांचे सर्वेक्षण करण्यात येऊन त्यात 69 बालकांचा शोध घेण्यात आला होता त्यातील सर्व एकूण 69 बालकांना त्यांच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आलेले आहे. पंढरपूर, अक्कलकोट, रेल्वे स्टेशन, बस स्थानक व सिद्धेश्वर मंदिर हे रस्त्यावरील मुलांचे हॉटस्पॉट असल्याचेही बाल संरक्षण अधिकारी वाघमारे यांनी सांगितले.

        यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी बाल संरक्षण समिती, बालविवाह निर्मूलन समिती, सखी वन स्टॉप सेंटर, जिल्हा परिविक्षा समिती या समित्यांचा आढावा घेऊन संबंधितांना मार्गदर्शक सूचना दिल्या.

Reactions

Post a Comment

0 Comments